शिवनेरी विकास कामांंसाठी २३ कोटी रुपयांचा निधी देणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

शिवनेरी विकास कामासाठी २३ कोटी रुपयांचा निधी देणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

सजग वेब टिम, जुन्नर

जुन्नर (दि.१९) | किल्ले शिवनेरी व परिसर विकासाकरिता तेवीस कोटी रुपयांचा निधी देण्याबरोबरच गडावरील शिवसंस्कार सृष्टी आणि रोप वे उभारणीची कामे मार्गी लावू, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवीन आवारात आयोजित शिवजयंती उत्सव कार्यक्रमांत ते बोलत होते. या वेळी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, सार्वजिनक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, पर्यटन, माहिती व जनसंपर्क विभागाच्या राज्यमंत्री आदिती तटकरे, खासदार डॉ.अमोल कोल्हे, आमदार सर्वश्री अतुल बेनके, दिलीप मोहिते, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निर्मला पानसरे, पी.डी.सी.सी बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात, कृषी उत्पन बाजार समितीचे सभापती संजय काळे, विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशिल शेरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, पुणे जिल्ह्याच्या सर्वांगीण‍ विकासासाठी निधीची कमतरता भासणार नाही, यासाठी जिल्ह्याचा ६५० कोटी रु.चा वार्षिक आराखडा तयार केला आहे. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून शिवनेरी परिसर विकासासाठी २३ कोटी रु.चा निधी दिला जाईल. राज्याच्याआगामी अर्थ संकल्पात शेतकरी, सर्वसामान्य नागरिक व विद्यार्थी यांना केंद्रस्थानी ठेवून विकास कामांचे नियोजन करण्यात येत आहे.

शालेय शिक्षण, अंगणवाडया, आरोग्य अशा अत्यावश्यक कामांसाठी दीड ते दोन टक्के व्याज दर आकारणाऱ्या जागतिक स्तरावरील वित्तीय संस्थाकडून निधी मिळवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगून श्री. पवार म्हणाले, शिवनेरी किल्ल्यावर राजमाता जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेले संस्कार, शिक्षण यांची माहिती सर्वांना होण्यासाठी ‘जिजाऊमाता ते शिवरायांच्या रोहिडेश्वरावरील स्वराज्याची शपथ’ या घटनाक्रमांवर आधारित शिवसंस्कार सृष्टी उभारण्यात येईल. तसेच वयस्कांच्या सोयीसाठी रोपवे उभारण्याकरिता सर्वेक्षणासाठी निधी दिला जाईल.
अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जगापुढे येण्यासाठी किल्ले संर्वधन महत्त्वाचे आहे. बॉस्टन विद्यापीठात ‘शिवाजी द मॅनेजमेंट गुरु’ अशी 100 गुणांची प्रश्नपत्रिका तर पाकिस्तानमध्ये पाठ्यपुस्तकांतून महाराजांवरील गौरवपर धड्याचा समावेश ही शिवप्रेमींसाठी अभिमानाची बाब आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची लढाई ही कुणा धर्माविरुध्द नव्हती, तर अन्यायाविरुद्ध न्यायाची लढाई होती. महाराजांचा कित्ता गिरवणे, ही आजची गरज आहे.

यावेळी खासदार डॉ.अमोल कोल्हे म्हणाले, राजमाता जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना जे नैतिकतेचे अधिष्ठान दिले, त्यामुळेच महाराजांच्या चरित्राचे गारुड आजही कायम आहे. जेेष्ठयांना शिवनेरीवर येण्यासाठी रोप वे उभारण्याची व शिवनेरीवर शिवसंस्कार सृष्टी उभारण्याची मागणी खासदार डॉ.अमोल कोल्हे व आमदार अतुल बेनके यांनी केली. कार्यक्रमात राष्ट्रपती पदक विजेते माजी सहायक पोलिस आयुक्त वसंत ताजणे यांना शिवनेर भूषण पुरस्कार तर लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे अपर पोलिस महासंचालक आशुतोष डुंबरे यांना छत्रपती शिवाजी महाराज गौरव पुरस्कार उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आला. सुरवातीला पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या जुन्नर मार्केट कमिटी शाखेच्या नूतन शाखेचे व एटीएम केंद्राचे उद्घाटन उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आमदार अतुल बेनके यांनी केले तर उपस्थितांचे आभार अशोक घोलप यांनी मानले.

Read more...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी कटिबध्द – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी कटिबध्द–मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

सजग वेब टिम, जुन्नर

पुणे (दि.१९)| गोरगरिबांच्या मनात हे माझे सरकार आहे, अशी भावना निर्माण झाली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी शासन कटिबध्द राहील ,असा विश्वास मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी व्यक्त केला.

सनई-चौघड्यांचे मंजूळ स्वर, तुतारींच्या गगनभेदी गर्जना, ढोल-ताशांचा निनाद, भगव्या पताका, ‘जय भवानी, जय शिवाजी’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’चा जयघोष अशा आनंदमयी वातावरणात आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उप मुख्य मंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शिवजन्मोत्सव किल्ले शिवनेरीवर उत्साहात साजरा झाला, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. या कार्यक्रमास
अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, माहिती व जनसंपर्क राज्यमंत्री आदिती तटकरे,खा. डॉ.अमोल कोल्हे, आ. अतुल बेनके आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

मुख्यमंत्री ठाकरे पुढे म्हणाले, आमच्या प्रत्येकाच्या ह्रदयात शिवविचार आहे. जिजाऊ माॕसाहेब आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचे तेज, प्रेरणा पाठीशी राहू द्या, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
शिवनेरी आपले वैभव आहे.या वैभवाचा वारसा जतन करण्यासाठी आणि पुढे नेण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न केले जातील, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
उप मुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व समाजाच्या विकासाची दिशा दाखवली.या दिशेने सरकारचे काम चालू आहे. शिवनेरी परिसराचा विकास आर्थिक तरतुदी अभावी प्रलंबित राहता कामा नये, याची दक्षता घेतली जात आहे. परिसरातील विकास कामांसाठी तातडीने 23 कोटी रुपये उपलब्ध करून दिले जातील, असेही ते म्हणाले.

मराठा आरक्षणाच्यावेळी दाखल झालेले गुन्हे कायद्याच्या चौकटीत राहून मागे घेण्यासाठी प्रयत्न केले जातील. ज्या गुन्ह्यात शासकीय मालमत्ता किंवा सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले नाही, ते गुन्हे नियमांच्या अधीन राहून मागे घेतले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.

प्रारंभी शिवजन्मस्थानी पारंपरिक वेशातील महिलांनी शिवरायांची महती सांगणारा पाळणा गायिला. त्यानंतर पोलीस पथकाने बंदुकीच्या तीन फैरी झाडून छत्रपती शिवरायांना मानवंदना दिली. त्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे, उप मुख्य मंत्री पवार यांनी बालशिवाजी व जिजाऊंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. कार्यक्रमास विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, विशेष पोलीस महानिरीक्षक सुहास वारके, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्या सह
असंख्य शिवभक्त उपस्थित होते.

Read more...

शरद लेंडे यांच्या एक मताने झालेल्या विजयावर न्यायालयाकडून शिक्कामोर्तब 

जि.प.निवडणुक निकालाबाबत मंगेश काकडे यांची याचिका न्यायालयाने फेटाळली

शरद लेंडे यांच्या एक मताने झालेल्या विजयावर न्यायालयाकडून शिक्कामोर्तब 

सजग वेब टीम पिंपळवंडी

पिंपळवंडी । जुन्नर तालुक्यातील पुणे जिल्हा परिषदेच्या आळे-पिंपळवंडी गटामधून 21 फेब्रुवारी 2017 रोजी झालेल्या निवडणूकीत राष्ट्रवादीचे उमेदवार शरद लेंडे यांनी निवडणुकीमध्ये शिवसेनेचे उमेदवार मंगेश काकडे यांचा एक मताने पराभव केला होता.

सदर निकालाविरुद्ध शिवसेनेचे उमेदवार मंगेश काकडे यांनी जिल्हा न्यायालय खेड येथे लेंडे यांच्या विजयाला आक्षेप घेणारी निवडणुक याचिका दाखल केली होती. ही याचिका न्यायलयाने फेटाळली आहे.

मंगेश काकडे यांनी शरद लेंडे यांना टपालाद्वारे मिळालेल्या मतपत्रिकांपैकी ३१ मतपत्रिकेस हरकत घेतली होती. सदर हरकत खेड न्यायालयातील जिल्हा न्यायाधीश एन.के.ब्रह्मे यांनी फेटाळून निवडणूक निर्णय अधिकारी यांनी जाहीर केलेला निकाल कायम केला आहे.

सदर प्रकरणी निवडणूक निर्णय अधिकारी यांचे तर्फे ॲड. गिरीश कोबल यांनी काम पाहिले. तर जिल्हा परिषद सदस्य शरद लेंडे यांचे तर्फे ॲड.सुमित निकम, ॲड. विश्वास दौंडकर, ॲड.सुधीर कोकाटे, व ॲड.सागर थोरात यांनी काम पाहिले.

Read more...

खासदार डॉ.अमोल कोल्हे आयोजित कर्णबधिर शिबिरास सणसवाडीमध्ये ज्येष्ठ नागरीकांचा मोठा प्रतिसाद

खासदार डॉ .अमोल कोल्हे आयोजित कर्णबधिर शिबिरास सणसवाडीमध्ये ज्येष्ठ नागरीकांचा मोठा प्रतिसाद

 

सजग वेब टीम, सणसवाडी शिरुर

शिरुर । खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या विशेष प्रयत्नातून यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, जगदंब प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य आणि स्टार्की फाऊंडेशन अमेरिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या मोफत कर्णबधिर तपासणी व डिजिटल श्रवणयंत्र वाटप शिबिर मालिकेतील दुसरे शिबिर आज हडपसर येथे संपन्न झाले. जि.प सदस्या सौ.सुजाता पवार यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन पार पडले.

                शिरूर लोकसभा मतदारसंघातील ज्येष्ठ नागरिकांसाठी नव्या वर्षात एक अभिनव उपक्रम राबविण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शिरुर-हवेली विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमदार अशोक पवार यांच्या सहकार्याने ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांची मोफत श्रवणदोष तपासणी करण्यात आली. सकाळी ९ ते दुपारी ३ या वेळेत शिबिरात सहभागी झालेल्या सुमारे ३०१ ज्येष्ठ नागरिकांची कानांची तपासणी करण्यात आली. अमेरिकेतील स्टार्की फाऊंडेशनच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी प्रत्येक नागरिकाची तपासणी केल्यानंतर श्रवणदोष आढळलेल्या व्यक्तींच्या कानाचे मोजमाप घेण्यात आले. शिबिरात पात्र ठरलेल्या व्यक्तींना डिजिटल श्रवणयंत्र मोफत देण्यात येणार आहे.

या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी सभापती मोनिकाताई हरगुडे, रविबापू काळे, पंडित दरेकर, आदी उपस्थित होते. तसेच स्टार्की फाऊंडेशन अमेरिका या संस्थेच्यावतीने डॉ.रवी गुप्ता, डॉ.सागर कानेकर, डॉ.पी.व्ही सरथ, डॉ.निहार प्रधान, डॉ.यशवंत सिंह, डॉ.सुरजित पेन, डॉ.स्टेजीन बेनी आदींनी कर्णबधिर ज्येष्ठ नागरिकांची तपासणी केली. शिबिर यशस्वी करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी, आशा वर्कर,आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

Read more...

संपूर्ण जगात जिथे जिथे मराठी माणूस आहे तिथे तिथे ही महाआरती पोहोचणार – वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वासराजे थोरात

महाराष्ट्र पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी यांनी बनविलेली छत्रपती शिवरायांची पहिली भव्य दिव्य आरती लवकरच होणार प्रसिद्ध
संपूर्ण जगात जिथे जिथे मराठी माणूस आहे तिथे तिथे ही महाआरती पोहोचणार – वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वासराजे थोरात
सजग वेब टीम पुणे 
पुणे । क्षितिज प्रोडक्शन, पुणे” निर्मित गीतकार विश्वासराजे थोरात यांनी लिहिलेल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छ.शिवाजी महाराजांच्या भव्य दिव्य महाआरतीचे व्हिडिओ चित्रीकरण नुकतेच पुणे येथे चतुःशृंगी मंदिराच्या प्रांगणात मोठ्या दिमाखात पार पडले असून लवकरच ही आरती प्रसिद्ध होणार आहे.या चित्रीकरणाचे उद्घाटन चतुःशृंगी विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे,सांगली जि.प.माजी अध्यक्ष आनंद डावरे यांचे हस्ते चतुःशृंगी देवी व महाराजांच्या पुतळ्यास श्रीफळ वाढवून करण्यात आले.या प्रसंगी त्यांनी विश्वासराजे थोरात यांचे काव्य लेखनाचे कौतुक करून आरतीच्या उपक्रमात सहभागी असलेल्या महाराष्ट्र पोलीस दलातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांना शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी आपल्या भावना व्यक्त करताना या महा आरतीचे गीतकार,वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वासराजे थोरात यांनी संपूर्ण जगात जिथे जिथे मराठी माणूस आहे,तिथपर्यंत शिवरायांची ही महाआरती पोहचेल,असे नमूद करून या आरती बरोबरच आपण लिहिलेले “गणरायाला साकडे” हे गीत आणि ज्ञानेश्वर माऊलींवरील पालखी सोहळा अभंग ही आगामी गीतेही “क्षितिज प्रोडक्शन” ला निर्मितीसाठी विना मोबदला दिली असल्याचे जाहीर केले.त्यांनी यावेळी तिन्ही गीतांचे लेखनाचे रोमहर्षक प्रसंग सांगताच टाळ्यांचा एकच कडकडाट झाला.
यावेळी “क्षितिज प्रोडक्शन” च्या वतीने निर्माती सौ.कल्पना विश्वासराजे थोरात यांचे हस्ते मान्यवरांचे सत्कार करण्यात आले. त्या म्हणाल्या की, “माझे पती यांनी त्यांच्या तिन्ही गीतांचे निर्मितीचे कायदेशीर सर्वाधिकार मला दिले असून शिवरायांची पहिली भव्य दिव्य आरती मी भैरवनाथ पतसंस्थेचे कर्ज काढून शिवरायांच्या चरणी अर्पण करीत आहे”या आरती साठी महाराष्ट्र पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी यांनी विना मोबदला अहोरात्र कष्ट घेतले आहेत. आरतीचे गायन महिला पोलिस पूजा पारखी जाधव, मुंबई, पो.शि.सागर घोरपडे, (पुणे शहर,) पो.ना.संघपाल तायडे,जळगाव यांनी केले असून उद्घोषणा सहा. पो.निरी.प्रवीण फणसे,मुंबई यांनी केली आहे. तुतारी वादन हनुमान नेटके, पेठ, मंचर यांनी केले आहे. आरतीची सुरुवात “क्षितिज प्रोडक्शन” चे क्षितिज थोरात यांनी शंख वाजवून केली.

या महाआरतीचे व्हिडिओ चित्रीकरणा मध्ये पोलीस निरीक्षक भास्कर जाधव, पुणे शहर, महिला पोलिस उपनिरीक्षक पल्लवी जाधव, जालना, पो.शि.सागर घोरपडे, पुणे शहर, तसेच गीतकार विश्वासराजे थोरात, यांनी अभिनय केला आहे.उद्घोषणा प्रसिद्ध अभिनेते अमोल मोरे यांनी केली आहे.
 या महा आरतीचे संगीत दिग्दर्शक पंचम स्टुडिओचे श्री. अद्वैत पटवर्धन हे असून व्हिडिओ दिग्दर्शक सुनिल वाईकर आणि जितेंद्र वाईकर हे आहेत.ही महाआरती बनविण्यासाठी महाराष्ट्र पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन जाधव, पुणे,पो. शि.संदिप सूर्यवंशी,पुणे शहर,पो.शि.योगेश गायिके, जालना, पो. ना.राजेश राजगुरे, बुलढाणा, पो.शि.दत्तात्रय गुंजभरे, पो.शि.सोपान निगल, महिला पो.शि.स्नेहलता ढवळे, तसेच प्रसिद्ध उदयोन्मुख गायक संतोष लगड, यांनी मोलाचे योगदान दिले आहे.
याशिवाय आरती मध्ये प्रसिद्ध अभिनेत्री सौ.श्वेता कामत, सौ. पल्लवी अनिरुद्ध पाटील, ओंकार विनायक थोरात, क्षितिज थोरात, निर्माती सौ.कल्पना थोरात,श्री. धनंजय कांबळे, ॲड.प्रताप मुळीक,आगतराव पवार,बाल कलाकार सोहम कैलास औटी, अथर्व मुळीक यांनी अभिनय केला आहे.आरती शूटिंगचे प्रोडक्शन मॅनेजर नितीन जाधव हे असून कॅमेरामन जितू आचरेकर, मुंबई, छायाचित्रकार अविनाश माने, नृत्य दिग्दर्शक किशोर दळवी,केशभूषा निता नागवंशी,वेशभूषा संतोष जगताप तर रंगभूषा नवीन यांनी केली आहे.अक्यूरेट सेक्युरिटीचे  विजय वारुळकर,पिडीसी बँकेचे मोहन पवार,हरिभाऊ औटी, नारायणगाव,माजी सैनिक अशोक पाटील, सिंहगड इन्स्टिट्यूटचे बशीर काझी व चेतन गेगजे,शितल रेणूसे, सकपाळ मॅडम,हरीश हळदे, गोखलेनगर यांनी आपला सहभाग नोंदविला. या महान व अजरामर आरतीसाठी श्री.चतुःशृंगी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष देवेंद्र अनगळ यांनी जागा उपलब्ध करून दिली. देशातील सर्वात मोठे ढोल ताशा पथक शिवगर्जना प्रतिष्ठान, (अध्यक्ष अजुभाऊ साळुंके) पुणे यांनी त्यांची अदाकारी पेश केली. तर वाघजई मित्रमंडळ, पुणेचे अध्यक्ष निलेश पवार यांनी त्यांचेकडील छ. शिवरायांचा सगळ्यात मोठा पुतळा उपलब्ध करून दिला.चतुःशृंगी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पो.निरी.अनिल शेवाळे यांनी सहकार्य केले.
Read more...

साखर उद्योगाच्या सक्षमीकरणासाठी संशोधन कार्याच्या विस्ताराची गरज – शरद पवार

साखर उद्योगाच्या सक्षमीकरणासाठी संशोधन कार्याच्या विस्ताराची गरज – शरद पवार

आंतरराष्ट्रीय साखर परिषद व प्रदर्शनाला प्रारंभ

सजग वेब टिम, पुणे

पुणे । ग्रामीण भागात उसशेतीमुळे चांगले सामाजिक व आर्थिक बदल होत आहेत. मात्र, ऊस संशोधन संस्थांमध्ये केलेली गुंतवणूक अत्यल्प आहे. यामुळे मागणी असूनही साखर उद्योगाला भविष्यात साखरेसह सहवीज, इथेनॉलचा पुरवठा करता येणार नाही. साखर उद्योगाच्या सक्षमीकरणासाठी संशोधन कार्याच्या विस्ताराची गरज असल्याचे प्रतिपादन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केले.

मांजरी, पुणे येथे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट संस्थेच्या वतीने 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारी 2020 या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या साखर उद्योगासंदर्भात व्दितीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते उदघाटन् झाले. यावेळी आंतरराष्ट्रीय साखर परिषदेचे कार्यकारी संचालक डॉ. जोस ऑरिव्ह, पंजाबचे सहकारमंत्री सुखजिंदरसिंग रंधावा, व्हीएसआयचे उपाध्यक्ष व मंत्री दिलीप वळसे पाटील, जलसंपदामंत्री जयंत पाटील, जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, व्हीएसआयचे पदाधिकारी विजयसिंह मोहिते पाटील, हर्षवर्धन पाटील, साखर आयुक्त सौरभ राव, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे महासंचालक शिवाजीराव देशमुख आदी मान्यवर होते.

यावेळी पवार म्हणाले, “व्हीएसआय ही शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी उभी केलेली संस्था आहे. जगातील साखर क्षेत्रातील तज्ज्ञाचे मार्गदर्शन घेवून साखर उद्योगाला पुढे नेण्यासाठी संस्थेचे प्रयत्न सुरू आहेत. याच प्रयत्नातून आंतरराष्ट्रीय पातळीवरील ही परिषद होत आहे. साखर उद्योगाच्या प्रयत्नामुळे देशातील पाच कोटी शेतकरी आता 50 लाख हेक्टरवर ऊस लागवड करीत समृध्दीकडे जात आहेत. 2025 पर्यंत देशाची साखर मागणी 300 ते 330 लाख टनापर्यंत गेलेली असेल. आपल्याला ऊस उत्पादकता व साखर उतारा वाढवून ही समस्या सोडवावी लागेल,” असा सल्ला श्री.पवार यांनी दिला.

दुष्काळ, क्षारता, कीड आणि रोग या संकटाचा मुकाबला करणारे नवीन ऊस वाण शोधण्यासाठी जैवतंत्रज्ञान, नॅनो तंत्रज्ञान तसेच जनुक तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक असल्याचे सांगून श्री पवार म्हणाले, शेतकऱ्यांना लागवडीच्या पातळीवर तांत्रिक मार्गदर्शन देणे गरजेचे असून त्यासाठी उत्पादक ते कारखानदार हा दुवा मजबूत करावा लागणार आहे. उत्पादक शेतकरी, कारखानदार आणि ग्राहक यांच्यात दुवा तयार करण्यासाठी डिजिटल तंत्राचा वापर करण्याची गरज आहे. त्यासाठी संशोधन संस्थांचे बळकटीकरण अत्यावशक ठरणार असल्याचेही श्री पवार यांनी स्पष्ट केले.

आंतरराष्ट्रीय साखर परिषदेचे कार्यकारी संचालक डॉ. जोस ऑरिव्ह म्हणाले, जागतिक साखर बाजारात भारत आघाडीवर असून उत्पादन वाढवून भारताने जागतिक साखर उद्योगाचे नेतृत्व स्वतःकडे आणले आहे. प्रक्रियकडे वळणे आणि उत्पादकता वाढविणे हे एकमेव पर्याय तुमच्या समोर आहेत. भारत जागतिक बाजारपेठेत पहिल्या क्रमांकाचा देश राहणार आहे, भारताने इथेनॉल धोरण आणले. यामुळे साखर साठे कमी होण्यास मदत झाली आहे. तसेच या धोरणामुळे मळीपासून तसेच ऊस रसापासून इथेनॉल निर्मिती वाढीला मदत होईल, असे मत डॉ. जोस यांनी व्यक्त केले.

पंजाबचे सहकारमंत्री रंधावा म्हणाले, महाराष्ट्र सहकार आणि साखर या दोन्ही क्षेत्राकरीता आमच्यासाठी आदर्श आहे. साखर उद्योगाने आपल्या भवितव्याचा विचार करताना शेतकऱ्याला कायम केंद्रबिंदू ठेवावे. महाराष्ट्राने शेती क्षेत्रात नेत्रदिपक प्रगती केली आहे.
या परिषदेला देशविदेशातील साखर उद्योगातील देश विदेशातील उद्योजक, नामवंत शास्त्रज्ञ, तंत्रज्ञानातील राज्यातील ऊस कारखान्यांचे पदाधिकारी, सभासद, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read more...

शेतकर्‍यांना आर्थिकदृष्टया सक्षम करून चिंतामुक्त करणार – कृषीमंत्री दादा भुसे

शेतकर्‍यांना आर्थिकदृष्टया सक्षम करून चिंतामुक्त करणार – कृषीमंत्री दादा भुसे

कृषीमंत्री भुसे यांनी घेतला राज्यातील कृषी विद्यापीठांच्या कामकाजाचा आढावा

सजग वेब टिम, पुणे 

पुणे । शेतकरी संशोधन करून नावीण्यपूर्ण प्रयोग करतात, अशा शेतक-यांच्या यशोगाथा इतर शेतक-यासांठी नक्कीच प्रेरणादायी आहेत, अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना कृषी विद्यापीठांने प्रोत्साहन द्यावे, शेतकरी बांधवांना आर्थिकदृष्टया सक्षम करण्यासोबतच चिंतामुक्त करणार असल्याचे प्रतिपादन कृषीमंत्री दादा भुसे यांनी आज केले.

पुणे येथील उद्यानविद्या महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित कृषीमंत्री श्री भुसे यांनी महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद व राज्यातील चारही कृषी विद्यापीठांच्या कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी कृषी परिषदेचे उपाध्यक्ष हरिभाऊ जावळे, कृषी परिषदेचे महासंचालक विश्वजित माने, संशोधन संचालक हरिहर कौसडीकर आदींसह चारही कृषी विद्यापिठाचे प्रमुख शास्त्रज्ञ उपस्थित होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा केंद्रबिंदू शेतकरी असल्याचे सांगून भुसे म्हणाले, शेतक-यांची कौटुंबिक अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी कृषी विभागासह कृषी विद्यापीठांचे प्रयत्न महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. देशपातळीवर शेतीसबंधी सुरू असलेले नवीन संशोधनही उपयुक्त ठरणार आहे, शास्त्रज्ञांनी शेतक-यांना आवश्यक असलेल्या संशोधनावर भर द्यावा. कृषी विद्यापीठांच्या संशोधन कार्याला निधी कमी पडू देणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

राज्यातील सर्वच तालुक्यात शेतकरी सन्मान व मार्गदर्शन केंद्राची स्थापना करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून प्रत्येक तालुक्यात या केंद्राची स्थापना तातडीने करावी, अशी सूचना करून श्री भुसे म्हणाले, अहमदनगर जिल्हयातील अकोले तालुक्यातील बिजमाता राहीबाई पोपेरे यांनी देशी बियाणे संवर्धन, नगर तालुक्यातील शेतकरी विष्णू जरे यांनी लसणाच्या वाणाचे संशोधन केले आहे. पालघर जिल्हयात महिला अत्यंत चांगल्या पदधतीने मोगरा फुलशेती करतात, अशा प्रयोगशील शेतक-यांना कृषी विद्यापीठांनी प्रोत्साहन देत मदत केली पाहीजे. कृषी विद्यापीठांचे संशोधन शेतक-यांना बांधावर पोहचण्यासाठी कृषी विभाग व कृषी विद्यापीठ यांनी समन्वयाने काम करावे, असेही श्री भुसे यांनी सांगितले.

विदर्भ, मराठवाडयासह राज्यातील शेतक-यांची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी अधिकचा भर द्यावा लागणार असल्याचे सांगून श्री भुसे म्हणाले, कृषी विद्यापीठांच्या माध्यमातून शेती उत्पादन वाढ, प्रक्रिया उद्योग,भाजीपाला शेती वाढीसाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीनेही संशोधन अधिकाधिक शेतक-यांपर्यंत पोहचविण्यासाठी मदत होणार आहे. सर्व मिळून समन्वयाने काम करून शेतक-यांच्या जीवनात आनंद निर्माण करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला , डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ- दापोली, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी व महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे शास्त्रज्ञ, अधिकारी उपस्थित होते.

Read more...

आमदार बेनके यांनी घेतला चिल्हेवाडी पाईपलाईन प्रकल्पाचा आढावा

आमदार बेनके यांनी घेतला चिल्हेवाडी पाईपलाईन प्रकल्पाचा आढावा

सजग वेब टिम, जुन्नर

नारायणगाव दि.२० | जुन्नर तालुक्याच्या उत्तर पूर्व भागातील कृषी सिंचनाच्या दृष्टीने महत्वाचा प्रकल्प म्हणजे चिल्हेवाडी पाईपलाईन प्रकल्प. आमदार अतुल बेनके यांनी आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात हा प्रकल्प पूर्ण करू आणि तालुक्याच्या उत्तर पूर्व भागात शेतकऱ्यांना पाण्याच्या प्रश्नी दिलासा देऊ असा शब्द निवडणुकीत दिला होता.

याचपार्श्वभूमीवर या चिल्हेवाडी धरण बंदपाईपलाईन प्रकल्पाचा बेनके यांनी अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला.

चिल्हेवाडी पाचघरचा प्रकल्प हा माजी आमदार वल्लभ बेनके यांचा ड्रीम प्रोजेक्ट होता, हा प्रकल्प आपण प्राधान्याने पूर्ण करणार आणि लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या शेतात थेट पाणी पोहचवणार असे बेनके यांनी यावेळी बोलताना सांगितले.

सदर पाईपलाईनच्या कामाच्या संबंधित सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत तसेच जि. प. सदस्य पांडुरंग पवार साहेब यांच्यासह बैठक घेऊन बेनके यांनी या प्रकल्पाचा आढावा घेतला.

या बैठकीत आमदार बेनके यांनी प्रकल्पाची सखोल माहिती घेतली. कामाची सध्याची स्थिती, धरणालगतचे पाण्याचे पाईपलाईन मधून पाण्याचा होणारा विसर्ग व शेवटच्या टोकापर्यंत मिळणारे पाणी, एकूण वितरिका, लाभक्षेत्रातील गावांसाठी मिळणारं पाणी, आवर्तनाचा कालावधी, भिजणारं लाभक्षेत्र, प्रलंबित काम पूर्ण होण्यासाठी लागणारा कालावधी या सर्वच बाबींचा अाढावा काल आमदार बेनके यांनी अधिकाऱ्यांकडून घेतला.

नारायणगाव याठिकाणी झालेल्या या बैठकीत अशोकनाना घोडके, प्रदीपजी पिंगट, विजय कुऱ्हाडे, जयरामशेठ भुजबळ, रानमळा गावचे माजी सरपंच सुरेश तिकोणे , मयुर मनोहर गुंजाळ, पंढरी गुंजाळ माजी (शाखा अभियंता जलसिंचन) आदी मान्यवर उपस्थित होते.

Read more...

कर्जत-भीमाशंकर राष्ट्रीय महामार्गास केंद्राचा हिरवा कंदिल : खा.डॉ.अमोल कोल्हे

कर्जत-भीमाशंकर राष्ट्रीय महामार्गास केंद्राचा हिरवा कंदिल : खा.डॉ.अमोल कोल्हे

सजग वेब टिम, पुणे

पुणे दि.१९ | संसदीय हिवाळी अधिवेशनात शिरूर लोकसभेचे खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी केंद्रीय भ्रूपुष्ट मंत्री मा.नितीनजी गडकरी यांची भेट घेऊन तीर्थक्षेत्र भीमाशंकरच्या सर्वांगीण विकासासाठी भीमाशंकरला जाणारा मार्ग हा राष्ट्रीय दर्जाचा व्हावा असे निवेदन दिले होते.
तीर्थक्षेत्र भीमाशंकर हे भाविकांचे श्रद्धास्थान असून या ठिकाणी येण्यासाठी माहामार्गची नितांत आवश्यकता आहे , राष्ट्रीय महामार्ग घोषित झाल्यामुळे या ठिकाणीच्या पर्यटनास निश्चितच चालना मिळेल , पर्यटनवृद्धीमुळे या भागातील रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. सोबतच मुंबईला जाण्यासाठी वेळेची बचत होईल, या राज्यमार्गाला राष्ट्रीय महामार्गचा दर्जा मिळवा अशी मागणी केली होती.
खा.डॉ अमोल कोल्हे यांनी केलेल्या मागणीला केंद्रिय मंत्रालयाने हिरवा कंदील दाखवला आहे कर्जत-भीमाशंकर मार्ग हा राष्ट्रीय महामार्ग म्हणुन घोषित करण्यासाठी व तसेच या संबधी राज्यमार्ग मंत्रालय सचिव यांना कळविले आहे , महामार्गाच्या मजबुतीकरणासाठी लवकरच कार्यवाही करण्यात येईल असे लेखी पत्र डॉ कोल्हे यांच्या कार्यालयास प्राप्त झाले आहे.

Read more...

पुणे- नाशिक महामार्ग बायपाससाठी एकूण २१६ कोटी रुपये मंजूर : खा.डॉ अमोल कोल्हे

पुणे- नाशिक महामार्ग बायपाससाठी एकूण २१६ कोटी रुपये मंजूर : खा.डॉ अमोल कोल्हे

सजग वेब टिम, पुणे

पुणे दि.१८| शिरूर लोकसभा मतदारसंघातील विकास कामे वेगाने मार्गी लावण्यासाठी या विभागाचे खा.डॉ.अमोल कोल्हे प्रयत्नशील आहेत असं दिसतं आहे. कोल्हे यांनी आपल्या पहिल्याच अधिवेशनात आपल्या भाषणात लोकसभा मतदारसंघातील वाहतूक कोंडीच्या समस्येवर आवाज उठवला होता, त्यानंतर पुन्हा हिवाळी अधिवेशनात तोच प्रश्न उपस्थित केला. भृपुष्टमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन पुणे -नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडी संदर्भात लेखी निवेदनही त्यांनी दिले होते. याचेच फलित म्हणून खेड-सिन्नर महामार्गात सर्वात जास्त वाहतूक कोंडी होणाऱ्या खेड बायपास , मंचर-एकलहरे,पेठ याठिकाणी बायपास करण्यासाठी २१६ कोटी रुपयांची निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे.
यामध्ये एकूण १४.१३७ किमी
प्रस्तावित खेड बायपास (किमी ४२ ते किमी ४६.९८) , पेठ (किमी ५६.१००ते ५६७८०)मंचर-एकलहरे बायपास (किमी ६०.१०० ते ६८.५७६) साठी निविदा प्रक्रिया सुरू झाली असून लवकरच पुणे-नाशिक महामार्ग लवकरच वाहतुक कोंडीपासून मुक्त होईल असा विश्वास खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी व्यक्त केला.
सदर बायपास हा ४ पदरी असेल यातील फेज-१ साठी खेड-सिन्नर महामार्ग पूर्ण करण्यासाठी २ वर्षाच्या कालावधीमध्ये पूर्ण होईल , लवकरात लवकर निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यासाठीच्या सूचना राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

Read more...
Open chat
Powered by