भारताचा पाकवर एअर स्ट्राईक, ‘जैश’च्या तळांवर फेकला हजार किलोचा बॉम्ब

ए एन आय वृत्तसंस्था

दिल्ली | पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात मोठी कारवाई केली आहे. भारतीय वायूसेनेच्या मिराज २००० या लढाऊ विमानांनी पहाटे साडेतीनच्या सुमारास पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तळावर १००० किलोग्रॅम वजनाचा बॉम्ब फेकल्याचे वृत्त ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने दिले आहे.

पाकिस्तान हद्दीत घुसून भारतीय वायूसेनेने केलेली ही आतापर्यंतची सर्वांत मोठी कारवाई असल्याचे सांगण्यात येते. १२ मिराज विमानांनी पाक हद्दीत घुसून दहशतवादी तळावर हल्ले केले. या हल्ल्यात जैश ए मोहम्मदची अल्फा ३ कंट्रोल रूम पूर्णपणे उद्धवस्त झाल्याचेही सांगितले जाते. तत्पूर्वी, पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल आसिफ गफूर यांनी भारतीय वायूसेनेच्या विमानांनी एलओसीचे उल्लंघन केल्याचा आरोप केला होता.‘एएनआय’ने दिलेल्या वृत्तानुसार सुमारे १२ मिराज २००० लढाऊ विमानांनी सीमा पार करून दहशतवादी तळांवर हल्ला केला. यात दहशतवादी तळ पूर्णपणे उद्धवस्त झाले आहेत. बालाकोट, मुझफ्फराबाद आणि चकोटी येथील जैश ए मोहम्मदचे तळ उद्धवस्त करण्यातआले आहेत. उरी हल्ल्यानंतरही भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून सर्जिकल स्ट्राईक केले होते. या सर्जिकल स्ट्राईकमध्ये अनेक दहशतवादी तळ नष्ट करण्यात आले होते.

पुलवामा येथे १४ फेब्रुवारी रोजी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात ४० जवान शहीद झाले होते. जैश- ए- मोहम्मद या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती.पुलवामा येथील हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती. पाकिस्तान विरोधात कठोर भूमिका घेण्याची मागणी केली जात होती.अखेर मंगळवारी भारताने हवाई दलाने पाकला सडेतोड उत्तर दिले आहे.

Read more...

गिरिप्रेमी संस्थेच्या वतीने माउंट कांचनजुंगा शिखरावर सर्वात मोठ्या नागरी मोहीमेचे आयोजन

सजग वेब टीम, जुन्नर

जुन्नर | भारतातील अग्रगण्य गिर्यारोहण संस्था ‘गिरिप्रेमी’ येत्या एप्रिल- मे महिन्यामध्ये जगातील तिसरे उंच शिखर व भारतातील सर्वात उंच शिखर ‘माउंट कांचनजुंगा’वर महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील सर्वात मोठी नागरी मोहीम घेऊन जात आहे. या मोहिमेचा भगवा ध्वजप्रदान कार्यक्रम रविवारी, २४ फेब्रुवारी रोजी किल्ले शिवनेरी येथे पार पडला.

श्री साई बाबा संस्थान, शिर्डीचे अध्यक्ष व हावरे बिल्डर्स व इंजिनियर्सचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. सुरेश हावरे यांच्या हस्ते महाराष्ट्राचा भगवा ध्वज मोहिमेचे नेते उमेश झिरपे व इतर संघ सदस्यांना सुपूर्द करण्यात आला. तसेच, मोहिमेतील सर्व सदस्य, गिरिप्रेमीचे सदस्य व हितचिंतक यांनी श्री शिव छत्रपतींच्या प्रतिमेचे पूजन करून मोहिमेसाठी आशीर्वाद घेतले.
महाराष्ट्राचा भगवा ध्वज म्हणजे शोर्याचे प्रतिक. श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या धीरोदात्त कामगिरीचे, साहसाचे व हिंदवी स्वराज्याचे निशाण. गौरवशाली परंपरेचे प्रतिक असलेला भगवा गिरिप्रेमी आता भारतातील सर्वात उंच शिखरावर घेऊन जात आहे. ही ‘मोहीम महाराष्ट्राची’ असणार आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या नागरी मोहिमेच्या माध्यमातून भगवा ‘माउंट कांचनजुंगा’वर फडकणार आहे.

८५८६ मीटर उंच असलेले ‘माउंट कांचनजुंगा’ हे जगातील उंचीनुसार तिसरे शिखर आहे. तसेच भारतातील सर्वात उंच शिखर आहे. या शिखरावर खूप कमी मोहिमा आखल्या जातात, या शिखरावर आत्तापर्यत फक्त ४०० च्या आसपास गिर्यारोहकच चढाई करू शकले आहेत.

तांत्रिकदृष्ट्या अत्यंत अवघड मानल्या जाणाऱ्या या शिखरावर गिरिप्रेमीने महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील सर्वात मोठी नागरी मोहीम आयोजित केली आहे. चढाईसोबतच ही मोहीम पर्यावरणपूरक असून कांचनजुंगा शिखरपरिसरामध्ये व कांचनजुंगा जैवविविधता क्षेत्रामध्ये पर्यावरण संवर्धनाचे व स्वच्छतेचे विशेष काम मोहिमेअंतर्गत हाती घेण्यात आले आहे.भगवा ध्वजप्रदान कार्यक्रमाच्या माध्यमातून मोहिमेचा श्रीगणेशा करण्यात आला.

Read more...

भारतात साखरेचे उत्पादन घटणार

Source: चीनी मंडी
कोल्हापूर | देशातील काही भागात असलेली दुष्काळी परिस्थिती आणि उसावरील रोगांचा प्रादुर्भाव यांमुळे देशात पुढील हंगामात उसाचे आणि पर्यायाने साखरेचे उत्पादन घटणार आहे. उसाच्या उत्पादनाबरोबरच रिकव्हरी  पण कमी होणार असल्याने साखर उत्पादन ३०० लाख टनाच्या आत येण्याची शक्यता आहे. गेल्या तीन वर्षांतील हे सर्वांत निचांकी उत्पादन असेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

जगात साखर उत्पादनात भारत ब्राझीलशी बरोबरी करत आहे. गेल्या हंगामात ३२२ तर चालू हंगामात ३१५ लाख टन साखर उत्पादन होत आहे. देशाच्या बाजाराची गरज २६० लाख टन साखरेची आहे. त्यामुळे अतिरिक्त साखरेचा प्रश्न गंभीर आहे. परिणामी सरकारने ५० लाख टन साखर निर्यात करण्याचे टार्गेट ठेवले होते. मात्र, यंदा जेमतेम ३० लाख टन साखरच निर्यात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढच्या हंगामाची सुरुवात १२५ लाख टन शिल्लक साखरेने होईल.

महाराष्ट्र, कर्नाटकमधील दुष्काळी स्थितीमुळे लागवडीचे क्षेत्रच घटले आहे. त्यामुळे ऊस उत्पादन कमी होऊन, साखर उत्पादनावरही त्याचा परिणाम होणार आहे, असे मत राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष प्रकाश नाईकनवरे यांनी व्यक्त केले आहे.

Read more...

राज्य सहकारी बँकेने साखरेचे मुल्यांकन वाढवले, साखर कारखान्यांना होणार फायदा

Source: चीनीमंडी
पुणे :  
केंद्र सरकारने साखरेच्या किमान विक्री दरात वाढ केल्याचा सकारात्मक परिणाम दिसू लागला आहे. केंद्राच्या या निर्णयानंतर महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने साखरेचे मुल्यांकन वाढवले आहे. बँकेने १०० रुपयांनी मुल्यांकन वाढवले असून ते आता ३१०० रुपये प्रति क्विंटल झाले आहे. सध्या कॅश फ्लो कमी असल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी देताना अडचणीत आलेल्या साखर कारखान्यांना यांमुळे मदत होण्याची अपेक्षा आहे.

या संदर्भात राज्य सहकारी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक ए. आर. देशमुख म्हणाले, ‘साखर कारखान्यांसाठी प्रति क्विंटल तारण रक्कम २ हजार ६३५ रुपये प्रति क्विंटल करण्यात आली आहे. त्यात बँकेची प्रति क्विंटल ७५० रुपये रिकव्हरी गृहित धरली तर कारखान्यांना ऊस बिल भागवण्यासाठी प्रति क्विंटल १८८५ रुपये मिळतील.’ या संदर्भातील परिपत्रक बँकेकडून साखर कारखान्यांना पाठवण्यात आले आहे.

यापूर्वी बँकेने प्रति क्विंटल साखरेचे ३ हजार रुपये मुल्यांकन केले होते. राज्याच्या काही भागात या महिन्यातच साखर हंगाम संपणार आहे. मराठवाड्यात काही साखर कारखान्यांनी काम थांबवण्याची तयारीही सुरू केली आहे. पण, प्रत्यक्षात १५ एप्रिलपर्यंत हंगाम चालण्याची शक्यता आहे. साखरेची किमान विक्री किंमत वाढवल्यानंतर अनेक साखर कारखान्यांनी तातडीने साखर विक्रीची टेंडर काढली आहेत. पण, बाजारपेठेतून अद्याप त्याला फारसा प्रतिसाद मिळालेला नाही.

बॉम्बे शुगर मर्चंट असोसिएशनचे सरचिटणीस मुकेश कुवेदिया म्हणाले, ‘किमान विक्री दर वाढणार याची चर्चा सुरू झाल्यानंतर अनेक व्यापाऱ्यांनी साखर उचलली होती. त्यामुळे आता नव्या दराने साखर खरेदी होण्याची शक्यता सध्या तरी दिसत नाही.’ सध्या मध्यम ग्रेडच्या आणि छोट्या ग्रेडच्या साखरेच्या दरांतील फरक केवळ ५० रुपयांवर आला आहे. यापूर्वी हा डिफरन्स १०० ते २३० रुपयांच्या दरम्यान होता. सध्या एस शुगर ३१०० रुपये तर एम शुगर ३१५० रुपये क्विंटल दराने विकली जात आहे, अशी माहिती त्यांनी दिली. साखरेची मागणी ही पुढच्या महिन्यापासून वाढेल, असे मतही कुवेदिया यांनी व्यक्त केले आहे. सध्या साखर व्यापारी सरकारच्या घोषणांवर बारीक लक्ष ठेवून आहेत. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सरकार जास्त विक्री कोटा जाहीर करेल, अशी व्यापाऱ्यांना अपेक्षा आहे, असे कुवेदिया यांनी सांगितले.

महाराष्ट्राचा विचार केला तर आतापर्यंत राज्यात ८२ लाख टन साखर उत्पादन झाले आहे. यापूर्वी यंदा राज्यात १०५ लाख टन साखर उत्पादन होण्याचा अंदाज होता. पण, पाणी टंचाई आणि पांढऱ्या अळीचा प्रादुर्भाव यांमुळे आता राज्यातील साखर उत्पादन केवळ ९५ लाख टनापर्यंत मर्यादित राहण्याची शक्यता आहे.

उसाच्या थकीत बिलांचा ताजा आकडा अद्याप समजलेला नाही तरी, सध्याच्या घडीला राज्यात ६ हजार ५०० कोटी रुपयांची थकबाकी असल्याचा अंदाज साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी व्यक्त केला आहे. सध्या २५ टक्केही एफआरपी जमा न केलेल्या साखर कारख्यान्यांची साखर आणि इतर जंगम मालमत्ता जप्त करण्याची कारवाई करण्यात आली आहे, असेही गायकवाड यांनी सांगितले.

Read more...

शिवजयंतीनिमित्त शिवनेरी किल्ल्यावर शिववंदना

मनोहर हिंगणे, जुन्नर (सजग वेब टीम)

जुन्नर | छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या ३८९ व्या जयंतीनिमित्त मंगळवारी (ता. १९) शिवनेरी किल्ल्यावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शिवजन्माचा मुख्य सोहळा सकाळी ९ वाजता होणार असून, या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे यांच्यासह खासदार उदयनराजे भोसले उपस्थित राहणार आहेत.

विविध कार्यक्रमांमध्ये सकाळी ६ वाजता विभागीय आयुक्त दीपक म्हैसकर, जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांच्या हस्ते शिवाई देवीची शासकीय महापूजा होणार आहे. यानंतर पालखी मिरवणूक होणार असून, सकाळी ९ वाजता मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत शिवजन्मस्थानाच्या वास्तुमध्ये पारंपरिक पाळणा सोहळा होणार आहे. यानंतर १० वाजता मान्यवर शिवकुंज इमारतीमधील बाल शिवाजी आणि जिजाऊंच्या पुतळ्याला अभिवादन करणार आहेत. यानंतर मुख्यमंत्री शिवभक्तांना संबोधित करणार आहेत. या वेळी आदिवासी समाज प्रबोधिनीचे तळेश्‍वर पारंपरिक लोककला पथक कला सादर करणार आहेत. शिवनेरीवरील कार्यक्रमानंतर जाहीर सभा ओझर येथे होणार असून, या निमित्ताने जुन्नर तालुक्यातील विविध विकासकामांचे उद्‌घाटन मुख्यमंत्री यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला खासदार शिवाजीराव आढळरावपाटील, आमदार शरद सोनवणे यासह आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

शिवनेरीवरील संग्रहालयासाठी ५ कोटींचा निधी
शिवनेरी संवर्धन आणि विकास प्रकल्पाअंतर्गत पर्यटकांना इतिहासाबरोबर जुन्नर तालुक्याची सातवाहनकालीन माहिती उपलब्ध व्हावी. यासाठी अंबरखाना इमारतीमध्ये संग्रहालय उभारण्यात यावे, अशी मागणी जुन्नरच्या सह्याद्री गिरिभ्रमण संस्थेने राज्य शासनाकडे २००७ साली केली आहे. याबाबत संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची मंत्रालयात भेट घेऊन, संग्रहालयाचा सविस्तर प्रकल्प सादर केला. या वेळी संग्रहालयासाठी ५ कोटींचा निधी देण्याचे आश्‍वासन मंत्री पाटील यांनी दिले आहे. या संग्रहालयाची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस या निमित्ताने करण्याची शक्यता आहे.

Read more...

“वसुधैव कुटुंबंकम…” – स्नेहल डोके पाटील

“वसुधैव कुटुंबंकम”… हि संपूर्ण पृथ्वी हि आपली आहे. हे सांगण्यामागे कारण हे कि मानवता संपूर्ण विश्वात टिकावी. परंतु, रोहिंग्यांचा विषय आला कि हे सगळ खूप मागे पडताना दिसतं.

रोहिंग्या हे मूळचे म्यानमारचे व जातीने अल्पसंख्यांकित मुस्लीम समाजातून असलेले.


म्यानमारच्या पूर्वेकडील अरकान या भागात हे लोक वास्तव्यास होते. परंतु, म्यानमार सरकारने या रोहिंग्याना तुम्ही आमच्या देशातील नव्हे तर, बांग्लादेशातील निर्वासित आहात, म्हणून त्यांच्यावर अत्याचार करायला सुरुवात केली. म्यानमार सरकारने या रोहिंग्या मुसलमानांना पळवून लावण्यासाठी, त्यांचा खात्मा करण्यासाठी अनेक नरसंहार घडवून आणले, अनेक रोहिंगे यात मारले गेले व जे वाचले ते भारत, बांग्लादेश, इंडोनेशिया, थायलंड, मलेशिया व इतर देशांमध्ये पळून आले. २०१२ पासून रोहिंग्या मुसलमानांनी भारत, बांगलादेश व इतर राष्ट्रांमध्ये यायला सुरुवात केली.
सुरुवातीपासूनच बांग्लादेश सरकार रोहिंग्या मुसलमानांना आपल्या राज्यात सामावून घेण्यासाठी इच्छुक नव्हते व सध्या सुद्धा नाहीत. पण, २०१२ च्या सुरुवातीच्या काळात भारताने रोहिंग्या मुसलमानांना आश्रय दिला होता.
आंतरराष्ट्रीय स्तरावर हा विषय घेवून एका पत्रकाराने एका निर्वासित रोहिंग्याची प्रतिक्रिया घेतले तेव्हा, ‘त्याने बांग्लादेश पेक्षा भारतात आम्हांला जास्त नोकरीच्या संधी भारत सरकारने उपलब्ध करून दिला आहेत,’ असे म्हंटले होते.


म्यानमार सरकारने या रोहिंग्याना ‘तुम्ही बांग्लादेशी निर्वासित’ म्हणून मारले, हाकलले व आता बांग्लादेशी सरकार याच रोहिंग्याना ‘तुम्ही विस्थापित’ म्हणून त्यांना सामावून घेत नाहीय.
भारताने २०१२ पासून या रोहिंग्या मुसलमानांना सामावून घेण्याचे, त्यांना नोकरीच्या/रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे धोरण ठेवले होते. परंतु, २०१४ साली भारतात झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाचा मोठा विजय झाला व तेव्हापासून रोहिंग्या मुसलमानांदेखील भारताचे दरवाजे बंद करण्याचे धोरण राबवायला सुरुवात झाली.
सत्तेत आलेल्या मोदी सरकारने या रोहिंग्या मुसलमानांना “दहशतवादी” किंवा “अनधिकृत बंगाली” म्हणून घोषित करण्यास सुरुवात केली. भारतीय समाजाला किंबहुना ‘हिंदू बहुल राष्ट्र’ अशी भारताची प्रतिमा तयार करून रोहिंग्याना अनधिकृत मुसलमान म्हणून त्यांच्यापासून भारताला असुरक्षितता निर्माण होऊ शकते असे अनेक खोटे दावे केले.
हिंदू राष्ट्रभक्त असणाऱ्या या सरकारने मूळ मानवी अधिकारांवर गदा आणत रोहिंग्या मुसलमानांना त्यांच्या मूळ गरजांपासून लांब ठेवले. निवारा, आरोग्याच्या मूळ सुविधा, शिक्षण, कामाची संधी, त्याचप्रमाणे मानवी सन्मानापासून आज हे रोहिंगे मुसलमान कोसो दूर आहेत.
UNHCR मार्फत देण्यात येणारे Refugee Cardsदेखील सरकारने ताब्यात घेतली आहेत. शहरी भागांमध्ये कोणतेही बांधकाम करण्यास या रोहिंग्याना परवानगी नाही.
आज भारतात आलेले रोहिंग्या मुसलमान हे कचरा उचलण्याचे किंवा गटारी साफ करण्यापर्यंतचे काम करू शकतात. त्यांना राहण्यासाठी एखाद्या नापीक भागात झोपडी बांधण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. रोहिंग्या मुसलमानांच्या परिवारातील पाच वर्षापासूनच्या लहान मुलापासून ते वयोवृद्धपर्यंत सगळे हेच काम करताना दिसतात.
मानवी सन्मानाची व्याख्या या रोहिंग्यांसाठी “अल्पसंख्यांकित मुस्लीम” म्हणून बदललेली दिसते.
एवढ्यावरच न थांबता भारत सरकारने या रोहिंग्याना देशातून परत पाठवण्याचे लाजिरवाणे काम देखील केले आहे. अगदी नजीकच्या काळात ३१ रोहिंग्या, ज्यामध्ये १६ लहान मुले, ६ स्त्रियांचा समावेश होता त्यांना भारत-बांग्लादेश च्या सीमेवर माघारी पाठवण्यासाठी सोडण्यात आले. तर नुकतेच २२ जानेवारीला रोहिंग्या मुसलमानांच्या एका टोळीला “बेकायदेशीर विस्थापित” म्हणून अटक करण्यात आले.
रोहिंग्याना भारतातून दिल्या जाणाऱ्या या वागणुकीचा आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील विरोध केला जात आहे.
रोहिंग्या मुसलमान हे म्यानमार मधून भारतात आले म्हणून त्यांना विरोध होत नसून ते “अल्पसंख्यांकित मुस्लीम समाजाचे घटक” असल्याने त्यांना विरोध केला जात आहे. भारतीय संस्कृतीत “अतिथी देवो भव” हे प्रमाण असताना दुसरीकडे संस्कृतीच्या नावाखाली मानवतेची क्रूर चेष्टा करण्याचे काम केले जात आहे. या रोहिंग्या मुसलमानांना “आधार” कार्ड देवून त्यांना भारताचे नागरिक म्हणून सर्व मुलभूत अधिकार देण्यात यावे, हीच एक भारतीय म्हणून सदिच्छ.

Read more...

रोटरी क्लबच्या लाखमोलाच्या मदतीने धामणे शाळेचा कायापालट!

सजग वेब टीम, राजगुरूनगर

राजगुरूनगर | रोटरी क्लब पुणे स्पोर्ट सिटी, रोटरी क्लब पुणे रीव्हरसाईड व रोटरी क्लब अमेरीका व लंडन यांच्या लाखमोलाच्या मदतीने धामणे शाळेचे नूतनीकरण करत सहा महिन्यात कायापालट झाला असल्याची माहिती मुख्याध्यापक धर्मराज पवळे यांनी दिली.


रोटरीने शालेय इमारतीची उंची वाढवून नवीन छत दिले. शालेय इमारतीचे रंगकाम, मुलामुलींना स्वतंत्र शौचालय युनिट, स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सुविधा, शाळेचे भव्य प्रवेशद्वार, ७५ गुंठे शालेय परिसराला तारकुंपणासह संरक्षक भिंत, पेव्हिन ब्लाॅक, सात वर्गांना प्रत्येकी पांढरे फळे, टेबल, कपाटे, खुर्च्या, पंखे दिले. प्रत्येक वर्गात अद्ययावत विज व्यवस्था, ५० बेंच, हार्मोनिअम, तबला, संपुर्ण भजन साहित्य, इ लर्निंग संच, साऊंड सिस्टीम, ग्रंथालय, खेळाचे साहित्य,
आदी सर्व सुविधा रोटरी क्लबने या सहा महिन्यात धामणे शाळेसाठी निर्माण केल्याचे पवळे यांनी सांगितले.
या सार्‍यांचे उद्घाटन व हस्तांतरण सोहळ्यासाठी लंडन रोटरीचे व्हाईस प्रेसिडेंट पाॅल चार्टर, फिलीस चार्टर, अमेरीकेचे रोटरीअन्स बिल एम्सिली, पुणे स्पोर्ट सिटीच्या प्रेसिडेंट रुपिंदर बेरी, विनोद पाटील, संदेश सावंत, मनोजित, जयु हळबे, केनेडी विल्यम्स, त्रिलोक कामदार आदी मान्यवरांसह धामणेचे उपसरपंच काळूराम कोळेकर, शिक्षणविस्तार अधिकारी रोहिदास रामाणे, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष संगिता कोळेकर, बाबाजी सातपुते,संभाजी गिर्‍हे, सत्यवान भोकसे, किरण कोळेकर , अमोल सातपुते, नवनाथ कोळेकर, चंद्रकांत सातपुते आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैलगाडी सफर, मासवडी जेवण व महाराष्ट्रीयन फेट्यांच्या स्वागताने परदेशी पाहुणे भारावून गेले. धामणे शाळेचे सांस्कृतिक कार्यक्रम व अभ्यासातील गतीबद्दल समाधान व्यक्त करुन त्यांनी परकीय चलनांची विद्यार्थ्यांना ओळख करुन दिली.
जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टेपाटील, गटशिक्षणाधिकारी संजय नाईकडे आदींनी रोटरीच्या योगदानाबद्दल धन्यवाद दिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमर केदारी यांनी केले. मारुती जरे व अनिल बोर्‍हाडे यांनी उत्तम संयोजन केले. मंगल निमसे यांनी आभार मानले.

Read more...

जागतिक वारसा यादीतील शिबाम शहराबद्दल…

“जाणून घेऊया जागतिक वारसा यादीतील शिबाम शहराबद्दल”

सजग पर्यटन

एखाद्या वस्तीला शहरी किंवा नागरी वस्ती म्हणुन ओळखायची आजची जी परिमाणे आहेत त्यात नगरांच्या अस्तित्वा सोबतच,तंत्रज्ञानाची प्रगती,सामाजिक स्तरीकरण किंवा आर्थिक जीवनाचा व्यापक पाया व शेतीबाह्य व्यवसायात गुंतलेली मोठी लोकसंख्या यांचा त्यात आपण समावेश करू शकतो पण हे शहरांबद्दलचे आपले आकलन जास्त करून आधुनिक काळातील शहरीकरणातून आकाराला आले आहे,प्राचीन किंवा मध्ययुगीन काळात भारतीय उपखंड व त्याच्या बाहेर पण शहरीकरणाची प्रक्रिया घडून आली होती अशाच एका पण थोड्या भिन्न शहराबद्दल बीबीसीची एक डाॅक्युमेंट्री पाहत होतो तेंव्हा पहिल्यांदा माहिती मिळाली,त्या डाॅक्यूमेंट्रीत पहिल्यांदा “शिबामचा” रेफरंस आला होता मग नेटवर माहिती वाचत गेलो आणि या शहराबद्दल एक अनामिक ओढ वाटू लागली कदाचित इतिहास आवडता विषय असावा म्हणुन किंवा या शहरातचं काहीतर ओढ लावणारं आहे त्यामुळे असेल कदाचित काही बाबी या शहराबद्दल इंटरेस्टींग वाटू
लागल्या..

१६ व्या शतकात येमेन मधे असणार्या आजच्या Hadramaut प्रांतात हे शिबाम शहर आढळते पण मानवी वस्ती या ठिकाणी इ.स. तिसर्या शतकापासून अस्तित्वात होती याचे पुरातत्वीय पुरावे पण सापडतात.हडप्पा संस्कृतीतील शहरे जशी नगरनियोजनासाठी प्रसिद्ध आहेत तसे शिबाम हे तिथं बांधलेल्या अनेक मजली मातीच्या इमारतींसाठी प्रसिध्द आहे.vertical urban construction चा अत्यंत सुंदर आणि असामान्य अविष्कार म्हणजे हे शहर आहे.आज ही या शहरात सहा सात मजली मातीच्या इमारती बांधलेल्या दिसतात लोक त्यांचा वापर करताना आढळतात. “The Manhattan of the desert” असा या शहराचा उल्लेख केला जातो.

मातीमधे सहा सात मजली इमारत बांधायची गरज का लोकांना वाटली असेल? दगडाचे बांधकाम करायचं तर दगड खाणीतून काढायला व घडवायला लोखंडी औजारे हवीत,त्यासाठी लोखंड मुबलक उपलब्ध व्हायला हवं,दगडी इमारती सहा सात मजली उभारल्या तर दगड सांधायला चुना वापरला तर ती इमारत दगडाचा सारा बोजा पेलू शकते का? दगड बांधकाम तुलनेन खर्चिक आहे तेवढी संसाधने लोकांकडे आहेत का? तसे कारागिर उपलब्ध आहेत का? या सार्याचा कदाचित कुठंतरी प्रभाव शिबामच्या मातीच्या इमारत बांधकामावर पडलेला असू शकतो.पण तरीही उपलब्ध असणार्या साधनांतून उभारलेले हे आजचे शहर पण अद्भुतच आहे.

खूप विस्तृत असं हे शहर नाही,शहराला तटबंदी केलेली आहे ती पण माती व वीटांचा वापर करून बनवलेली आहे. दाटावाटीने हे शहर वसले आहे.वीटा तयार करत असताना माती,चुना,गवत यांचा वापर करून तयार केलेल्या वीटा उन्हात सुकवून त्यांचा वापर केला जातो.घरांच्या बाह्यभागाला वारा,वाळू यांच्यापासून जी इजा पोहचते त्यासाठी दरवर्षी मातीचा इमारतींना परत परत गिलावा केला जातो.इमारत बांधताना माती आणि लाकडीचाच वापर केलेला दिसेल.इमारतीत तळमजले जनावरे आणि धान्य ठेवायला वापरले जातात,इमारतीत खालच्या मजल्यापेक्षा वरचा मजला अरूंद होत गेलेला असतो,तर काही वेळा दोन इमारती लहानशा ब्रीजसारख्या भागाने जोडलेल्या दिसतात.मातीच्या व उंच बांधकामामुळे उष्ण प्रदेशात या इमारतीत गारवा निर्माण व्हायला मदत ही होते.

मुळात या वाळवंटी कमी सुपीक प्रदेशात या शहराचा उदय झाला असेल तो कशामुळे? हे शहर काही विशिष्ठ उत्पादनासाठी प्रसिद्ध नाही किंवा आसपास खूप मोठ्याप्रमाणात सुपीक सपाट जमीन आहे व ज्यामुळे शेती पण खूप सघन केली जाते असं पण नाही किंवा हा भूभाग खूप खनिजसंपन्न आहे असं ही नाही,या शहराचा विकास होण्यामागे सर्वात महत्वाच कारण होतं ते म्हणजे व्यापार.ओमानमधून खूप मोठ्याप्रमाणात किंमती धूप/गुग्गुळ सापडतो तो प्रचंड मोठ्याप्रमाणात रोमन साम्राज्यात,इजिप्तमधे पाठवला जायचा ओमान ते भूमध्य समुद्र असा हा उंटांवरून चालणारा प्रवास २०० वगैरे दिवस चालायचा त्यातला एक व्यापारी मार्गाचा टप्पा येमेनमधून जातो आणि त्या व्यापारी मार्गावर हे शहर वसले आहे.

बदलत्या काळाबरोबर नवीन काही प्रश्न या शहरासमोर उभे आहेत.जागतिक तपमान वाढ,घरगुती पाणी वापराच्या बदलत्या पद्धती यातून शिबामच्या अस्तित्वापुढे प्रश्न उभे राहत आहेत.युनेस्कोने जागतिक वारसा यादीत पण या शहराचा सहभाग केला आहे…आज फक्त शिबाम पुरतं परत कधीतर अशाच एखाद्या विषयावर बोलू.

– शरद पाटील

Read more...

रायगडावरील ८४ पाण्याच्या टाक्यांपैकी २१ टाक्यांत मुबलक पाणी साठा : ‘रायगड विकास प्राधिकरण’

रायगडावरील ८४ पाण्याच्या टाक्यांपैकी २१ टाक्यांत मुबलक पाणी साठा : ‘रायगड विकास प्राधिकरण’च्या कामाला गती

रायगड – रायगड विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून विविध दुर्गराज रायगडावर विविध प्रकारची कामे सुरू आहेत. त्यापैकी एक काम म्हणजे गडावरील पाण्याच्या टाक्यांची दुरुस्ती. रायगडावर एकूण ८४ पाण्याची छोटी-मोठी टाकी आहेत. त्यातील ‘हत्ती तलाव’ हे सर्वात मोठं टाकं आहे. सध्या गडावरील सगळ्याच तलावात मोठ्या प्रमाणात गाळ साठला आहे. तसेच गळतीमुळे पाणीसाठा होत नाही. त्यामुळे रायगड प्राधिकरणाच्या माध्यमातून टाक्यांतील गाळ काढून त्यांची गळती शोधण्याचे काम हाती घेण्यात आले होते. पावसाळ्यापूर्वी गडावरील ८४ पाण्याच्या टाक्यांपैकी २१ टाक्यांमधील गाळ काढण्यात आलेला आहे. त्यामुळे पावसाळ्यानंतर आता या २१ टाक्यांमध्ये मुलबक पाणीसाठा झालेला आहे. याशिवाय गडावरील मोठ्या तलावांची गळती शास्त्रोक्त पद्धतीने शोधण्याचे कामही पूर्ण झाले आहे.

हत्ती तलावातील १४ फुटापर्यंतचा गाळ काढण्यात आला असून या तलावात ही मोठा जलसाठा झालेला आहे. या तलावाची गळती शोधण्याचे कामही पूर्ण झाले असून येत्या काळात प्राधिकरणामार्फत त्याची दुरुस्ती करण्यात येणार आहे, संपूर्ण दुरुस्ती झाल्यानंतर गंगासागर तलावाप्रमाणेच हत्ती तलावातही मोठ्या प्रमाणात पाणीसाठा होऊन रायगडावर होणार्या विविध उत्सवांना त्या पाण्याचा उपयोग होऊ शकतो.

प्रसिद्धीसाठी सादर –

Raigad Development Authority (RDA)

Read more...

शिवनेरी किल्ल्यावर साकारणार सातवाहन आणि शिवकालीन वस्तू संग्रहालय

पुणे – छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर सातवाहन आणि शिवकालीन वस्तू संग्रहालय साकारणार आहे. जुन्नरची सह्याद्री गिरिभ्रमण संस्था, डेक्कन कॉलेज आणि भारतीय पुरातत्त्व विभागाच्या सहकार्याने ते उभारण्यात येणार आहे.

जुन्नर तालुक्‍याला इ. स. पूर्व इतिहास असून, त्याची माहिती पर्यटकांना मिळत नाही. यामुळे किल्ल्यावरील अंबरखाना इमारतीमध्ये कायमस्वरूपी माहिती केंद्र आणि शिवकालीन शस्त्रास्त्र संग्रहालय उभारण्यात यावे, अशी मागणी सह्याद्री गिरिभ्रमण संस्थेने १९ फेब्रुवारी २००७ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याकडे केली होती. संस्थेचे अध्यक्ष संजय खत्री यांनी याबाबतची माहिती दिली. या मागणीची दखल घेत तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संग्रहालयाला तत्त्वतः मान्यता दिली. यानंतर भारतीय पुरातत्त्व विभागाने या इमारतीच्या संवर्धनाला सुरवात केली. मात्र, पुढे हा प्रकल्प सरकला नाही.

दरम्यान, खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी राज्य शासन, केंद्रीय सांस्कृतिक मंत्री महेश शर्मा आणि भारतीय पुरातत्त्व विभागाच्या महासंचालिका उषा शर्मा यांच्याशी पत्रव्यवहार केला. ‘सह्याद्री’ने डेक्कन कॉलेजला या प्रकल्पासाठी विनंती केली. यानंतर डेक्कन कॉलेजचे कुलगुरू डॉ. वसंत शिंदे यांनी शिवनेरीसह जुन्नर शहरातदेखील पुरातत्त्व वस्तू संग्रहालय उभारण्याबाबत पुढाकार घेतला. यासाठी डॉ. शिंदे यांनी जुन्नर नगर परिषदेच्या जिजामाता उद्यानातील जागेची मागणी नगर परिषदेकडे केली आहे. नगराध्यक्ष श्‍याम पांडे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, लवकरच ही जागा डेक्कन कॉलेजला हस्तांतर करण्याची तयारी
दर्शविली आहे.

सातवाहन आणि शिवकालीन इतिहासाच्या माहितीसाठी ‘अंबरखाना’ इमारतीमध्ये कायमस्वरूपी माहिती केंद्र आणि संग्रहालय उभारावे, अशी मागणी आम्ही २००७ पासून करीत आलोय. येत्या शिवजयंती सोहळ्यात संग्रहालयाबाबत मुख्यमंत्री सकारात्मक घोषणा करतील, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
– संजय खत्री, अध्यक्ष, सह्याद्री गिरिभ्रमण संस्था, जुन्नर

अंबरखाना ही वास्तू वापरात येऊन चांगले संग्रहालय उभारले, तर हे पर्यटकांसाठी चांगले माहिती केंद्र होईल. या प्रकल्पाच्या परवानग्या आणि निधीसाठी मी केंद्र, राज्य सरकारसह विविध विभागांशी पत्रव्यवहार करीत आहे.
– शिवाजीराव आढळराव पाटील, खासदार

जुन्नर शहर ही सातवाहनांची पहिली राजधानी होती. या ठिकाणी रोमन आणि ग्रीक लोकांची मोठी वसाहत होती. हे डेक्कन कॉलेजच्या वतीने केलेल्या उत्खननातून समोर आले आहे. सुमारे अडीच हजार वर्षांपूर्वीच्या लोकसंस्कृतीची माहिती व्हावी, यासाठी संग्रहालयासाठी आम्ही सकारात्मक आहोत.
– डॉ. वसंत शिंदे, कुलगुरू, डेक्कन कॉलेज (अभिमत विद्यापीठ)

Read more...
Open chat
Powered by