मकर संक्रांत आणि कृषी संस्कृती – राज जाधव

सजग संपादकीय

मकर संक्रांत आणि कृषी संस्कृती – राज जाधव

उत्तर भारतात या दिवशी डाळ व भात यांची खिचडी खातात आणि दान देतात त्यामुळेच तेथे संक्रातीला खिचडी संक्रांती असे म्हणतात.

भारतीय संस्कृतीचा विचार केल्यास भारतातील सण, उत्सव हे सर्व साधारणपणे कृषी संस्कृती तसेच सूर्य-कालगणना आणि चंद्र-कालगणना यावर आधारित आहेत. मकर संक्रांत हा सूर्यकालगणना यावर आधारित तसेच कृषी संस्कृतीशी निगडित असा देशभर साजरा होणारा सण.

संक्रांती म्हणजे सूर्याचे एका राशीतून दुसऱ्या राशीत संक्रमण अथवा प्रवेश होणे. संक्रांती ही प्रत्येक महिन्याला येत असते, सूर्य जेंव्हा धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो तेंव्हा त्या पर्वास मकर संक्रांत म्हटले जाते. या संक्रमणापासून सूर्याचे उत्तरायणाला सुरुवात होते म्हणून या संक्रांतीस उत्तरायणी देखील म्हटले जाते. गृह्यसूत्रे, मस्त्यपुराण, देवीपुराण यामध्ये देखील ह्या उत्सवाचा उल्लेख आलेला आहे, सूर्यकालगणनेशी निगडित असा हा अत्यंत महत्वपूर्ण उत्सव आहे. भारतात हा सण सर्वत्र साजरा केला जातो, मकर संक्रांतीला प्रदेशपरत्वे भिन्न नावे दिसून येतात..

उत्तर भारतात या दिवशी डाळ व भात यांची खिचडी खातात आणि दान देतात त्यामुळेच तेथे संक्रातीला खिचडी संक्रांती असे म्हणतात. बंगालमध्ये यादिवशी काकवीत तीळ घालून बनलेला तिळुआ नावाचा पदार्थ, तसेच तांदळाच्या पिठात तूप-साखर घालून केलेला पिष्टक नावाचा पदार्थ खातात व वाटतात म्हणून तेथे संक्रांतीला तिळुआसंक्रांती व पिष्टक संक्रांती असे म्हणतात. तर पंजाबमध्ये या सणाला लोहडी म्हणतात यादिवशी त्या भागातील लोक आपले पारंपरिक लोकनृत्य करतात तसेच गूळ, रेवडी, भुईमूग शेंगा असे पदार्थ खातात आणि वाटतात.

दक्षिणेत याच वेळी पोंगल नावाचा तीन दिवस चालणारा उत्सव असतो. तामिळ बांधव हा सण नववर्षाचा उत्सव म्हणून साजरा करतात. माघ बिहू किंवा भोगली बिहू हा सण आसाममध्ये याच दिवशी साजरा केला जातो, हा सण पिकांच्या कापणीचे प्रतीक व त्यातून होणारे उत्पन्न या आनंदात साजरा केला जातो. महाराष्ट्रात या सणाला सकरात किंवा सुकरात म्हणतात.

महाराष्ट्रात या सणाचे खूप महत्व असून संक्रांतीच्या आदल्या दिवशी या ऋतूत उपलब्ध असलेल्या सर्व शेंंगभाज्या, फळभाज्या यांंची तिळाचे कूट घालून केलेली मिश्र भाजी, तीळ लावलेली बाजरीची भाकरी तयार केली जाते. तसेच या दिवसांमध्ये शेतात आणि मळ्यांमध्ये आलेल्या धान्याचे वाण एकमेकांना स्त्रिया देतात. हरभरे, ऊस, बोरे, गव्हाची ओंबी, तीळ अशा गोष्टी सुगडात भरून अर्पण करतात. यावरून संक्रांत हा सण कृषी संस्कृतीशी देखील निगडित आहे हे स्पष्टच होते..

मकर संक्रांतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा 💐💐

– राज जाधव

Read more...

लिव्हिंग वॉटरलेस जगणं पाण्याविना…

लिव्हिंग वॉटरलेस जगणं पाण्याविना…

आपल्याकडे पाणी हेच जीवन आहे असं लोकं म्हणतात. उत्तम आरोग्यासाठी पाणी हा सुद्धा एक अत्यावश्यक आणि महत्वाचा घटक मानला जातो.

हाच महत्वाचा घटक कुणाच्या जीवनात एक अडथळाही ठरू शकतो.

अंगाला घाम येईल, रडताना डोळ्यातून अश्रू येतील याची कधी कुणाला भीती वाटेल का? आपल्या अंगाचा संपर्क पाण्याशी येऊ नये असं कुणाला वाटेल का?

जगात कुणा व्यक्तीला पाण्याची ऍलर्जी आहे असं कुणी सांगितलं तर…

होय तुम्ही अगदी बरोबर विचार करताय पाण्याची ऍलर्जी कशी काय असू शकते. सुरुवातीला यावर माझाही विश्वास बसला नाही पण माहिती घेतल्यावर कळलं की जगात असाही एक आजार आहे.

aquagenic urticaria असं या ऍलर्जी शी संबंधित आजाराचे नाव. हा जगातला फार दुर्मिळ ऍलर्जी चा प्रकार आहे.

या विकाराने त्रस्त असलेल्या माणसांना आंघोळही करता येत नाही, घाम आला, रडताना डोळ्यात पाणी आलं तरीही त्रास होतो. पाण्याच्या संपर्कात आल्यानंतर काही मिनिटांत अंगाला खाज सुटणे, पुरळ येणे, ताप येणे, मायग्रेन अशी लक्षणे दिसून येतात. आज जगातील जवळपास १०० माणसे या आजाराने त्रस्त आहेत.

कॅलिफोर्नियातील टेस्सा हॅन्सन-स्मिथ या महिलेला या पाण्याच्या ऍलर्जी च्या आजाराने ग्रासले आहे. टेस्साला वयाच्या ८व्या वर्षापासून या आजाराला तोंड द्यावे लागत आहे. पाण्याच्या संपर्कात आल्यानंतर लगेचच तिला खाज सुटणे, सूज येणे, पुरळ येणे, ताप, मायग्रेनचा त्रास जाणवू लागतो. टेस्सा च्या वयाच्या १०व्या वर्षी या रोगाचे निदान झाले. यामुळे ती कुठला खेळही खेळू शकत नाही आणि कॉलेज कॅम्पस च्या बाहेरही पडू शकत नाही. सुरुवातीला हा साबण किंवा शाम्पू च्या ऍलर्जीचा प्रकार असावा असं तिच्या कुटुंबियांना आणि डॉक्टरांना वाटत होते.

या दुर्मिळ प्रकारच्या ऍलर्जीमुळे टेस्सा ला महिन्यातून फक्त दोनदा आंघोळ करता येते त्याचबरोबर रडताना डोळ्यात पाणी येणे आणि घाम येणे याकडेही विशेष लक्ष द्यावे लागत आहे. तिच्या आईनेच या आजाराचे निदान केले.

“माझी आईच आमची फॅमिली डॉक्टर असल्याने या सर्व विचित्र परिस्थितीत मी स्वतःला भाग्यवान समजते” असं टेस्सा म्हणते.
हे सांगतानाच ती पुढे असं म्हणते

“Aquagenic Urticaria हा आजार म्हणजे नियतीचा मानसिक खेळ आहे. हा आजार कधीही बरा होणारा नाही हे माहीत असूनही दिवसातून जवळपास १२ गोळ्या खाणे म्हणजे कठीणच काम आहे. सुरुवातीला काही काळ दिवसाला १२ गोळ्या खाव्या लागत आता नऊ गोळ्या खाव्या लागतात. त्याचबरोबर मी फार निश्चयी आणि स्वावलंबी असते. माझ्या कॉलेजच्या शिक्षणासाठी मी गाव सोडले. प्रत्येक दिवस आधीच्यापेक्षाही अधिक चांगला वाटतोय आणि एक दिवस हे सगळं थांबेल”

एवढं सगळं सहन करत आयुष्यातील आव्हाने आणि परिस्थितीशी टेस्सा धैर्याने तोंड देत आहे. एक दिवस हे सगळं थांबेल असा तिला विश्वास आहे.

टेस्सा ची माहिती आणि या ऍलर्जी विषयीची जनजागृती करण्यासाठी इन्स्टाग्रामवर @livingwaterless या नावाची एक प्रोफाईल तयार करण्यात आले आहे. या मधून या दुर्मिळ आणि विचित्र अशा आजाराविषयी ची महत्वाची आणि संशोधनात्मक माहिती लोकांपर्यंत पोहोचवली जात आहे.

जगातील या दुर्मिळ आजाराविषयी माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने हा लेख मी लिहिला आहे.

– स्वप्नील ढवळे
मुख्य संपादक, सजग टाईम्स न्यूज

माहिती स्रोत- ग्रीनलेमन संकेतस्थळ

Read more...

युवकांना दिशा देणारे सहृदयी, समाजशील नेतृत्व

युवकांना दिशा देणारे सहृदयी, समाजशील नेतृत्व

स्वप्नील ढवळे,
मुख्य संपादक, सजग टाईम्स न्यूज

रात्री दौऱ्यावरून कितीही वाजता घरी आले तरी सकाळी कुठल्या तरी गावची दशक्रिया किंवा काही कार्यक्रमास पोहचण्यासाठी पुन्हा सकाळी त्याच ऊर्जेने तयार, दौरा संपवून रात्री एक वाजता आपल्या तापाने फणफणलेल्या मुलीला भेटायला पुण्याला जाणारा बाप असो की मायेने आपल्या कार्यकर्त्यांची विचारपूस करणारा, सर्वांना सोबत घेऊन काम करणारा कौटुंबिक आधार असो या व्यक्तीच्या एकंदरीत व्यक्तिमत्वाची विविध अंगे स्पष्ट करतात.

प्रत्येक व्यक्तिमत्वाला अनेक पैलू असतात, परंतु हे पैलू आपोआप पडत नाहीत. माणसाच्या जीवनात येणाऱ्या अनुभव आणि प्रसंगांना ती व्यक्ती कोणत्या पद्धतीने सामोरी गेलेली असते यावरून त्या व्यक्तीचे पैलू ध्यानात येत असतात. असंच विविध अनुभवांमधून पैलू पडत चाललेलं व्यक्तिमत्त्व म्हणजे जुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते अतुल बेनके.

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर अतुल बेनके यांच्या भूमिकेकडे संपूर्ण जुन्नर तालुक्याचे लक्ष होते. कारण काँग्रेस राष्ट्रवादी च्या अनेक युवा नेत्यांनी सत्ताधारी पक्षाची वाट धरली होती. अपवादात्मक काही नेते सोडले तर इतरांनी भाजपची वाट धरली होती. जुन्नरचं युवा नेतृत्व अतुल बेनके यांनी मात्र पराभवानंतरही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची साथ सोडली नाही उलट जुन्या कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेत निष्ठावान सखासोबती सारखं अभियान राबवलं, तालुक्यातील विविध कार्यक्रमांना उपस्थित राहून जबरदस्त जनसंपर्क वाढवला, कार्यकर्ता मेळावे असतील विविध आंदोलने असतील सतत कार्यकर्त्यांमध्ये राहून राष्ट्रवादी काँग्रेस चा जनाधार वाढवला. या सातत्यपूर्ण कामगिरीची प्रचिती जिल्हा परिषद निवडणुकीत दिसून आली राष्ट्रवादीने तालुक्यात जुन्नर नगरपरिषदेत चांगलं यश संपादन करून सर्वाधिक जिल्हा परिषद सदस्य निवडून आणले तसेच नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत आघाडीच्या सर्व नेत्यांना सोबत घेऊन काम करणारा संघटक म्हणून त्यांनी आपली एक वेगळी छापही पाडली.

प्रत्येक व्यक्तीची एक काम करण्याची पद्धत असते. गरज असेल तिथे आक्रमकता आणि अभ्यासू वृत्ती हे गुण संयुक्तपणे अतुल बेनके या व्यक्तीमध्ये दिसतात. पुणे नाशिक बायपास आणि चाळकवाडी टोलचा प्रश्न ज्या पद्धतीने त्यांनी हाताळला जिल्हाधिकारी कार्यालय, NHAI च्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून या प्रश्नाचा केलेला पाठपुरावा असेल. बायपास आंदोलनावेळी भर पावसात केलेलं तडफदार भाषण हे त्यांच्यातील आक्रमकता अधोरेखित करते.

जुन्नर तालुका क्रिकेट असोसिएशन, पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशन च्या माध्यमातून जुन्नर तालुक्याच्या कबड्डी संघाला आणि एकूणच त्या खेळाला त्यांनी दिलेलं बळ हे निश्चितच कौतुकास्पद आहे, सर्व जिल्हा परिषद शाळांचा एकत्रितपणे घेतलेला सांस्कृतिक महोत्सव, नृत्यस्पर्धांचे आयोजन असेल, फुटबॉल सारख्या खेळाकडेही जाणीवपूर्वक लक्ष देणे या सारख्या विविध उपक्रमांकडे आणि कार्यक्रम पाहिल्यानंतर या प्रत्येक क्षेत्राकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन या व्यक्तीकडे आहे अस आपण म्हणू शकतो.

आपल्या तालुक्यातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन आणि त्याची तयारी करण्याची संधी जुन्नर तालुक्यातच उपलब्ध व्हावी म्हणून युनिक अकॅडमी सारख्या नामवंत संस्थेचे नारायणगाव याठिकाणी प्रत्येक शनिवारी आणि रविवारी MPSC, UPSC सारख्या विविध स्पर्धा परीक्षांचे वर्ग त्यांनी चालू केले.इयत्ता दहावी मध्ये ९०% पेक्षा अधिक गुण मिळणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांनी ‘अतुलनीय शिष्यवृत्ती’ सारख्या संकल्पनेतून प्रत्येकी एक ते दिड लाख रुपयांची शिष्यवृत्ती देऊन गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचं काम केले. त्याच बरोबर अनेक गरीब आणि गरजू मुलांच्या शिक्षणाची जबाबदारीही त्यांनी आपल्या खांद्यावर घेतली आहे. ‘अनिक्क्षा’ या त्यांच्या पहिल्या मुलीच्या जन्माचे स्वागत त्यांनी ५१ अनाथ मुलींचे पालकत्व स्वीकारून केले. या मुलींना दत्तक घेऊन त्यांची सर्व जबाबदारी घेतली आणि समाजासमोर मुलीच्या जन्माचे स्वागत करण्याचं एक उदाहरण ठेवले.

पिंपळगाव जोगा येथील शाळेच्या नवीन इमारत बांधणीसाठी केलेली मोठी मदत तसेच करिअर मार्गदर्शन, नोकरी मेळावे, कॉलेज कट्टा, विद्यार्थी संवाद यांसारखे उपक्रम पाहिल्यानंतर शिक्षण या क्षेत्रातही अतिशय उल्लेखनीय काम उभं करण्याचं उद्दिष्ट्य त्यांच्या या विविध उपक्रमांमधून दिसून येते.
पुण्यासारख्या शैक्षणिक सुविधा आपल्या तालुक्यातील विद्यार्थ्यांना इथेच मिळाल्या पाहिजेत हा त्यांचा प्रयत्न आहे. त्यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात.

महिलांना उद्यमशील आणि स्वयंपूर्ण बनविण्यासाठी त्यांच्या पत्नी गौरी बेनके यांना त्यांचे कायम मार्गदर्शन असते, पेपरबॅग्स बनविण्यासारखे उद्योग तसेच इतरही सामाजिक उपक्रमांना एक व्यासपीठ उपलब्ध व्हावे म्हणून त्यांनी अंजनी उन्नती फाऊंडेशन सारख्या संस्थेची स्थापना ही केली आहे. आशावर्कर्स, अंगणवाडी मदतनीस यांसारख्या घटकांकडे त्यांच्या प्रश्नांकडे त्यांचे लक्ष असते. रक्षाबंधन सारखा सण एवढ्या मोठ्या प्रमाणावर साजरा करणारा दिलदार भाऊ अस म्हंटलं तरी वावगं ठरू नये.

शेतकरी संपात पिंपरी पेंढार याठिकाणी शेतकऱ्यांसोबत झोपून रात्र काढणारा, कांदा उत्पादक आंदोलन असेल शेतीच्या पाण्याचा प्रश्न असेल त्याठिकाणी हा नेता आपल्या परीने जे जे करता येईल ते करत असतो. मीना खोऱ्यातील१२ गावांतील शेतकऱ्यांसाठी पाटबंधारे खात्यातील अधिकाऱ्यांशी चर्चा करून पाणी सोडण्याची मागणी मान्य करण्यास भाग पाडले. सत्ता नसतानाही अधिकाऱ्यांशी आणि पक्षातील नेतृत्वाची ताकद वापरून ज्या पद्धतीने प्रश्न हाताळले ते प्रशंसनिय आहे.

आदिवासी भागात पडलेल्या दुष्काळ दौऱ्यात स्वतः शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पिकांची पाहणी करणारा त्यांच्यात मिळून मिसळून त्या बांधवांसोबत भाकरी खाणारे जागृत नेतृत्व म्हणून त्यांच्या या दौऱ्याकडे पाहिले गेले.

शाळेत जाणाऱ्या विद्यार्थिनी रस्त्याने पायी चालल्या होत्या विचारपूस केली असता कळले की त्यांचे पास संपले असल्या कारणाने त्या पायी चालल्या होत्या बेनके यांनी त्याच वेळी रस्त्याने जाणारी एक एसटी थांबवली आणि नवीन पास काढण्यासाठीची तरतूद करून त्या सर्व विद्यार्थिनींचे त्या दिवसाची तिकिटे काढून त्याचे पैसे वाहकाला दिले हा याच दौऱ्यात घडलेला एक प्रसंग आपल्याला त्यांच्यातील एक सहृदय माणूस दाखवतो.

नारायणगाव येथे झालेल्या राजे शिव छत्रपती प्रतिष्ठान च्या शिवजयंती कार्यक्रमात
“मी तुम्हांला मदत करू शकलो नाही हे मी माझे दुर्भाग्य समजतो” असे नारायणगावचे सरपंच योगेश (बाबूभाऊ) पाटे यांच्याबद्दल त्यांनी काढलेले कौतुकास्पद उदगार. समोरची व्यक्ती राजकीय क्षेत्रात असूनही त्यांचं केलेलं कौतुक तेही एवढ्या मोठ्या जनसमुदाया समोर म्हणजे हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आणि त्यांनी दाखवलेल्या समंजसपणाचं मूर्तिमंत उदाहरण आहे.

रात्री दौऱ्यावरून कितीही वाजता घरी आले तरी सकाळी कुठल्या तरी गावची दशक्रिया किंवा काही कार्यक्रमास पोहचण्यासाठी पुन्हा सकाळी त्याच ऊर्जेने तयार, दौरा संपवून रात्री एक वाजता आपल्या तापाने फणफणलेल्या मुलीला भेटायला पुण्याला जाणारा बाप असो की मायेने आपल्या कार्यकर्त्यांची विचारपूस करणारा, सर्वांना सोबत घेऊन काम करणारा कौटुंबिक आधार असो या व्यक्तीच्या एकंदरीत व्यक्तिमत्वाची विविध अंगे स्पष्ट करतात.

२०१३ चा लोकमत वृत्त समूहाचा राजकिय क्षेत्रातील युथ आयकॉन अवॉर्ड तसेच बांधकाम व्यावसायिक म्हणून पुणे सारख्या शहरात कमावलेला नावलौकिक आणि विश्वासार्हता असो.

बेनके कुटुंबियांचं गेल्या अनेक वर्षांपासून अनेक उपक्रम आणि मदतकार्य अखंडपणे चालू आहे. अनेकांना उभं केलं बळ दिलं संकटकाळी मागे उभे राहिले. परंतु हे आम्ही केलं ते आम्ही केलं स्वतःबद्दल उगाचच कधीही प्रौढी न मारणारे जनतेसंबंधी एक कणव आणि समर्पण भावना असलेलं सहृदयी नेतृत्व म्हणून अतुल बेनके हे उदयास आले आहेत.

अतुलजी बेनके आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा लवकरच तालुक्याची जबाबदारी तुमच्या खांद्यावर पडो याच मनापासून सदिच्छा. 💐

Read more...

डिजिटल युगातील स्मार्ट उद्योजक अरुण काळे

 

“डिजिटल मार्केटिंग हे पारंपरिक मार्केटिंगपेक्षा वेगळे नाही; फक्त मार्केटिंगची पद्धत बदलली आहे. अनेक उद्योग सुरू होतात, मात्र ते त्यांच्या एका ठराविक कक्षेपुरतेच मर्यादित राहतात. यामुळेच मी इतर उद्योगांना बळ देणारा उद्योग सुरू करण्याचा निर्णय घेतला. व्यवसाय करणे माझ्यासाठी सोपे नव्हते; कारण मला व्यवसाय कसा करावा, हे अजिबात माहीत नव्हते.”

स्मार्ट फोनच्या जमान्यात अरुण काळे यांनी ’स्मार्ट उद्योजक’ होण्याचा निर्णय घेतला आणि इतर उद्योजकांना याचा कसा फायदा मिळेल, या विचाराने डिजिटल मार्केटिंग हा आव्हानात्मक उद्योग सुरू केला. त्यांच्या व्यवसायाला ‘महालक्ष्मी पब्लिसिटी’ या नावाने ओळख मिळाली अरुण काळे म्हणतात,

‘‘डिजिटल मार्केटिंग हे पारंपरिक मार्केटिंगपेक्षा वेगळे नाही; फक्त मार्केटिंगची पद्धत बदलली आहे. अनेक उद्योग सुरू होतात, मात्र ते त्यांच्या एका ठराविक कक्षेपुरतेच मर्यादित राहतात. यामुळेच मी इतर उद्योगांना बळ देणारा उद्योग सुरू करण्याचा निर्णय घेतला. व्यवसाय करणे माझ्यासाठी सोपे नव्हते; कारण मला व्यवसाय कसा करावा, हे अजिबात माहीत नव्हते.

काही दिवस घरूनच काम करण्याचा निर्णय घेतला. एक लॅपटॉप आणि डेटा कार्डच्या मदतीने ‘डिजिटल मार्केटिंग’चा व्यवसाय घरूनच सुरू झाला. अनेक चांगले ग्राहक मला मिळत गेले. त्यातूनच आर्थिक बळासह आत्मविश्‍वास दुणावला. लोक मोबाईल फोन आणि लॅपटॉप अधिक वापरत असल्याने कंपन्यांचा डिजिटल मार्केटिंगवर भर असतो. एकूणच व्यवसाय ‘लोकल टू ग्लोबल’ करण्यासाठी ते महत्त्वाचे आहे. लोकांचे प्रॉडक्‍ट (उत्पादन) किंवा सर्व्हिसेस (सेवा) किंवा ब्रॅंडबद्दल जागरूकता निर्माण करून त्यांची विक्री कशी वाढवता, येईल यासाठी मी प्रयत्न करत गेलो.’’अनेक उद्योजक सुरवातीला स्वतःची वेबसाइट बनवण्यासाठी आग्रही असायचे, पण फक्त वेबसाइट बनवून किंवा व्यवसाय सुरू करून कधीच बिझनेस मिळत नाही. ती वेबसाइट किंवा तुमचा व्यवसाय लोकांपर्यंत पोचायला हवा. हेच अरुण काळे यांनी प्रत्येक वेबसाइट बनवणऱ्याला सांगितले.अशा पद्धतीने एक-एक प्रॉडक्‍ट वाढत गेला आणि त्यांची कंपनी आज डिजिटल मार्केटिंगच्या १५ ते २० सर्व्हिसेस देते.

डिजिटल मार्केटिंग करण्यासाठी वेबसाइट, सोशल मीडिया, सर्च इंजिन, गुगल ॲडव्हाइस, मोबाईल ॲप्स, ई-मेल यांसारख्या विविध इंटरनेटवरील माध्यमांचा वापर केला जातो.सध्या जगातील एकूण इंटरनेट यूजरपैकी ८० टक्‍क्‍यांहून अधिक लोक स्मार्ट फोनचा वापर करत असल्याने या लोकांपर्यंत पोचण्यासाठी आपल्या कंपनीचे, वस्तू किंवा सेवांची माहिती असलेले मोबाईल ॲप तयार करणे ही आजच्या काळाची गरज आहे. कंपनीच्या मोबाईल ॲप्सद्वारे लोक त्यांना हव्या असलेल्या वस्तू किंवा सेवा विकत घेऊ शकतात. डिजिटल मार्केटिंग ही बदलत्या काळाची गरज आहे. अरुण काळे म्हणतात, ‘‘प्रत्येक व्यवसायात चांगला फायदा मिळविण्यासाठी डिजिटल मार्केटिंगचा आराखडा असणे गरजेचे आहे.

त्यामुळे सध्याच्या जगात कसला ’ट्रेंड’ सुरू आहे, हे ओळखून कौशल्य मिळवा आणि कामाला लागा. यश स्वतःहून तुमच्याकडे चालत येईल. सध्या हा माझा व्यवसाय चाकण या शहरात चालु आहे .
वर्षाला एक ते दोन लाख रुपये मिळायचे. आता व्यवसायात वाढ करून व्यवसाय पाच ते सहा लाखापर्यंत पोचला आहे. मी आतापर्यंत 70 हुन अधिक लोकांना रोजगार दिला,नाशिक,जुन्नर ,आंबेगाव ,राजगुरुनगर,चाकण,पुणे,भोसरी,सतारा,बारामती या ठिकाणी माझी कंपनी सर्व्हिस देण्याचे काम करत आहे.

अनेक युवा तरुण व्यवसायिकांना हा ’डिजिटल मार्केटिंग’चा व्यवसाय कसा सुरू करायचा हे सांगितले आहे. ज्यांनी नुकताच व्यवसाय सुरू केला आहे, त्यांना मी एवढेच सांगेन की, प्रामाणिकपणे काम करा. ग्राहकांना सांभाळा, तुमची सर्व्हिस चांगली द्या आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचा. यावरच कोणत्याही व्यवसायाचे यश अवलंबून असते.

पुढील येत्या काळात जाहिरातीच्या नवनवीन संकल्पना तयार करुन त्यावर कामे केले जाईल असे अरुण काळे यांनी आपल्या प्रतिक्रियेमध्ये म्हंटले आहे.

Read more...

Happy नसलेला पर्यावरण दिन

Happy नसलेला पर्यावरण दिन. 

सजग संपादकिय – तेजल देवरे

मानवी मन जितकं संवेदनशील आहे, कधी कधी तितकाच निष्ठूर मानवी स्वभाव भासतो. निसर्ग आपल्या गरजा पूर्ण करू शकतो; पण आपली हाव मात्र पूर्ण होऊ शकत नाही. असं गांधीजींनी विसाव्या शतकात सांगूनही आपण (किमान गांधीजींचे देशवासी) आपली हाव काही कमी करायला तयार नाही. म्हणजे एखाद्या महान व्यक्तिमत्वाला महात्मा, राष्ट्रपिता अशी संबोधनं लावून आपण विषयाला आवर घालत असतो. कारण त्यांचे विचार कृतीत आणणं जड़ जात असतं. कृती अवघड असू शकते पण सगळ्यांनी एकत्र येऊन करायचं ठरलं तर तिला सहजता प्राप्त होते. परंतू, सगळ्यांना एकत्रही यायचं नाहीये आणि ठरवायचं तर मुळीच नाहीये. खरंतर, आपण आपल्या आईसाठी काय करू शकतो? हा प्रश्न एकदा स्वतःला विचारायला हवा. उत्तर होकार्थी येते तर, सगळ्या सजीवांना पोटात घेणाऱ्या धरणीमाई बद्दल आता प्रश्न विचारायची वेळ आली आहे. आणि उत्तरांवर अंमलबजावणी करण्याची चालू क्षणा खेरीज दुसरी योग्य वेळ असूच शकत नाही. कारण पर्यावरणाचा ऱ्हास मानवाने केला आहे मग उपाययोजना देखील मानवानेच करायला हव्या.
पर्यावरणातील एक एक घटकाचे ऋण आपण जाणतो. वातावरणातील हवा, शिलावरणातील दगड, जलावरणातील पाणी आणि ह्या सगळ्यांना भेदणारे जीवावरण ही विविधतेला सामावून घेणारी एक उत्तम सांगड आहे. काही गरजा आणि त्यातून जन्म घेणारा स्वार्थ यामुळे ही सांगड मोडकळीला आली. पण जैव विविधतेचं महत्व आपण जाणतो तर त्यासाठी योगदान देणंही कर्मप्राप्तच आलं. शेवटी, आपणही ह्या विविधतेतीलच एक घटक आहोत. गोष्टी सामान्य माणसासाठी किंचित दूरच्या असल्या तरी माधव गाडगीळांसारखे काही ज्येष्ठ शास्त्रज्ञ आपलं सर्वस्व पणाला लावून फक्त पर्यावरणासाठी झटत असतात. सरकार येतात, जातात पण शास्त्रज्ञांनी वैज्ञानिक आधार घेऊन बनविलेले अहवाल मात्र सगळयांनाच खोट्या विकासाआड़ येणारे वाटतात. तसं असेल तर, का येतात आपत्ती? त्या खरंच 100 टक्के नैसर्गिकच असतात का? आता तरी ह्याचा विचार केला पाहिजे. अहवाल मान्य नसतील तर किमान त्यांचा विपर्यास करणे टाळले पाहिजे. अहवाल दडपणे सोपे आहे; पण सत्य कसे दडपले जाईल? ते आपत्तींच्या रूपाने सर्वांसमोर उभे ठाकतेच..
उत्तम वेव्हारे निसर्गा राखोनी।
विकास साधू या विवेकाने!
माधव गाडगीळांनी असं म्हणून मांडणी खुप सोपी केली. कमीत कमी पर्यावरणीय कायद्यांनुसार वागणे.. यात कोणाचेच काही नुकसान नाहीये. विकास तर जन्म घेईलच अधिक आपण जन्म घेतलेल्या सृष्टीचे सौंदर्य देखील अबाधित राहील. आणि येणाऱ्या पिढया सुद्धा सुरक्षित राहतील जेणेकरून त्यांना अजून एका ग्रहाला दूषित करण्याची संधी मिळता कामा नये. दिवंगत थोर वैज्ञानिक स्टीफेन हॉकिंग्स यांनी मानवाचा हावरट पणा असाच राहिला तर पृथ्वीचं पुनर्वसन करण्याची वेळ येईल असं काही वर्षांपूर्वीच म्हटलं होतं. म्हणजे पृथ्वी मानवाला राहण्यास अनुकूल असणार नाही; पण पर्यावरणाचा ऱ्हास होतो याचा अर्थ मानवी आरोग्यावरही त्याचा परिणाम होतो. तिकडे अंतराळात मानवी बुद्धीचा आविष्कार म्हणून संशोधन चालू असेल आणि इकडे सामान्य माणूस पृथ्वीवरची सोय संपली म्हणून ग्रह बदलासाठी तयार असतील. पण शरीरच साथ देत नसेल तर हा बदल नियम तरी काय कामाचा? आणि असं करणं म्हणजे आपल्या स्वार्थी पणाचं एक वेगळं रूप असेल ते..
व्यवस्था हे विसरून जाते की, ते स्वतः सुद्धा ह्या निसर्गाचे घटक आहेत आणि यामुळेच फक्त नफ्या पोटी बेकायदेशीर स्टोन क्रशर वापरले जाते. त्यामुळे खुप मोठ्या प्रमाणात धूलिकण हवेत विरतात. याचा परिणाम आरोग्यावर होतो. धुळीची एलर्जी असतांना इतके धूलिकण नाका तोंडात गेले तर श्वासोच्छवासाला अडचण येते आणि मनुष्यबळ एका तरहेने अकार्यरत बनते. बेकायदेशीर खाणकाम आणि त्याचे परिणाम यावर वृत्तपत्रांचे मथळे भरून आले तरी राज्यव्यवस्था आपले डोके भरून ही गोष्ट लक्षात घ्यावयास तयार नाही. हे असेच चालू राहिले तर सौन्दर्याचे भूषण असणारे पश्चिम घाट कधी दुःखाचे कारण बनेल सांगता येत नाही. जगभरात चांगले वाईट उदाहरणं तर आहेतच पण जवळच साध्या राज्यात आणि भारतातही त्यांची कमतरता नाही. माळीण सारखं एक संपूर्ण गांव नामशेष होतं म्हणजे काय? शेवटी निसर्ग हाच राजा असतो. त्याला समानते साठी कुठल्या कलमाची गरज नाही. तो हेच योग्य आहे म्हणून वेळेत न्याय निवाड़ा करतो. आपण त्याला ओरबाडलं तर तो आपल्याला स्वतःच्याच मातीत जागा देतो.
पर्यावरणाचा विचार करणं म्हणजे अविकसितपणाचं ते लक्षण आहे. असं वाटतं असेल तर जगातील सगळ्यात आनंदी, प्रगत आणि निसर्गाला पूरक अशा नॉर्वे, डेन्मार्क, जर्मनी, आणि स्वीडन या राष्ट्रांकड़े पाहिले पाहिजे.
संध्याकाळी नदीच्या काठी बसून आयुष्याचा आनंद घेणे वगैरे सारख्या कल्पना, पुढच्या काही पिढ्यां साठी भाकड कल्पना म्हणूनच उरण्याची भीती वाटते. कारण अलिकडे, नदयांचं संवर्धन नाही झालं तर त्या हळू हळू नष्ट होतील अशी शंका उपस्थित केली जातीये. हे भविष्य असलं तरी वर्तमानात देखील नदीकाठच्या दुर्गंधी मुळे हवा तो आनंद मिळू शकत नाही. धर्म सांगतो म्हणून नदीची आरती करता येते पण त्या आरती मागची शिकवण विसरून जागीच निर्माल्य वाहिले जाते. आरतीने काहीच होत नसले तरी केर क़चर्याने नदी प्रदूषित होते आणि पर्यायाने तिचं पाणी पिउन सजीव धोका पत्करत आहेत, हे सुद्धा प्रगतीची कास धरणारा माणूस समजू शकत नसेल तर यापेक्षा दूसरी अधोगती नसावी.
पर्याय म्हणून सेंद्रिय व्यवस्था, सौर ऊर्जा यांचा
उपाय सांगितला जातो. हळूवार, खर्चिक अशा या गोष्टी असल्या तरी असाध्य नाही आहेत. शक्य तिथे यांचा वापर व्हावयास हवा. सौर ऊर्जे वर आधारित विमान या संकल्पनेचे जनक बट्रांड पिकार्ड यांनी अपारंपरिक ऊर्जेला प्रोत्साहन दिल्यास जागतिक पर्यावरणाचा प्रश्न सुटण्यास मदत होईल असे म्हटले होते. ‘सोलर इम्पल्स 2’ हे विमान चालविणारे वैमानिक बोशबर्ग या वैमानिकाने देखील सौर क्षेत्रात जनजागृती व्हावी ह्या उद्देशाने सौर विमानाच्या सहाय्याने जग भ्रमन्तिचं पाऊल उचलल्याचं म्हटलं आहे. कारण, जेवढा जीवाश्म इंधनांचा वापर जास्त, तेवढं कार्बन डायऑक्साइड चं उत्सर्जन जास्त.. यामुळे ग्लोबल वॉर्मिंग ची समस्या वाढीस लागून, हवामान बदल, अतिदुष्काळ जन्य परिस्थिती उद्यास आली आहे. तिसरे विश्व महायुद्ध पाण्यामुळे नाही झाले म्हणजे मिळवले, अशी जगाची सद्य स्थिती आहे. वर्षाला शंभर कुटूुंबं वापरतील एवढं पाणी पंच तारांकित हॉटेल्स मध्ये 180 लोकं 55 दिवसांत वापरतात. ह्या सर्वाचा विचार केला तर शेतकरयावर किंवा इतर काही दुष्काळी भागातील माणसांवर त्यांचीच बांधवं अन्याय करतात असे दिसते.
आंतरराष्ट्रीय शिखरे म्हणजे शोभेच्या बाहुल्या आहेत. त्यातही ‘ट्रम्प विचार’ हे सर्व थोतांड आहे असं म्हणत पॅरिस करारातून बाहेर पडतात, म्हणजे पूर्वी सुधारणा नव्हती आणि आता चुकीची जाणीवही नाही. माणसं, पर्यावरण असं सर्वांचंच शोषण करणाऱ्या भांडवलशाही कडून आणखी अपेक्षा ती काय करणार? या सर्वांतून धड़ा घेऊन मिश्र व्यवस्था स्वीकरणाऱ्या भारताने तरी आपले योगदान द्यावे, शेवटी भारताला ‘गांधी विचार’ लाभले आहेत, हे विसरून चालणार नाही. संपूर्ण जगात एक माणूस, प्रति वर्षी दिड टन कार्बन उत्सर्जना साठी कारणीभूत असतो. यात आघाडीवर चीन-28%, अमेरिका-14%, यूरोपियन महासंघ- 10%, आणि भारत-7% आहे. 2014 मध्ये 9.9 अब्ज टन इतके कार्बन उत्सर्जन झाले होते, ते 2013 पेक्षा 2.5 टक्के अधिक होते. क्योटो करारा नुसार हे प्रमाण 1990 पेक्षा 61 टक्क्यांनी अधिक आहे. भारतात 2022 पर्यन्त सौर व्यवस्थेचे ध्येय आहे, त्याला कृतीची जोड़ मिळाली तर पर्यावरणाचे संवर्धन शक्य होईल. भारतात गुजरात ला ‘सोलर सिटी’ करण्याचे आश्वासन राज्य कर्त्यांनी दिले आहे. ह्याच राज्यकर्त्यांनी समुद्रावर अन्याय करत महापुरुषांचे पुतळे उभारण्याचे देखील आश्वासन दिले आहे. आपल्या उक्ती आणि कृतींमध्ये समन्वय राखायला ही व्यवस्था कधी शिकणार कोणास ठाऊक?
रसायनांचा घातक मारा पावसावर निर्बंध आणतोय, ह्या छोट्या पण मोठा परिणाम करणाऱ्या गोष्टींकडे आता आपण लक्ष दिले पाहिजे. प्लास्टिक वाचून काही गोष्टी आडत असतील तर 50 मैक्रॉन च्या वरील प्लास्टिक चा वापर असं नियमाला धरून वागू शकतो पण नियंत्रण ही गोष्ट जणू अशक्य आहे असं हल्ली आपण दाखवून देतो आणि मग थेट बंदी कड़े वळतो. अनेक प्रकारच्या प्रदूषणांपैकी ध्वनी प्रदूषणाकड़े सातत्याने दुर्लक्ष केले जाते. पण ती एक गंभीर बाब आहे. भोंगे असो वा डीजे प्रश्न भावनांचा नाही कानांचा आहे. आणि ते सर्वच धर्मियांना असतात, हे सांगण्याची बालिश वेळ येण्या इतपत माणूस वागतोय. दोन महिन्यांपूर्वी, आर्क्टिक ध्रुवावर, संपत आलेल्या बर्फा वर बसून समुद्राकडे पोलार बीअर पाहत असल्याचा फ़ोटो इंस्टाग्राम वर पाहिला होता. काही वर्षांपूर्वी बर्फ नसलेल्या आर्क्टिकची भीती शास्त्रज्ञांनी बोलून दाखवली होती, तिचं भयानक रूप पोलार बिअर्स च्या डोळ्यांत दिसून येतं. आपल्या चुकांमुळे ह्या जिवांनी कुठे जायचं? माणूस काहीही करेल पण हे जीव कुठून आणणार स्वतः साठी बर्फ?
इ वेस्ट ही एक समस्या पर्यावरणा पुढे आहे. तिचे वेळीच व्यवस्थापन व्हायला हवे.
शेवटी, पृथ्वी, नदया, समुद्र, डोंगर, दरया हे फक्त साहित्याचा भाग म्हणून वापरायचे की येणाऱ्या पिढीला चांगल्या स्वरुपात दाखवायचे? हे आजच मनाशी ठरवूया.. आणि आपल्याला सुख देणाऱ्या पर्यावरणाला आपणही सुख देऊया.

Read more...

नोकरी, शिक्षण आणि बाजार…

नोकरी, शिक्षण आणि बाजार…

सजग संपादकीय

 

प्रगती, विकास ह्याचा विचार करावसं हल्ली कोणत्याच क्षेत्रातल्या प्रतिनिधींना वाटत नाहीये.
फक्त सगळ्यात जास्त तरुणांचा देश असं ओरडत सांगून कोणी महासत्ता होणार नसतं. आणि का व्हायचयं महासत्ता?

प्रगती, विकास ह्याचा विचार करावसं हल्ली कोणत्याच क्षेत्रातल्या प्रतिनिधींना वाटत नाहीये.
फक्त सगळ्यात जास्त तरुणांचा देश असं ओरडत सांगून कोणी महासत्ता होणार नसतं. आणि का व्हायचयं महासत्ता?

आपल्या लोकांना दोन वेळेच अन्न मिळून, त्यांच्या मुलभूत गरजा भागून सुखाने आयुष्य काढता यावे या सारखी ईतर कुठली सत्ता नसावी पण पैसा आणि त्या साठीची शर्यत यापुढे कोणालाच काही दिसत नाहीये. खुप मोठ्या मनुष्य बळाची आणि तांत्रिकतेची गरज आहे म्हणून लाखो engineers व्यवस्था निर्माण करतेय पण कंपन्याना काय हवयं याचा विचार न करता नुसतचं शिक्षणाचे धड़े गिरवले जातायेत. शिक्षणाच्या बाजारात लाखो विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. भरमसाठ फी आणि ईतर खर्चाने कावेबाजांचा व्यापार तर होतोय पण विदयार्थ्यांच्या भविष्याचं काय?

असं कोणतं शिक्षण पुरवलं जातय ज्या मुळे तुमच्या criteria मध्ये मुलं/मुली बसत नाहिये?
पदवीनंतर नोकरी मिळवून देऊ हा एक नवीन बाजार सुरु झालाय.

कोणतही शिक्षण घ्या, बाहेर बाजारबुणगे आहेच त्यांचंच किती प्रभावी शस्त्र आहे याची जाहिरात करायला. शिक्षणपद्धती कडून समाधान होत नसल्याने पालक आणि विद्यार्थी सुद्धा बाजारात नुकसान करून घेणारं गिऱ्हाईक बनत आहेत.

मिळत असलेलं शिक्षण आणि त्या पुढील टप्प्या वरची कामे यामधील अंतर खुप आहे. असं असून सुद्धा कोणत्या सचोटी वर तपासून कामास पात्र असं ठरवलं जात आहे हे काही कळेना.

विद्यार्थ्यांना सुद्धा कशालाच बळी न पड़ता खुप मोठ्या कसोटीवर उतरून हार न मानता लढत रहावे लागेल.

तेजल देवरे. – युवा लेखिका, नाशिक

Read more...

असं नातं हवंय….!! – स्नेहल डोके पाटील

असं नातं हवंय….!!

मला असं नातं हवंय, ज्यात मला कोणतंही स्पष्टीकरण देत बसावं लागणार नाही. स्वतःबद्दल खुलासे देत बसण्याजोगे काहीही असणार नाही.

शारीरिक थकव्यापेक्षा तुम्हाला मानसिक थकवा जास्त खच्ची करतो. ज्यामुळे असं नातं शोधावंस वाटत, जिथं मला विश्वासातून निर्माण झालेल स्वातंत्र्य लाभेल. जिथे मला माझ्या वागणुकीबद्दल खुलासे द्यावे लागणार नाहीत.

मला असं नातं हवंय, जिथे माझ्याच विरोधात मला उभं केलं जाणार नाही. माझी काही बलस्थाने आहेत, तर काही त्रुटी सुद्धा आहेत. जे नातं मी शोधात आहे, त्यात माझ्या कमकुवत बाजूला सतत भडकवलं जाणार नाही, चिथावलं जाणार नाही.


मला असं नातं हवंय, जिथे नेहमी माझ्यातील सकारात्मक घटक वैयक्तिक पातळीवर आणले जातील.

मी असं नातं बांधू इच्छितो/इच्छिते, जिथे माझा “आज” मी काल केलेल्या चुकीच्या प्रकाशात पहिला जाणार नाही.

मी माणूस आहे हातून चुका होणारच, मला आता असं कोणी हवंय जे माझ्या चुकांचा अहवाल राखत बसणार नाही.
शोध अशा नात्याचा आहे, जिथे कालच्या कुरबुरी आजच्या परस्पर संवादामध्ये खीळ घालत नाहीत, जिथे “काल” कालच संपून गेलेला असेल.

मला असं नातं हवंय, ज्यात सारखं केवळ मलाच पुढाकार घ्यावा लागणार नाही, ते नातं हवं ज्यामधे मी पारदर्शक असू शकतो. असे नातं जे मिळवण्याकरीता आणि टिकावण्याकरीता मला माझ्या आवडीनिवडी बदलाव्या लागणार नाहीत.

मला असं नातं हवंय जिथे माझ्या आत्मप्रतिभेला ओरखडे पडत नाही, मला असं नातं हवं जिथे मी कोणीतरी वेगळाच असण्याची अपेक्षा केली जात नाही.

मला नातं हवं ते असं, जिथे मला स्वत्व पूर्ण पने अनुभवता येईल. अगदी मी माझ्या सोबत असतो त्या पेक्षा हि जास्त.

असं नातं ज्यात मला पुन्हा आईच्या गर्भात असल्यासारखं वाटेल, असं नातं ज्यात माझ्या अंतःकर्णाला अगदी नुकताच जन्माला आल्या सारखं वाटेल.

असं नातं हवंय…!

Read more...

“वसुधैव कुटुंबंकम…” – स्नेहल डोके पाटील

“वसुधैव कुटुंबंकम”… हि संपूर्ण पृथ्वी हि आपली आहे. हे सांगण्यामागे कारण हे कि मानवता संपूर्ण विश्वात टिकावी. परंतु, रोहिंग्यांचा विषय आला कि हे सगळ खूप मागे पडताना दिसतं.

रोहिंग्या हे मूळचे म्यानमारचे व जातीने अल्पसंख्यांकित मुस्लीम समाजातून असलेले.


म्यानमारच्या पूर्वेकडील अरकान या भागात हे लोक वास्तव्यास होते. परंतु, म्यानमार सरकारने या रोहिंग्याना तुम्ही आमच्या देशातील नव्हे तर, बांग्लादेशातील निर्वासित आहात, म्हणून त्यांच्यावर अत्याचार करायला सुरुवात केली. म्यानमार सरकारने या रोहिंग्या मुसलमानांना पळवून लावण्यासाठी, त्यांचा खात्मा करण्यासाठी अनेक नरसंहार घडवून आणले, अनेक रोहिंगे यात मारले गेले व जे वाचले ते भारत, बांग्लादेश, इंडोनेशिया, थायलंड, मलेशिया व इतर देशांमध्ये पळून आले. २०१२ पासून रोहिंग्या मुसलमानांनी भारत, बांगलादेश व इतर राष्ट्रांमध्ये यायला सुरुवात केली.
सुरुवातीपासूनच बांग्लादेश सरकार रोहिंग्या मुसलमानांना आपल्या राज्यात सामावून घेण्यासाठी इच्छुक नव्हते व सध्या सुद्धा नाहीत. पण, २०१२ च्या सुरुवातीच्या काळात भारताने रोहिंग्या मुसलमानांना आश्रय दिला होता.
आंतरराष्ट्रीय स्तरावर हा विषय घेवून एका पत्रकाराने एका निर्वासित रोहिंग्याची प्रतिक्रिया घेतले तेव्हा, ‘त्याने बांग्लादेश पेक्षा भारतात आम्हांला जास्त नोकरीच्या संधी भारत सरकारने उपलब्ध करून दिला आहेत,’ असे म्हंटले होते.


म्यानमार सरकारने या रोहिंग्याना ‘तुम्ही बांग्लादेशी निर्वासित’ म्हणून मारले, हाकलले व आता बांग्लादेशी सरकार याच रोहिंग्याना ‘तुम्ही विस्थापित’ म्हणून त्यांना सामावून घेत नाहीय.
भारताने २०१२ पासून या रोहिंग्या मुसलमानांना सामावून घेण्याचे, त्यांना नोकरीच्या/रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे धोरण ठेवले होते. परंतु, २०१४ साली भारतात झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाचा मोठा विजय झाला व तेव्हापासून रोहिंग्या मुसलमानांदेखील भारताचे दरवाजे बंद करण्याचे धोरण राबवायला सुरुवात झाली.
सत्तेत आलेल्या मोदी सरकारने या रोहिंग्या मुसलमानांना “दहशतवादी” किंवा “अनधिकृत बंगाली” म्हणून घोषित करण्यास सुरुवात केली. भारतीय समाजाला किंबहुना ‘हिंदू बहुल राष्ट्र’ अशी भारताची प्रतिमा तयार करून रोहिंग्याना अनधिकृत मुसलमान म्हणून त्यांच्यापासून भारताला असुरक्षितता निर्माण होऊ शकते असे अनेक खोटे दावे केले.
हिंदू राष्ट्रभक्त असणाऱ्या या सरकारने मूळ मानवी अधिकारांवर गदा आणत रोहिंग्या मुसलमानांना त्यांच्या मूळ गरजांपासून लांब ठेवले. निवारा, आरोग्याच्या मूळ सुविधा, शिक्षण, कामाची संधी, त्याचप्रमाणे मानवी सन्मानापासून आज हे रोहिंगे मुसलमान कोसो दूर आहेत.
UNHCR मार्फत देण्यात येणारे Refugee Cardsदेखील सरकारने ताब्यात घेतली आहेत. शहरी भागांमध्ये कोणतेही बांधकाम करण्यास या रोहिंग्याना परवानगी नाही.
आज भारतात आलेले रोहिंग्या मुसलमान हे कचरा उचलण्याचे किंवा गटारी साफ करण्यापर्यंतचे काम करू शकतात. त्यांना राहण्यासाठी एखाद्या नापीक भागात झोपडी बांधण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. रोहिंग्या मुसलमानांच्या परिवारातील पाच वर्षापासूनच्या लहान मुलापासून ते वयोवृद्धपर्यंत सगळे हेच काम करताना दिसतात.
मानवी सन्मानाची व्याख्या या रोहिंग्यांसाठी “अल्पसंख्यांकित मुस्लीम” म्हणून बदललेली दिसते.
एवढ्यावरच न थांबता भारत सरकारने या रोहिंग्याना देशातून परत पाठवण्याचे लाजिरवाणे काम देखील केले आहे. अगदी नजीकच्या काळात ३१ रोहिंग्या, ज्यामध्ये १६ लहान मुले, ६ स्त्रियांचा समावेश होता त्यांना भारत-बांग्लादेश च्या सीमेवर माघारी पाठवण्यासाठी सोडण्यात आले. तर नुकतेच २२ जानेवारीला रोहिंग्या मुसलमानांच्या एका टोळीला “बेकायदेशीर विस्थापित” म्हणून अटक करण्यात आले.
रोहिंग्याना भारतातून दिल्या जाणाऱ्या या वागणुकीचा आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील विरोध केला जात आहे.
रोहिंग्या मुसलमान हे म्यानमार मधून भारतात आले म्हणून त्यांना विरोध होत नसून ते “अल्पसंख्यांकित मुस्लीम समाजाचे घटक” असल्याने त्यांना विरोध केला जात आहे. भारतीय संस्कृतीत “अतिथी देवो भव” हे प्रमाण असताना दुसरीकडे संस्कृतीच्या नावाखाली मानवतेची क्रूर चेष्टा करण्याचे काम केले जात आहे. या रोहिंग्या मुसलमानांना “आधार” कार्ड देवून त्यांना भारताचे नागरिक म्हणून सर्व मुलभूत अधिकार देण्यात यावे, हीच एक भारतीय म्हणून सदिच्छ.

Read more...

लोकसभा निवडणूक २०१९: संक्रमण वोट बँकेचे – योगेश वागज

पुणे लोकसभा मतदारसंघाती मतदार पाच वर्षात दुपटीने वाढले . स्थलांतर आणि फर्स्ट टाईम वोटर यांच्या केस स्टडी साठी पुणे लोकसभा सुटेबल मतदारसंघ वाटतो.
एकूण मतदार –
२०१४ – १० लाख ६३ हजार १११
२०१९ = २० लाख २५ हजार ६४५

२००९ , २०१४ , २०१९ या तिन्ही लोकसभा निवडणुकात फर्स्ट टाईम वोटर आणि स्थलांतरित वोटर असा मिळून एक नवा “अर्बन मतदार” अशी नवी व्होट बॅंक निर्णायक ठरत आहे. तसा तो प्रत्येक निवडनुकीत असतो परंतु पोस्ट मंडल आणि कमंडल नंतरची विसाव्या शतकाच्या शेवटच्या दशकातील पिढी.. विचारधारा , आर्थिक – सामाजिक प्रतिनिधित्व, गरजा आणि प्राथमिकता , तंत्रज्ञानाच्या भराऱ्या , खा. उ .जा. आणि ग्लोबल जगाच्या प्रवाहात आलेला खेडवळ देश…. सगळीकडे संक्रमण!!

२००९ ला युपीए मित्रपक्षयांचा लोकांशी असलेला संपर्क आणि विकासाला मानवी चेहरा देण्यासाठी मनमोहन सरकारने अर्थव्यवस्थेत पंप केलेला पैसा , जागतीक मंदी पासून वाचलेला भारत यामुळे कॉंग्रेस चे बलाबल वाढले . ( २०६ ) महाराष्ट्र राज्यापुरते बोलायचे तर मुंबईत कॉंग्रेस ६ जागा जिंकली त्यात ऱाज ठाकरे यांचा रोल पण खुप महत्वाचा होता. फर्स्ट टाईम वोटर २००९ लोकसभेला महाराष्ट्रातील शहरी भागात मनसे ने मोठ्या प्रमाणात खेचला ( अनेक कारणापैकी एक )
२०१४ ला खरीतर सुरुवात २०११ पासूनच झाली होती. ॲंड्राइड मार्केट , सोशल मिडिया , इलेक्ट्रॉनिक मिडिया डिबेट्स , पॉलसी पॅरालीसीस , कॉमनवेल्थ , २ जी स्पेक्ट्रम , पत्रकारपरिषदांचा रतीब , पर्यावरणवादी आंदोलने , निर्भया , लोकपाल आण्णा हजारे आंदोलन अशा विषयांनी भारतीय चर्चाविश्व व्यापले होते. अगदी टीव्ही चहाच्या जाहिराती सुद्दा देश उकळत असल्यासारख्या येत असत. ( आठवा )

“Our government rests in public opinion. Whoever can change public opinion, can change the government, practically just so much.” लिंकन साहेबांनी आधीच सांगितलेले आहे .

भ्रष्टाचार – महागाई = गुड गव्हर्नस /डेव्हलपमेंट

भ्रष्टाचार झाला आणि म्हणून महागाई वाढळी , म्हणून देश असह्य यातनात होरपळतोय मग डेव्हलपमेंट आणि गुड गव्हर्नस साठी भाजपच पर्याय अशी सलग तीन वर्षाची नॅरेशन लाईन भाजप -परिवाराने घेतली . माध्यमे , कॉर्पोरेटस , तटस्थ , पर्यावरणवादी , संघ स्वयंसेवक आणि वेगवेगळे आयाम यांनी जीव तोडून मेहनत घेतली आणि अभूतपूर्व सत्तांतर झाले. नंतर जे काही राजकारण झाले ते जुन्याच पध्दतीचे होते . फरक फक्त श्री नरेंद्र मोदी यांनी पत्रकार परिषदेशिवाय देशातील लोकांसोबत जो कनेक्ट आणि डिबेट्स उभी केली .आजही “डेव्हलपमेंट चॅंपियन “म्हणून नव्या आणि शहरी मतदारावर मोदी यांची मोहिनी काम करते असे वातावरण आहे. अर्थात राहुल गांधी यांनी सुद्धा गुजरात निवडणूकीपासून तगडे आव्हान उभे केले आहे. आणि तीन राज्यातील निवडणुकानंतर
त्यांच्या दाव्याला पाठबळ मिळत आहे. याउलट सर्वच प्रादेशिक पक्षाकडे या नव्या व्होटबॅंक साठी नॅरेटीव्ह , व्हिजन आणि कार्यक्रम पत्रिकेचा सध्यातरी आभाव दिसत आहे. जात समिकरणे आणि प्रभावशाली नेत्यांच्या कारकिर्दीचे दाखले या बेटांच्या पुढे जायचा विचार द्यावा लागेल . रिडिफाइन करावे . कालनिर्णय फेसबुक वॉल वर छापून यालोकांशी कनेक्ट होणार नाही .

फर्स्ट टाईम वोटर + स्थलांतरीत वोटर + मूळ अर्बन वोटर = नवी वोट बॅंक

ही “नवी वोटबॅंक ” आहे .तीचा हिस्सा आणि परिणामकारकता खुप मोठी आहे. आर्थिक प्रश्न – सोडवणुक , ॲस्पिरेशन आणि डेव्हलपमेंट , रोजगार आणि प्रपोशनल रिप्रेझेंटेशन , गटातुन किंवा समुहातुन गळण्याची भिती हे नव्या वोटरच्यापुढील राजकीय प्राधान्यक्रम असतील असे वाटते .

मुंबई , नागपूर , औरंगाबाद शहरात कॉंग्रेस किंवा समविचारी पक्ष का कमबॅक करु शकले नाहीत किंवा पुणे -पिंपरीचिंचवड , नाशिक परत ताब्यात घेण्यासाठी काय दिशेने जावे लागेल हा विचार होताना दिसत नाही. महाराष्ट्र ऱाज्यात अशा नव्या वोट बॅंकचा लक्षणीय प्रभाव असलेले ९२ विधानसभा मतदार संघ आहेत . भाजपा आणि देवेंद्र फडणवीस यांचा संपूर्ण कृतीकार्यक्रम आणि फोकस या नव्या वोट बॅंक वर आहे.

योगेश वागज (युवा लेखक)

Read more...

कामगार चळवळीचे पितामह जॉर्ज फर्नांडिस यांचं निधन

 

‘आवाज कुणाचा…’ या घोषवाक्याला ‘कामगारांचा…’ असं निर्विवाद उत्तर देणारे देशातील कामगार चळवळीचे अध्वर्यू, अघोषित ‘बंदसम्राट’ व देशाचे माजी संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस यांचं आज वृद्धापकाळानं निधन झालं. ते ८८ वर्षांचे होते. गेल्या अनेक वर्षांपासून शारीरिक व्याधींशी झुंजणाऱ्या फर्नांडिस यांच्यावर काही दिवसांपासून दिल्लीतील मॅक्स रुग्णालयात उपचार सुरू होते. तिथंच आज सकाळी सात वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. फर्नांडिस यांच्या निधनामुळं देशातील कामगारांसाठी प्राणपणानं झुंजणारा ‘योद्धा’ हरपल्याची भावना सर्वच स्तरांतून व्यक्त होत आहे. जॉर्ज यांचा मुलगा अमेरिकेतून परतल्यानंतर ख्रिश्चन पद्धतीनं त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

स्वतंत्र भारताच्या इतिहासातील काही मोजक्या लोकनेत्यांमध्ये जॉर्ज फर्नांडिस हे अग्रणी होते. संपूर्ण देशाचं समाजकारण व राजकारण त्यांनी व्यापून टाकलं होतं. ३ जून १९३० रोजी जन्मलेले जॉर्ज बालपणापासूनच चळवळ्या व बंडखोर स्वभावाचे होते. या स्वभावामुळंच पाद्री होण्यासाठी ख्रिस्ती सेमिनारीमध्ये दाखल करण्यात आलेल्या जॉर्ज यांनी तिथून पळ काढला. पुढं ते कामगार चळवळीत सक्रिय झाले. १९७४च्या रेल्वे संपापासून जॉर्ज खऱ्या अर्थानं नेते म्हणून उदयास आले. आणीबाणीच्या काळात त्यांच्यातील लढवय्या देशानं पाहिला. आणीबाणीच्या काळात पोलिसांना गुंगारा देण्यासाठी दाढी राखून आणि पगडी घालून शीख सरदाराचा वेष धारण केला होता. अटकेनंतर तुरुंगात ते कैद्यांना भगवद्गीतेचे श्लोक म्हणून दाखवायचे.
आणीबाणी उठल्यानंतर जॉर्ज यांनी तुरुंगात असतानाच बिहारमधील मुझफ्फरपूर येथून लोकसभेची निवडणूक लढवली आणि विक्रमी मतांनी विजय मिळवला. त्या काळात काँग्रेसला हरवून सत्तेवर आलेल्या जनता पार्टीच्या काळात ते उद्योगमंत्री होते. जनता पार्टीमध्ये फूट पडल्यानंतर अनेक नेत्यांनी स्वत:चे वेगळे पक्ष काढले. जॉर्ज यांनी समता पार्टीची स्थापना करून सक्रिय राजकारण सुरू केले. अर्थात, राजकारण करत असतानाही कामगारांशी असलेली नाळ त्यांनी कधी तोडली नाही. कामगारांसाठी ते अखेरपर्यंत लढत राहिले. त्यांचे राजकारण कधी कामगारहिताच्या आड आले नाही. कामगार संघटनांचं नेतृत्व करताना जॉर्ज यांच्या नेतृत्वाखाली अनेक नेते घडले. या नेत्यांनीही पुढं जॉर्ज यांचा वारसा समर्थपणे सुरू ठेवून कामगारांना न्याय्यहक्क मिळवून देण्याचा प्रयत्न केला.

केंद्रातील अटलबिहारी वाजपेयी यांच्या आघाडी सरकारमध्ये जॉर्ज यांच्या समता पक्षाचा समावेश होता. या सरकारमध्ये ते संरक्षणमंत्री होते. भाजपशी जवळीक साधण्याच्या त्यांच्या निर्णयावर टीकाही झाली. मात्र, ते डगमगले नाहीत. संरक्षणमंत्री म्हणून त्यांनी भारतीय जवानांच्या हिताचे अनेक चांगले निर्णय घेतले होते.

Read more...
Open chat
Powered by