छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी कटिबध्द – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी कटिबध्द–मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

सजग वेब टिम, जुन्नर

पुणे (दि.१९)| गोरगरिबांच्या मनात हे माझे सरकार आहे, अशी भावना निर्माण झाली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी शासन कटिबध्द राहील ,असा विश्वास मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी व्यक्त केला.

सनई-चौघड्यांचे मंजूळ स्वर, तुतारींच्या गगनभेदी गर्जना, ढोल-ताशांचा निनाद, भगव्या पताका, ‘जय भवानी, जय शिवाजी’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’चा जयघोष अशा आनंदमयी वातावरणात आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उप मुख्य मंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शिवजन्मोत्सव किल्ले शिवनेरीवर उत्साहात साजरा झाला, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. या कार्यक्रमास
अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, माहिती व जनसंपर्क राज्यमंत्री आदिती तटकरे,खा. डॉ.अमोल कोल्हे, आ. अतुल बेनके आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

मुख्यमंत्री ठाकरे पुढे म्हणाले, आमच्या प्रत्येकाच्या ह्रदयात शिवविचार आहे. जिजाऊ माॕसाहेब आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचे तेज, प्रेरणा पाठीशी राहू द्या, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
शिवनेरी आपले वैभव आहे.या वैभवाचा वारसा जतन करण्यासाठी आणि पुढे नेण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न केले जातील, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
उप मुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व समाजाच्या विकासाची दिशा दाखवली.या दिशेने सरकारचे काम चालू आहे. शिवनेरी परिसराचा विकास आर्थिक तरतुदी अभावी प्रलंबित राहता कामा नये, याची दक्षता घेतली जात आहे. परिसरातील विकास कामांसाठी तातडीने 23 कोटी रुपये उपलब्ध करून दिले जातील, असेही ते म्हणाले.

मराठा आरक्षणाच्यावेळी दाखल झालेले गुन्हे कायद्याच्या चौकटीत राहून मागे घेण्यासाठी प्रयत्न केले जातील. ज्या गुन्ह्यात शासकीय मालमत्ता किंवा सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले नाही, ते गुन्हे नियमांच्या अधीन राहून मागे घेतले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.

प्रारंभी शिवजन्मस्थानी पारंपरिक वेशातील महिलांनी शिवरायांची महती सांगणारा पाळणा गायिला. त्यानंतर पोलीस पथकाने बंदुकीच्या तीन फैरी झाडून छत्रपती शिवरायांना मानवंदना दिली. त्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे, उप मुख्य मंत्री पवार यांनी बालशिवाजी व जिजाऊंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. कार्यक्रमास विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, विशेष पोलीस महानिरीक्षक सुहास वारके, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्या सह
असंख्य शिवभक्त उपस्थित होते.

Read more...

साखर उद्योगाच्या सक्षमीकरणासाठी संशोधन कार्याच्या विस्ताराची गरज – शरद पवार

साखर उद्योगाच्या सक्षमीकरणासाठी संशोधन कार्याच्या विस्ताराची गरज – शरद पवार

आंतरराष्ट्रीय साखर परिषद व प्रदर्शनाला प्रारंभ

सजग वेब टिम, पुणे

पुणे । ग्रामीण भागात उसशेतीमुळे चांगले सामाजिक व आर्थिक बदल होत आहेत. मात्र, ऊस संशोधन संस्थांमध्ये केलेली गुंतवणूक अत्यल्प आहे. यामुळे मागणी असूनही साखर उद्योगाला भविष्यात साखरेसह सहवीज, इथेनॉलचा पुरवठा करता येणार नाही. साखर उद्योगाच्या सक्षमीकरणासाठी संशोधन कार्याच्या विस्ताराची गरज असल्याचे प्रतिपादन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केले.

मांजरी, पुणे येथे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट संस्थेच्या वतीने 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारी 2020 या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या साखर उद्योगासंदर्भात व्दितीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते उदघाटन् झाले. यावेळी आंतरराष्ट्रीय साखर परिषदेचे कार्यकारी संचालक डॉ. जोस ऑरिव्ह, पंजाबचे सहकारमंत्री सुखजिंदरसिंग रंधावा, व्हीएसआयचे उपाध्यक्ष व मंत्री दिलीप वळसे पाटील, जलसंपदामंत्री जयंत पाटील, जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, व्हीएसआयचे पदाधिकारी विजयसिंह मोहिते पाटील, हर्षवर्धन पाटील, साखर आयुक्त सौरभ राव, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे महासंचालक शिवाजीराव देशमुख आदी मान्यवर होते.

यावेळी पवार म्हणाले, “व्हीएसआय ही शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी उभी केलेली संस्था आहे. जगातील साखर क्षेत्रातील तज्ज्ञाचे मार्गदर्शन घेवून साखर उद्योगाला पुढे नेण्यासाठी संस्थेचे प्रयत्न सुरू आहेत. याच प्रयत्नातून आंतरराष्ट्रीय पातळीवरील ही परिषद होत आहे. साखर उद्योगाच्या प्रयत्नामुळे देशातील पाच कोटी शेतकरी आता 50 लाख हेक्टरवर ऊस लागवड करीत समृध्दीकडे जात आहेत. 2025 पर्यंत देशाची साखर मागणी 300 ते 330 लाख टनापर्यंत गेलेली असेल. आपल्याला ऊस उत्पादकता व साखर उतारा वाढवून ही समस्या सोडवावी लागेल,” असा सल्ला श्री.पवार यांनी दिला.

दुष्काळ, क्षारता, कीड आणि रोग या संकटाचा मुकाबला करणारे नवीन ऊस वाण शोधण्यासाठी जैवतंत्रज्ञान, नॅनो तंत्रज्ञान तसेच जनुक तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक असल्याचे सांगून श्री पवार म्हणाले, शेतकऱ्यांना लागवडीच्या पातळीवर तांत्रिक मार्गदर्शन देणे गरजेचे असून त्यासाठी उत्पादक ते कारखानदार हा दुवा मजबूत करावा लागणार आहे. उत्पादक शेतकरी, कारखानदार आणि ग्राहक यांच्यात दुवा तयार करण्यासाठी डिजिटल तंत्राचा वापर करण्याची गरज आहे. त्यासाठी संशोधन संस्थांचे बळकटीकरण अत्यावशक ठरणार असल्याचेही श्री पवार यांनी स्पष्ट केले.

आंतरराष्ट्रीय साखर परिषदेचे कार्यकारी संचालक डॉ. जोस ऑरिव्ह म्हणाले, जागतिक साखर बाजारात भारत आघाडीवर असून उत्पादन वाढवून भारताने जागतिक साखर उद्योगाचे नेतृत्व स्वतःकडे आणले आहे. प्रक्रियकडे वळणे आणि उत्पादकता वाढविणे हे एकमेव पर्याय तुमच्या समोर आहेत. भारत जागतिक बाजारपेठेत पहिल्या क्रमांकाचा देश राहणार आहे, भारताने इथेनॉल धोरण आणले. यामुळे साखर साठे कमी होण्यास मदत झाली आहे. तसेच या धोरणामुळे मळीपासून तसेच ऊस रसापासून इथेनॉल निर्मिती वाढीला मदत होईल, असे मत डॉ. जोस यांनी व्यक्त केले.

पंजाबचे सहकारमंत्री रंधावा म्हणाले, महाराष्ट्र सहकार आणि साखर या दोन्ही क्षेत्राकरीता आमच्यासाठी आदर्श आहे. साखर उद्योगाने आपल्या भवितव्याचा विचार करताना शेतकऱ्याला कायम केंद्रबिंदू ठेवावे. महाराष्ट्राने शेती क्षेत्रात नेत्रदिपक प्रगती केली आहे.
या परिषदेला देशविदेशातील साखर उद्योगातील देश विदेशातील उद्योजक, नामवंत शास्त्रज्ञ, तंत्रज्ञानातील राज्यातील ऊस कारखान्यांचे पदाधिकारी, सभासद, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read more...

आमदार बेनके यांनी घेतला चिल्हेवाडी पाईपलाईन प्रकल्पाचा आढावा

आमदार बेनके यांनी घेतला चिल्हेवाडी पाईपलाईन प्रकल्पाचा आढावा

सजग वेब टिम, जुन्नर

नारायणगाव दि.२० | जुन्नर तालुक्याच्या उत्तर पूर्व भागातील कृषी सिंचनाच्या दृष्टीने महत्वाचा प्रकल्प म्हणजे चिल्हेवाडी पाईपलाईन प्रकल्प. आमदार अतुल बेनके यांनी आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात हा प्रकल्प पूर्ण करू आणि तालुक्याच्या उत्तर पूर्व भागात शेतकऱ्यांना पाण्याच्या प्रश्नी दिलासा देऊ असा शब्द निवडणुकीत दिला होता.

याचपार्श्वभूमीवर या चिल्हेवाडी धरण बंदपाईपलाईन प्रकल्पाचा बेनके यांनी अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला.

चिल्हेवाडी पाचघरचा प्रकल्प हा माजी आमदार वल्लभ बेनके यांचा ड्रीम प्रोजेक्ट होता, हा प्रकल्प आपण प्राधान्याने पूर्ण करणार आणि लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या शेतात थेट पाणी पोहचवणार असे बेनके यांनी यावेळी बोलताना सांगितले.

सदर पाईपलाईनच्या कामाच्या संबंधित सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत तसेच जि. प. सदस्य पांडुरंग पवार साहेब यांच्यासह बैठक घेऊन बेनके यांनी या प्रकल्पाचा आढावा घेतला.

या बैठकीत आमदार बेनके यांनी प्रकल्पाची सखोल माहिती घेतली. कामाची सध्याची स्थिती, धरणालगतचे पाण्याचे पाईपलाईन मधून पाण्याचा होणारा विसर्ग व शेवटच्या टोकापर्यंत मिळणारे पाणी, एकूण वितरिका, लाभक्षेत्रातील गावांसाठी मिळणारं पाणी, आवर्तनाचा कालावधी, भिजणारं लाभक्षेत्र, प्रलंबित काम पूर्ण होण्यासाठी लागणारा कालावधी या सर्वच बाबींचा अाढावा काल आमदार बेनके यांनी अधिकाऱ्यांकडून घेतला.

नारायणगाव याठिकाणी झालेल्या या बैठकीत अशोकनाना घोडके, प्रदीपजी पिंगट, विजय कुऱ्हाडे, जयरामशेठ भुजबळ, रानमळा गावचे माजी सरपंच सुरेश तिकोणे , मयुर मनोहर गुंजाळ, पंढरी गुंजाळ माजी (शाखा अभियंता जलसिंचन) आदी मान्यवर उपस्थित होते.

Read more...

कर्जत-भीमाशंकर राष्ट्रीय महामार्गास केंद्राचा हिरवा कंदिल : खा.डॉ.अमोल कोल्हे

कर्जत-भीमाशंकर राष्ट्रीय महामार्गास केंद्राचा हिरवा कंदिल : खा.डॉ.अमोल कोल्हे

सजग वेब टिम, पुणे

पुणे दि.१९ | संसदीय हिवाळी अधिवेशनात शिरूर लोकसभेचे खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी केंद्रीय भ्रूपुष्ट मंत्री मा.नितीनजी गडकरी यांची भेट घेऊन तीर्थक्षेत्र भीमाशंकरच्या सर्वांगीण विकासासाठी भीमाशंकरला जाणारा मार्ग हा राष्ट्रीय दर्जाचा व्हावा असे निवेदन दिले होते.
तीर्थक्षेत्र भीमाशंकर हे भाविकांचे श्रद्धास्थान असून या ठिकाणी येण्यासाठी माहामार्गची नितांत आवश्यकता आहे , राष्ट्रीय महामार्ग घोषित झाल्यामुळे या ठिकाणीच्या पर्यटनास निश्चितच चालना मिळेल , पर्यटनवृद्धीमुळे या भागातील रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. सोबतच मुंबईला जाण्यासाठी वेळेची बचत होईल, या राज्यमार्गाला राष्ट्रीय महामार्गचा दर्जा मिळवा अशी मागणी केली होती.
खा.डॉ अमोल कोल्हे यांनी केलेल्या मागणीला केंद्रिय मंत्रालयाने हिरवा कंदील दाखवला आहे कर्जत-भीमाशंकर मार्ग हा राष्ट्रीय महामार्ग म्हणुन घोषित करण्यासाठी व तसेच या संबधी राज्यमार्ग मंत्रालय सचिव यांना कळविले आहे , महामार्गाच्या मजबुतीकरणासाठी लवकरच कार्यवाही करण्यात येईल असे लेखी पत्र डॉ कोल्हे यांच्या कार्यालयास प्राप्त झाले आहे.

Read more...

सार्वजनिक संपत्तीचे नुकसान करू नका राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे आवाहन

सार्वजनिक संपत्तीचे नुकसान करू नका राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे आवाहन

९ वा राष्ट्रधर्मपूजक दादाराव कराड राज्यस्तरीय पुरस्काराने नवरत्नांचा सन्मान

डॉ.संदीप मनोहर डोळे यांचा आरोग्यरत्न पुरस्काराने सन्मान

सजग वेब टिम, पुणे

पुणे | “ सार्वजनिक संपत्तीचे नुकसान होवू न देता शांततेच्या मार्गाने आंदोलन होणे गरजेचे असून हे शिक्षण विद्याथ्यार्ंना विद्यापीठामधून देणे गरजेचे आहे. जेव्हा आम्ही एकदुसर्‍यांची गोष्ट मान्य करू, तेव्हाच या विश्‍वात शांतता निर्माण होईल,”असे विचार महाराष्ट्रचे राज्यपाल महामहिम भगत सिंह कोश्यारी यांनी मांडले.

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे,विश्‍वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी शिक्षण संस्था समूह, पुणे व भारत अस्मिता फाउंडेशन, पुणे यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ९ व्या राष्ट्रधर्मपूजक दादाराव कराड राज्यस्तरीय पुरस्काराच्या प्रदान समारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहळ हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते. अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ.विश्‍वनाथ दा. कराड हे होते.

या प्रसंगी सुप्रसिद्ध संगणक तज्ञ पद्मभूषण डॉ. विजय भटकर, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हिर्सिटीचे कार्याध्यक्ष राहुल विश्‍वनाथ कराड, एमआयटी आर्ट डिझाइन अ‍ॅण्ड टेक्नॉलाजी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ.मंगेश तु. कराड आणि एमआयटी डब्ल्यूपीयूचे कुलगुरू डॉ. एन.टी.राव हे उपस्थित होते.
यावेळी कृषीरत्न हा पुरस्कार विष्णुपंत केरू गायखे (रा.पळसे, ता.जि.नाशिक), समाजरत्न कुशावर्ता चंद्रशेखर बेळे (मु.पो.ता. देवणी, जि. लातूर), आरोग्यरत्न डॉ.संदीप मनोहर डोळे (मु.पो.नारायणगांव, ता.जुन्नर, जि.पुणे), शिक्षणरत्न सुधीर बाळासाहेब खाडे (नळदुर्ग,ता. तुळजापूर, जि.उस्मानाबाद), क्रीडारत्न ऋचा राहुल धोपेश्‍वर (पुणे), ग्रामरत्न पुरूषोत्तम अंबादास घोगरे (खिरगव्हाण समशेरपूर, जि. अमरावती), बचतगटरत्न पुजा नितीन खडसे (दोंडाईचे, ता. सिंदखेड, जि. धुळे), जनजागरण रत्न जयप्रकाश आसाराम दगडे (लातूर) व अध्यातरत्न ह.भ.प. सुधाकर महाराज इंगळे (मु.पो. राजेश कोठे नगर, सोलापूर) यांना प्रदान करण्यात आले. शाल, श्रीफळ, सन्मानपत्र, स्मृती चिन्ह, संत श्री ज्ञानेश्‍वर माऊलीची प्रतिमा व प्रत्येकी रू.११,००० रोख असे या पुरस्काराचे स्वरूप होते. या वेळेस ‘राष्ट्रधर्मपूजक दादाराव कराड नवरत्न परिचय’ पुस्तकाचे लोकार्पण मान्यवरांच्या हस्ते झाले.

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी म्हणाले,“ फीट इंडियासाठी सर्वांना प्रयत्न करणे गरजेचे आहे. आज समाजातील मत भिन्नतेमुळे शांती निर्माण होऊ शकत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना असे शिक्षण देणे गरजेचे आहे, की ज्यामुळे सरकारी संपत्तीचे नुकसान होणार नाही. विश्‍व शांतीसाठी सर्वप्रथम आत्मज्ञान होणे गरजेचे आहे. समाज एकत्रित आणण्यासाठी या देशात गणेशोत्सवाची सुरूवात झाली होती. पण, आज याची स्थिती वेगळी झाली आहे. या वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीने जे नऊरत्न शोधले त्यामुळे नक्कीच येथील विद्यार्थी हा नवरत्नसारखा बनेल.”

मुरलीधर मोहळ म्हणाले,“ शिक्षण व संस्कृतीची पार्श्‍वभूमी लाभलेल्या या पुण्यनगरीत डॉ. कराड यांनी शून्यातून शिक्षणाचे काम सुरू केले आहे. ही संस्था सामाजमन व सामाजिक बांधिलकी ओळखते. या पुरस्कारचा मुख्य उद्देश हाच आहे की समाजात चांगले कार्य घडत रहावे. दादाराव कराड यांच्या विचारातून व मार्गदर्शनातून समाजात लोक चांगले कार्य करतील.”

प्रा.डॉ.विश्‍वनाथ दा. कराड म्हणाले,“ ही संस्था स्वामी विवेकानंद यांच्या तत्वज्ञानावर कार्य करीत आहे. स्वातंत्रसेनेच्या रूपाने कार्य करणारे आमचे वडील खर्‍या अर्थाने ते राष्ट्रधर्मपूजक होते. या देशाला ‘वसुधैव कुटुंबकम’ची वैश्‍विक परंपरा आहे. भगवदगीता व ज्ञानेश्‍वरी हे धार्मिक ग्रंथ नसून ते जीवन ग्रंथ आहे. भारतीय संस्कृतीचे छोटे दर्शन येथे होत आहे. त्याग आणि समर्पणाचे येथे दर्शन घडले आहे. आपल्यासारख्या लोकांच्या कार्यातून भारत हा २१व्या शतकात विश्‍वगुरू म्हणून उदयास येईल.

डॉ. विजय भटकर म्हणाले,“ विश्‍वशांती व संस्कार देणारे हे विद्यापीठ पुढील काळात संस्कार देणारे पीठ बनेल. १३५ कोटीच्या लोकसंख्येच्या या देशातील गावा गावापर्यंत चांगले कार्य पोहचविण्याचे कार्य या विद्यापीठातून होत राहील.”
पुरस्काराला उत्तर देताना जयप्रकाश दगडे म्हणाले,“ मनापासून ऋण व्यक्त करतो. ज्यांचा येथे सत्कार होत आहे ते सर्व ग्रामीण भागातील हिरो आहेत. त्यांनी केलेल्या कामाचा आज खर्‍या अर्थाने गौरव झाला आहे. तळागळात काम करणार्‍या व्यक्तींचा शोध एमआयटीने पूर्ण केला. जगाला सध्या पर्यावरणाचा धोका आहे त्या दृष्टीने कार्य करावे अशी आशा त्यांनी व्यक्त केली.”
राहुल विश्‍वनाथ कराड यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले की, आम्ही समाजातील उत्तम कार्य करणारे व्यक्ती ज्यांचे नाव अद्याप जनतेपर्यंत पोहचले नाही अशा व्यक्तिंचा येथे गौरव केला जात आहे. यांचे उदाहरण तरूण पिढीसमोर आदर्श ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

प्रा. गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले. प्रा.डॉ. मंगेश तु. कराड यांनी आभार मानले.

Read more...

पत्रकारांनी आपल्या कार्यातून पत्रकारितेची उंची वाढवावी- खा. गिरीश बापट 

पत्रकारांनी आपल्या कार्यातून पत्रकारितेची उंची वाढवावी- खा. गिरीश बापट 

पुणे श्रमिक पत्रकार संघ व पत्रकार प्रतिष्ठानच्या वतीने मराठी पत्रकार दिन साजरा
◆ ज्येष्ठ पत्रकार मा.कृ. पारधी व रामभाऊ जोशी यांचा विशेष सन्मान

सजग वेब टिम, पुणे

पुणे, दि.६ | समाजात पत्रकारांना अनन्यसाधारण स्थान असून पत्रकारांनी आपल्या कार्यातून पत्रकारितेची उंची वाढवावी, असे आवाहन खासदार गिरीश बापट यांनी केले.
मराठी पत्रकार दिनानिमित्त आज पुणे श्रमिक पत्रकार संघ आणि पुणे पत्रकार प्रतिष्ठानच्या वतीने व खासदार गिरीश बापट यांच्या सहकार्याने त्यांच्या हस्ते आज ज्येष्ठ पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ पत्रकार मा. कृ. पारधी व रामभाऊ जोशी यांना शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. यावेळी श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रसाद कुलकर्णी, सरचिटणीस चंद्रकांत हंचाटे, पुणे पत्रकार प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश भोईटे, विश्वस्त, कार्यवाह विठ्ठल जाधव, माहिती उपसंचालक मोहन राठोड, जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग आदी उपस्थित होते.

खासदार श्री. बापट म्हणाले, पत्रकार समाजसेवेचे काम करतात. निवृत्त पत्रकारांच्या समस्या सोडवण्यासाठी समाजाबरोबरच कार्यरत असणाऱ्या पत्रकारांनीही पुढे यायला हवे. मराठी पत्रकार दिनाचा सोहळा पत्रकारांचा स्नेहसोहळा बनावा, अशी अपेक्षा व्यक्त करुन ते म्हणाले, पत्रकारांच्या या सन्मान कार्यक्रमासाठी ज्येष्ठ व निवृत्त पत्रकारांना आवर्जुन निमंत्रित करावे, जेणेकरुन या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकमेकांच्या अडी-अडचणींवर चर्चा होवून त्या सोडवता येतील. समाजाने पत्रकारितेकडे व पत्रकारांकडे कौटुंबिक भावनेतून बघायला हवे. पत्रकारांनी पत्रकारितेची उंची आपल्या कार्यातून इतकी वाढवावी, की समाजातील कोणताही ही घटक पत्रकारांना गृहीत धरणार नाही. पत्रकारांनीही आपल्या कृतीतून दुसऱ्यांना त्रास होणार नाही, याची दक्षता घ्यायला हवी.
यावेळी माहिती उपसंचालक मोहन राठोड यांनी सादरीकरणातून राज्य शासनाच्या पत्रकारांसाठी असलेल्या विविध योजनांची सविस्तर माहिती दिली. आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना, शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधी, महात्मा फुले जनआरोग्य योजना, अधिस्वीकृती पत्रिका, पत्रकारांसाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने दिले जाणारे पुरस्कार आदींची माहिती त्यांनी दिली. तसेच या राज्य शासनाच्या योजनांचा लाभ पत्रकारांना मिळवून देण्यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालय सकारात्मक असल्याचे त्यांनी सांगितले.

सन्मानाला उत्तर देताना ज्येष्ठ पत्रकार मा.कृ.पारधी म्हणाले, श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने हा दुसऱ्यांदा सन्मान होत असून हा माझ्यासाठी मोलाचा क्षण आहे. ज्येष्ठ पत्रकार रामभाऊ जोशी म्हणाले, पत्रकारांनी पत्रकारांचा सन्मान करण्याची ही मोठी बाब असून हा उपक्रम पुण्यात पत्रकार संघाने सुरु केला हे आनंददायी आहे. आजवर अनेक ठिकाणी सत्कार होवून पुरस्कार मिळाले, परंतु आजचा सन्मान हा माझ्यासाठी मोलाचा व घरातून झालेला सन्मान आहे. पत्रकारितेत काम करताना अनेक मोठमोठ्या व नामांकित व्यक्तींच्या ओळखी झाल्या. याचा उपयोग अनेकांच्या समस्या सोडविण्यासाठी करुन घेतला, असे सांगून पत्रकारितेमुळे जीवन समृध्द झाले, असे ते म्हणाले.

कार्यक्रमात अंकुश काकडे, ज्येष्ठ पत्रकार राजीव साबडे, सुनिल माने आदि मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रसाद कुलकर्णी यांनी प्रस्ताविकातून संघाच्या वतीने वर्षभर राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. आभार पुणे पत्रकार प्रतिष्ठानचे विश्वस्त, कार्यवाह विठ्ठल जाधव यांनी मानले. सुत्रसंचालन पत्रकार संघाचे उपाध्यक्ष सुकृत मोकाशे यांनी केले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार गोपाळ साक्रिकर, वसंतराव गाडगीळ, किरण ठाकूर, आनंद आगाशे, राजीव साबडे, यमाजी मालकर, अनिल टाकळकर, अविनाश भट, विनिता देशमुख, गौरी आठल्ये, राजीव साबडे, विकास वाळुंजकर, गोविंद देशपांडे आदि मान्यवरांना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read more...

पुणे – नाशिक महामार्गावरील कामे लवकर पूर्ण करा : खा. डॉ.अमोल कोल्हे यांचा अधिकाऱ्यांना अल्टीमेटम

पुणे – नाशिक महामार्गावरील कामे लवकर पूर्ण करा : खा. डॉ.अमोल कोल्हे यांचा अधिकाऱ्यांना अल्टीमेटम

सजग वेब टिम, पुणे

पुणे, दि ०३ | पुणे -नाशिक, पुणे – नगर महामार्गावरील वाहतूक कोंडीची समस्या ही दिवसेंदिवस वाढत चालली असून यामध्ये सर्वसामान्य जनतेला नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या कारणास्तव आज शिरुर लोकसभेचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आज जिल्हाधिकारी यांची भेट घेतली, वाहतुक कोंडी सोडवण्यासाठी लवकरात लवकर चालू असलेले प्रकल्प पूर्ण करा अशा सूचना त्यांनी आज संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

वाहतूक कोंडीची समस्येवर खासदार कोल्हे यांनी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात आवाज उठवला होता, सोबतच चाकण या ठिकाणी उड्डाणपूल उभारण्यात यावा अशी आग्रही मागणी देखील केली होती त्याच मागणी संदर्भात त्यांनी आज चालू असलेल्या कार्यवाही संदर्भात आढावा घेतला.

जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडलेल्या बैठकीला खासदार डॉ अमोल कोल्हे, शिरुर- हवेलीचे आ. अशोकबापू पवार, भूसंपादन विभागाचे समन्वयक अधिकारी सारंग कोडलकर, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे प्रकल्प संचालक सुहास चिटणीस उपस्थित होते.

वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी रस्ता रुंदीकरण करावे लागणार आहे , सोबतच जमीन अधिग्रहण करण्यात आल्या आहेत व काही ठिकाणी भूसंपादन करावे लागणार आहे यामध्ये शेतकऱ्यांचे नुकसान न होऊ देता सर्वांचा विचार करून जमीन मालकांना जमिनीचा मोबदला तात्काळ द्यावा, तसेच दोन्ही मार्गावरील कामे तातडीने पूर्ण करण्यात यावीत.

नारायणगाव बायपासचे सुरू असलेले काम अंतिम टप्प्यात आले असून यामधील एक लेन लवकर सुरू करण्यात यावी अशी सूचना संबधीत ठेकेदाराला खासदारांनी केली या मार्गावरील भूसंपादनाची कामे लवकर पूर्ण झाल्यास रस्त्याचे रुंदीकरण केल्याने वाहतूक कोंडी कमी होईल, वाहतूक कोंडीची समस्या लक्षात घेता भूसंपादन अधिकाऱ्यांनी व राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी गतीने कामे करावीत, अशा सूचना खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी दिल्या. यावेळी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी, जिल्हाधिकारी भूसंपादन विभागाचे अधिकारी, लोकप्रतिनिधी तसेच शेतकरीही उपस्थित होते.

Read more...

विरोधक जाणीवपूर्वक आदिवासी बांधवात गैरसमज निर्माण करत आहे – खा. डॉ.अमोल कोल्हे

सजग वेब टिम ,पुणे

पुणे | बारामती येथे झालेल्या कार्यक्रमादरम्यान धनगर आरक्षण विषयी माझे एक अर्धवट वक्तव्य पसरवून आदिवासी बांधवांचा गैरसमज करून देण्याचा प्रयत्न विरोधक करत आहेत. बारामती येथे झालेल्या कार्यक्रमात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या भाषणात “कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता धनगर समाजाला आरक्षण मिळावे” ही भूमिका मांडली व मी स्वतः याच भूमिकेला पाठिंबा दिला. मात्र विरोधक अर्धवट वक्तव्य पसरवून आदिवासी समाजाची दिशाभूल करत आहे. उपेक्षित समाजाला आरक्षण मिळावे परंतु इतर समाजांच्या आरक्षणाला धक्का न लावता मिळावे हीच माझी भूमिका आहे व राहील.

संसदेतील पहिल्याच भाषणात आदिवासी भागातील मुद्द्यांचा समावेश करणारा खासदार अशी भूमिका घेणार नाही याबद्दल आदिवासी बांधवांनी विश्वास बाळगावा. आणि ज्यांनी आजवर आदिवासी बांधवांकडे दुर्लक्षच केलं त्या विरोधकांनी माझ्या आदिवासी बांधवांत चुकीचा गैरसमज पसरवू नये असे खासदार अमोल कोल्हे यांच्या वतीने सांगण्यात आले आहे .

Read more...

पिंपरी-चिंचवड शहर व परिसरातील रेडझोनचा प्रश्न संसदेत मांडणार – अमोल कोल्हे

पिंपरी-चिंचवड शहर व परिसरातील संरक्षण खात्यासंदर्भतील रेडझोनचा प्रश्न संसदेत मांडणार आहे. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासोबत रेडझोनबाबत चर्चा करुन हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन शिरुरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आज रेडझोन संबंधित शिष्टमंडळाला दिले.

सजग वेब टिम, पुणे
पुणे | भोसरी आणि पिंपरी चिंचवड परिसरातील रेडझोन प्रश्नी आज रेडझोन संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने आज खा. डॉ.अमोल कोल्हे यांची भेट घेतली. या शिष्टमंडळाकडून डॉ. कोल्हे यांनी आज (शुक्रवारी)पुण्यात ‘रेडझोन’ची सविस्तर माहिती घेतली. संघर्ष समितीचे अध्यक्ष सुदाम तरस, सचिव गुलाबराव सोनवणे, सदस्य यदुनाथ डाखारे, नगरसेवक अजित गव्हाणे, रोहित खर्गे आदी सदस्य यावेळी उपस्थित होते.

पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरातील विविध ठिकाणच्या संरक्षण खात्याच्या वतीने रेडझोन क्षेत्र निर्धारित करण्यात आलेल्या भागातील नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. यात शिरुर लोकसभा मतदारसंघातील भोसरी भागातील दिघी, वडमुखवाडी, तळवडे, मोशी, चिखली, यमुनानगर, निगडी परिसरातील नागरिकांना प्रामुख्याने रेडझोनचा सामना करावा लागत आहे. तसेच पिंपरी महापालिकेच्या हद्दीतील किवळे, मामुर्डी तसेच देहूरोड, शेलारवाडी, किन्हई, चिंचोली, झेंडेमळा, बोडकेवाडी, माळवाडी (देहू), देहूगाव, विठ्ठलवाडी या परिसरातील नागरिकांनाही रेडझोनचा सामना करावा लागत आहे. रेडझोन असल्यामुळे प्रशासनाला विकासकामे करण्यास देखील अडचणी येत आहेत.

रेडझोन संघर्ष समितीचे अध्यक्ष सुदाम तरस यांनी रेडझोनची सविस्तर माहिती दिली. खासदार डॉ. अमोल कोल्हे म्हणाले, रेडझोनचा नागरिकांना सामना करावा लागत असून विविध अडचणींना त्यांना सामोरे जावे लागत आहे. रेडझोनच्या हद्दीतील रहिवाशी चिंताग्रस्त आहेत. अनेक घरांवर असलेली टांगती तलवार आहे. ती दूर करण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. चालू असलेल्या अधिवेशनातच रेडझोनचा प्रश्न मांडणार आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासोबत रेडझोनबाबत चर्चा करुन हा प्रश्न मार्गी लावण्याबाबतही आम्ही प्रयत्नशील असल्याचे, त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.

Read more...

आगामी विधानसभा निवडणुकीत वळसे पाटील यांना विक्रमी मताधिक्‍य मिळेल – खा. अमोल कोल्हे

सजग वेब टिम, आंबेगाव

मंचर  | “आंबेगाव तालुक्याचा शाश्वत विकास करणारे विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या मागे जनता ठामपणे उभी आहे. तालुक्याचा उमेदवार असूनही मला आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून जनतेने मताधिक्‍य दिले. याचा राग मनात धरून, लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचा विधानसभेला आंबेगावमध्ये वचपा काढू, अशी गर्वाची भाषा विरोधकांकडून वापरली जात आहे.

पण, मी आताच लिहून देतो, की या पूर्वी झालेल्या सर्व विधानसभा निवडणुकांपेक्षा येत्या विधानसभा निवडणुकीत वळसे पाटील यांना विक्रमी मताधिक्‍य मिळवून देण्याचे काम येथील सुज्ञ जनता करणार आहे, असा विश्वास नवनिर्वाचित खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी व्यक्त केला.

अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) येथे श्री काळभैरवनाथ मंदिरात दर्शन घेतल्यानंतर झालेल्या आभार सभेत डॉ. कोल्हे बोलत होते. या वेळी दिलीप वळसे पाटील, देवेंद्र शहा, देवदत्त निकम, सुभाष मोरमारे, उषा कानडे, संतोष भोर, सरपंच संगीता शिंदे, उपसरपंच राजेंद्र शिंदे आदी उपस्थित होते.

डॉ. कोल्हे म्हणाले, “येत्या आठवड्यात अधिकाऱ्यांबरोबर बैठका घेऊन शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांना योग्य मोबदला देऊन बाह्यवळणाची कामे मार्गी लावण्यासाठी चर्चा केली जाईल. वाहतूक कोंडीचा प्रश्नही सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. प्रत्येक तालुक्‍यात जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी दिल्या जाणाऱ्या वेळेचे नियोजन कळविण्याची व्यवस्था केली जाईल.”

दिलीप वळसे पाटील म्हणाले, “गेली १५ वर्षे विकासकामे करण्याऐवजी पायात पाय अडकविण्याचे व निंदानालस्ती करण्याचे काम विरोधकांनी केले. तुम्हाला काय वचपा काढायचा तो काढा. माझा विश्वास जनतेवर आहे. भीमाशंकर व पराग कारखान्यांनी पुढाकार घेऊन टाकळी हाजी, पाबळ व लोणी धामणी परिसरांत गुरांच्या छावण्या सुरू करण्याचे नियोजन केले आहे.”

अवसरी खुर्द राष्ट्रवादी कॉंग्रेस व ग्रामस्थांनी दहा टन हिरवा चारा गुरांच्या छावण्यासाठी दिल्याबद्दल ग्रामस्थांचा सत्कार करण्यात आला. अरुणा थोरात, सुषमा शिंदे, सचिन पानसरे, संजय वायाळ, कल्याण टेमकर, योगेश वायाळ, अंकुश लोंढे पाटील, नीलेश टेमकर यांची या वेळी भाषणे झाली. जगदीश अभंग यांनी सूत्रसंचालन केले.

Read more...
Open chat
Powered by