निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा – खा.डॉ.अमोल कोल्हे

निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा – खा.डॉ.अमोल कोल्हे

सजग वेब टिम, पुणे

पुणे | निसर्ग चक्रीवादळामुळे शिरूर लोकसभा मतदारसंघातील विविध तालुक्यात झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करा अशी मागणी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी जिल्हाधिकारी श्री. नवल किशोर राम यांना पत्र पाठवून केली आहे.

आज निसर्ग चक्रीवादळाने मुंबई, कोकण परिसरात धडक दिल्यानंतर या चक्रीवादळाचा परिणाम पुणे जिल्ह्यात जाणवायला सुरुवात झाली होती. मात्र दुपारनंतर जोरदार वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे अनेक घरांवरील पत्रे व छप्परं उडून गेली. तसेच घरांचे, वाहनांचे व शेतीचेही मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीची तातडीने दखल घेऊन खासदार डॉ. कोल्हे यांनी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना पत्र पाठवून नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश महसूल प्रशासनाला देण्याची मागणी केली आहे.

कोरोनाच्या संकटामुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना निसर्ग चक्रीवादळामुळे मोठा फटका बसला असून त्यातून सावरण्यासाठी त्यांना प्रशासनाने मदत करण्याची गरज आहे असे डॉ. कोल्हे यांनी सांगितले.

Read more...

नारायणगावकरांसाठी दिलासादायक बातमी : त्या व्यक्तींचा कोरोना अहवाल निगेटिव्ह

नारायणगावकरांसाठी दिलासादायक बातमी : त्या व्यक्तींचा कोरोना अहवाल निगेटिव्ह

सरपंच योगेश पाटे व डाॅ.वर्षा गुंजाळ यांची माहिती

सजग वेब टिम, जुन्नर

नारायणगाव | नारायणगाव येथील कावळे सोसायटीत मुंबईहुन आलेल्या एका व्यक्तीचा संशयास्पद मृत्यु झाल्याने त्यांच्या घरातील दोन व्यक्तींच्या स्वॅबचे नमुने तपासणीसाठी नेऊन त्यांना लेण्याद्री कोविड केअर सेंटर मध्ये ठेवण्यात अाले होते.

आज सकाळीच “त्या” दोन व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल निगेटिव्ह आला असल्याची महिती लोकनियुक्त सरपंच योगेश पाटे व वैद्यकिय अधिकारी वर्षा गुंजाळ यांनी दिली असून नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही परंतु काळजी घ्यावी व नियमांचे पालन करावे असे आवाहन यानिमित्ताने केले आहे.

सदर व्यक्तींचा कोरोना अहवाल निगेटिव्ह अाल्याने नारायणगाव परिसरातील लोकांमधील भीतीचे वातावरण कमी झाले आहे.

Read more...

आंबेगाव तालुक्यात तब्बल १५ नवे कोरोना रुग्ण, प्रशासनाची उडाली झोप

आंबेगाव तालुक्यात तब्बल १५ नवे कोरोना रुग्ण, प्रशासनाची उडाली झोप

सजग वेब टिम, आंबेगाव

मंचर (दि.२९)| आंबेगाव तालुक्यातील कोरोना संशयित व्यक्तींचे तपासणी अहवाल आज प्राप्त झाले. या अहवालाने आंबेगाव तालुक्यातील प्रशासनाची झोप उडाली आहे. तालुक्यात १५ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती पंचायत समितीचे गट विकास अधिकारी जालिंदर पठारे यांनी दिली आहे. या बातमीने आंबेगाव तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे आंबेगाव तालुका हा कोव्हिड १९ चा हॉटस्पॉट बनला आहे.

आंबेगाव तालुक्यात यापूर्वी दहा पॉझिटिव्ह रुग्ण आढळले होते. यामध्ये साकोरे १, शिनोली ३, निरगुडसर १, जवळे १ , वडगाव काशिंबे १ ,पिंगळवाडी १, वळती १, गिरवली १ त्यातील शिनोली येथील एक रुग्ण बरा होऊन घरी परतला आहे.

आज आलेल्या अहवालानुसार वडगाव काशिंबे ७ , शिनोली १ , घोडेगाव १, फदालेवाडी ३, एकलहरे १, पेठ २ असे एकूण १५ जण पॉझिटिव्ह सापडले असल्याची माहिती मिळाली आहे. कालच उत्पादनशुल्क तथा कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी कोरोना विषयक तालुका आढावा बैठक घेऊन तालुक्यातील रुग्णांचा आढावा घेतला होता. मात्र आज आलेल्या अहवालामुळे आंबेगाव तालुका हा हॉट स्पॉट बनला असल्याचे जाणवत आहे आंबेगाव तालुक्यातील बहुतेक प्रमुख गावे आणि बाजारपेठा बंद आहेत.

Read more...

जुन्नर तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या १९ वर ; औरंगपूर येथील एकाचा मृत्यू

जुन्नर तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या १९ वर
; औरंगपूर येथील एकाचा मृत्यू

सजग वेब टिम, जुन्नर

जुन्नर | जुन्नर तालुक्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वेगाने वाढताना दिसत आहे. आज औरंगपूर याठिकाणी मुंबईहून आलेल्या एका कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीचा पहाटे मृत्यू झाला असून या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या इतर व्यक्तींपैकी ३ जणांना विलगिकरण कक्षात ठेवण्यात आले असून एका व्यक्तीला पुणे याठिकाणी पाठविण्यात आले आहे.

आज सकाळी विठ्ठलवाडी (वडज) याठिकाणी राहणाऱ्या एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून जुन्नर तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता १९ झाली आहे. तालुक्यातील ऍक्टिव्ह केसेसची संख्या १७ झाली आहेत.

रुग्णसंख्या आणि गावे खालील प्रमाणे

सावरगाव ६, धोलवड ३, मांजरवाडी २, पारुंडे  २, आंबेगव्हाण २, धालेवाडी तर्फे मिन्हेर १, औंरगपूर १, विठ्ठलवाडी वडज -१ तर डिंगोरे येथील १ व्यक्ती बरी झाली आहे.

तालुक्यातील वाढती रुग्णसंख्या पाहून जुन्नरकरांची चिंता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.

या सर्व परिस्थितीत प्रशासनाने तालुका रेडझोन म्हणून जाहीर करून कठोर पावले उचलण्यात यावीत अशी मागणी काही नागरिक करत आहेत.

Read more...

जुन्नर तालुक्यात आणखी चार जण कोरोनाबाधित; सावरगाव ठरतंय हॉटस्पॉट

जुन्नर तालुक्यात आणखी चार जण कोरोनाबाधित; सावरगाव ठरतंय हॉटस्पॉट

सजग वेब टिम, जुन्नर

जुन्नर | जुन्नर तालुक्यातील सावरगाव याठिकाणी मुंबईहून आलेल्या दोन कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या इतर व्यक्तींच्या तपासणी अहवालात आणखी ४ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.

जुन्नर तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता ११ झाली आहे. तर ऍक्टिव्ह केसेस १० आहेत. सावरगाव ६, धोलवड ३, मांजरवाडी १ तर डिंगोरे येथील १ व्यक्ती बरी झाली आहे.

तालुक्यातील वाढती रुग्णसंख्या पाहून मुंबईकर मंडळींचे आगमन मात्र जुन्नरकरांची चिंता वाढवताना दिसत आहे.

या सर्व परिस्थितीत प्रशासनाने सर्व नागरिकांना स्वच्छता राखण्याचे आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळण्याचे आवाहन केले आहे.

Read more...

लेण्याद्री येथील कोविड 19 केअर सेंटरची उभारणी अंतिम टप्यात

लेण्याद्री येथील कोविड 19 केअर सेंटरची उभारणी अंतिम टप्यात

आमदार बेनके यांनी घेतला कामकाजाचा आढावा

सजग वेब टिम, जुन्नर

जुन्नर | श्री क्षेत्र लेण्याद्री ता.जुन्नर येथील कोविड 19 केअर सेंटरची उभारणी अंतिम टप्यात असून, गुरुवारी दि.२१ रोजी सांयकाळी लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी या कामाची पाहणी करून आढावा घेतला.

खासदार डॉ. अमोल कोल्हे सहा सेंटरची महत्वपूर्ण मागणी सरकारकडे केली होती. यात जुन्नरसाठी आमदार अतुल बेनके हेही आग्रही होते. त्यापैकी महाळूगे, वाघोली, शिरूर, मंचर आणि लेण्याद्री (जुन्नर) ही पाच कोविड 19 केअर सेंटर लवकरच कार्यान्वित होत असल्याचे आमदार अतुल बेनके यांनी सजग टाईम्सशी बोलताना सांगितले.

कोरोनाची लक्षणं असलेल्या रुग्णाच्या स्वॅबचे नमुने याठिकाणी घेण्यात येणार असून, पुणे येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात येतील. तसेच या तपासणीचा अहवाल २४ तासाच्या आत प्राप्त होईल, अशी व्यवस्था करण्यात येणार आहे. हे सेंटर सध्या शंभर बेड्सचे असणार आहे. कोरोना पॉझिटिव्ह पेशंट्सचे उपचार या केअर सेंटरमध्ये करण्यात येतील. त्यासाठी रूग्णास पुण्याला नेण्याची गरज भासणार नाही, अशी व्यवस्था उभारण्याचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. या सर्व कामात आपली प्रशासकीय यंत्रणा वेगाने राबत आहे, असे अतुल बेनके यांनी सांगितले.

या पाहणी दरम्यान सहाय्यक जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, तहसीलदार हनुमंत कोळेकर, जिल्हा आरोग्य अधिकारी भगवान पवार, गट विकास अधिकारी विकास दांगट, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक नांदापूरकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. उमेश गोडे, वैद्यकीय अधिक्षक डॉ. प्रशांत शिंदे,जुन्नर नगर परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी जयश्री काटकर, जिल्हा परिषद सदस्य अंकुश आमले, सभापती विशाल तांबे, लेण्याद्री देवस्थान चे अध्यक्ष कैलास लोखंडे आणि सर्व संचालक आदी उपस्थित होते. यावेळी केअर सेंटरच्या कामाच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला.

Read more...

घाबरु नका; धैर्य आणि आत्मविश्वास बाळगा धोलवड ग्रामस्थांना आमदार अतुल बेनके यांचे आवाहन

घाबरुन जाऊ नका धोलवड ग्रामस्थांना आमदार अतुल बेनके यांचे आवाहन

कोरोनावर निश्चित मात करू धैर्य आणि आत्मविश्वास बाळगण्याचे जुन्नरकरांना केले आवाहन

सजग वेब टिम, जुन्नर

जुन्नर | जुन्नर तालुक्यातील धोलवड गावच्या लोकप्रतिनिधी आणि कोरोना संबंधित ग्रामपथकाच्या लोकांशी आमदार अतुल बेनके आणि प्रमुख अधिकाऱ्यांनी चर्चा केली. या चर्चेची पार्श्वभूमी अशी की धोलवड याठिकाणी काही दिवसांपूर्वी मुंबईहून एक कुटुंब गावी आले होते त्यातील एका व्यक्तीला कोरोना सदृश लक्षणं आढळली होती त्या व्यक्तीची मुंबई मध्ये टेस्ट केल्यानंतर ती टेस्ट पॉझिटीव्ह आली. तालुक्यातील प्रशासनाने याची त्वरित दखल घेऊन संबंधित व्यक्तीच्या कुटुंबातील व्यक्तींना पुणे याठिकाणी तपासणीसाठी पाठविले आहे.

यासर्व प्रकारामुळे धोलवड गावातील आणि परिसरातील लोकं भयभीत झाले होते. त्यामुळे अतुल बेनके यांनी स्वतः त्याठिकाणी जाऊन लोकप्रतिनिधी आणि कोरोना संबंधित ग्रामपथकाच्या लोकांशी चर्चा केली व त्यांना धीर देऊन ग्रामस्थांचे मनोबल वाढवले.

आपण सर्वच जण या गंभीर संकटातून जात आहोत या संकटाला सामोरे जात असताना आपण आपले धैर्य, आत्मविश्वास खचू देऊ नका. कोरोना हा आजार बरा होऊ शकतो त्यामुळे ग्रामस्थांनी घाबरुन जाऊ नये. स्वच्छता राखून चांगल्या सवयीचे पालन करून तसेच काटेकोरपणे नियम पाळून आपण या परिस्थितीवर निश्चित मात देऊ. आत्ता पर्यंत तुम्ही सर्वांनी ज्या पद्धतीने मला आणि प्रशासनाला साथ दिली आहे मी तीच जिद्द आणि आत्मविश्वास कायम ठेवून न घाबरता आपण सर्वांनी एकमेकांना साथ देत धैर्याने या संकटाशी दोन हात करायचे आहेत असे आवाहन यानिमित्ताने बेनके यांनी जुन्नरकरांना केले आहे.

या प्रसंगी जि. प. सदस्य मोहित ढमाले, सभापती विशाल तांबे, ओतूर पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक कांबळे, ओतूर चे सरपंच संतोष तांबे, धोलवड गावच्या सरपंच मंगलताई नलावडे आदी मान्यवरही उपस्थित होते.

Read more...

पत्रकार प्रा.अशफाक पटेल यांचा जिल्हास्तरीय कोविड समाजरक्षक २०२० पुरस्काराने सन्मान

पत्रकार प्रा.अशफाक पटेल यांचा जिल्हास्तरीय कोविड समाजरक्षक २०२० पुरस्काराने सन्मान

सजग वेब टिम, जुन्नर

नारायणगाव (दि.२०) | अविष्कार सोशल अँड एज्युकेशन फौंडेशन, कोल्हापुर या राष्ट्रीय स्तरावर काम करणार्‍या समाजसेवी संस्थेच्य‍ा माध्यमातुन कोरोना पार्श्वभूमी जीवाची बाजी लावुन काम करणार्‍या विविध क्षेत्रातील कोरोना योद्धांचा सन्मान करण्यात येत आहे.

याचनिमित्ताने आज जिल्हास्तरीय कोविड १९ समाजरक्षक सन्मान २०२० ने पत्रकार क्षेत्रातील कार्याबद्दल सजग टाईम्सचे संपादक पत्रकार प्रा.अशफाक पटेल यांचा व सामाजिक कार्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते अनिल खैरे यांचा सन्मान करण्यात आला. याआधी या पुरस्काराने लोकनियुक्त सरपंच योगेश पाटे, वैद्यकीय अधिकारी वर्षा गुंजाळ, सहाय्यक पोलिस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील यांसह कोरोना काळात कौतुकास्पद कार्य करणार्‍या विविध मान्यवरांना सन्मानित करण्यात आले आहे.

आज सकाळी नारायणगाव येथे जि.प.सदस्य आशाताई बुचके, कारखान्याचे संचालक संतोषनाना खैरे, प.स.सदस्य दिलिप गांजाळे, माजी उपसरपंच संतोष दांगट, लोकनियुक्त सरपंच योगेश पाटे, ग्रामविकास अधिकारी नितीन नाईकडे, अविष्कार संस्थेचे पदाधिकारी दिपक डेरे, आशा वर्कर यांच्या उपस्थितीत हा सन्मान करण्यात आला. यावेळी उपस्थिती मान्यवरांनी कौतुक करत कार्यास शुभेच्छा दिल्य‍ा.

यावेळी प्रा.पटेल बोलताना म्हणाले की, सदर पुरस्कार जीवाची बाजी लावुन नागरिकांची काळजी घेणार्‍या व समाजाच्य‍ा सुरक्षेसाठी काम करणार्‍या डाॅक्टर, पोलिस, आरोग्यसेविका, प्रशासन, पत्रकार यांसह विविध सामाजिक संस्था व ज्ञात अज्ञात काेरोना योद्धांना समर्पित करत असुन सर्व नागरिकांनी स्वत:च्या, परिवाराच्या, गावाच्या, जिल्ह्याच्या, राज्याच्या व देशाच्या सुरक्षेसाठी प्रयत्नशील राहुन नियमांचे पालन लवकरात लवकर कोरोना हद्दपार करण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन केले.

Read more...

कोरोना लढ्यासाठी मनुष्यबळासह आर्थिक कमतरता असल्यास तातडीने मागणी करा – अजित पवार

कोरोनाच्या लढ्यासाठी मनुष्यबळासह आर्थिक कमतरता असल्यास तातडीने मागणी करा – अजित पवार

कोरोनाचे संकट दूर करणे ही प्रत्येकाची जबाबदारी;अजित पवारांच्या प्रशासनाला सूचना

सजग वेब टिम, पुणे

पुणे (दि.१५ मे)| कोरोनाचे संकट दूर करणे ही प्रत्येकाची जबाबदारी असून शासकीय यंत्रणांनी त्यासाठी कसून प्रयत्‍न करण्‍याचे आदेश उपमुख्‍यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले.

दरम्यान कोरोनाच्‍या संकटाचा सामना करताना आर्थिक अथवा मनुष्‍यबळाच्‍या अडचणी असतील तर त्‍याबाबत स्‍पष्‍टपणे मागणी करण्याच्या सूचनाही अजित पवार यांनी केली.

पुणे जिल्‍ह्यातील कोरोनाबाधित रुग्‍णांची वाढती संख्‍या लक्षात घेवून उपमुख्‍यमंत्री अजित पवार यांनी आज विधानभवनातील झुंबर हॉलमध्‍ये बैठक घेतली.

बैठकीला महापौर मुरलीधर मोहोळ, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, संदीप बिष्णोई, जमाबंदी आयुक्‍त एस. चोक्‍कलिंगम, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुणे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, सहकार आयुक्त अनिल कवडे, साखर आयुक्त सौरभ राव, पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंग, भूजल सर्व्हेक्षण संचालक कौस्तुभ दिवेगावकर, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, शंतनू गोयल, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, ससूनचे अधिष्‍ठाता डॉ. मुरलीधर तांबे, आरोग्य विभागाचे निवृत्त महासंचालक डॉ. सुभाष साळुंखे, मुख्‍य अभियंता एस.एस. साळुंके आदींसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

पुणे महापालिका, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, जिल्‍हा प्रशासन, पोलीस विभाग, आरोग्‍य विभाग, जिल्‍हा परिषद यांचा विस्‍तृत आढावा अजित पवार यांनी घेतला. पुणे जिल्‍ह्यात लॉकडाऊनमुळे अडकलेल्‍या परराज्‍यातील मजुरांना त्‍यांच्‍या-त्‍यांच्‍या राज्‍यात परत पाठविण्‍यासाठी राज्‍यनिहाय समन्‍वय अधिकारी नेमण्‍याच्‍या सूचना त्‍यांनी दिल्‍या. कोरोनाचा संसर्ग रोखण्‍यासाठी आवश्‍यक ते सर्व उपाय योजण्याचा निर्णय राज्‍य शासनाने घेतला असून सार्वजनिक आरोग्‍य, वैद्यकीय शिक्षण आणि पोलीस विभागाला निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही असेही अजित पवार म्‍हणाले.

आगामी काळात मान्‍सूनचे आगमन होणार आहे. कोरोनाशी मुकाबला करताना मान्‍सूनपूर्व स्‍वच्‍छतेच्‍या कामाकडे दुर्लक्ष होता कामा नये असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

पुणे महानगरपालिका, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका यांनी त्‍याबाबत आवश्‍यक ती दक्षता घ्‍यावी. खरीप हंगामाचा उल्‍लेख करुन उपमुख्‍यमंत्री अजित पवार यांनी शेतक-यांना बी-बियाणे, खते यांचा तुटवडा भासता कामा नये यासाठी आवश्‍यक ती खबरदारी घेण्‍याच्‍या सूचना केल्या. येत्‍या सोमवारपासून बाजार समित्‍या सुरु करण्‍यात याव्यात असेही अजित पवार यांनी सांगितले.

पुणे महापालिकेच्‍या तुलनेत पिंपरी-चिंचवड महापालिकेने कोरोनावर नियंत्रण मिळवले असल्‍याने तेथे अटी-शर्तींच्‍या अधीन राहून उद्योग सुरु करण्‍यास परवानगी देण्‍यात आली आहे. उद्योग किंवा औद्योगिक आस्‍थापनांच्‍या प्रमुखांना कामगार किंवा मजुरांची वाहतूक, त्‍यांची निवास व्‍यवस्‍था, मास्‍कचा वापर याबाबत आवश्‍यक ते निर्देश देण्‍याच्‍या सूचनाही अजित पवार यांनी केल्या.

विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी विभागाची, जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पुणे जिल्‍ह्याची माहिती दिली. आयुक्त शेखर गायकवाड यांनी पुणे महापालिका आणि आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्‍यावतीने राबविण्‍यात येत असलेल्‍या उपाययोजनांची माहिती दिली. जमाबंदी आयुक्‍त एस.चोक्‍कलिंगम यांनी ससून हॉस्‍पीटलमधील उपलब्‍ध मनुष्‍यबळ, साधनसामुग्री, डॉक्टर-परिचारिका यांच्‍या भरतीबाबत माहिती दिली.
पोलीस आयुक्त डॉ.के.व्यंकटेशम, संदीप बिष्णोई व जिल्‍हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी पोलीस प्रशासनाच्यावतीने करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत माहिती दिली. सहकार आयुक्त अनिल कवडे, साखर आयुक्त सौरभ राव, पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंग, भूजल सर्व्हेक्षण संचालक कौस्तुभ दिवेगावकर, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, शांतनू गोयल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, ससूनचे अधिष्‍ठाता डॉ. मुरलीधर तांबे, आरोग्य विभागाचे निवृत्त महासंचालक डॉ. सुभाष साळुंखे यांनीही त्‍यांच्‍यावर सोपविण्‍यात आलेल्या जबाबदारीबाबत तसेच करण्‍यात आलेल्‍या कार्यवाहीबाबत माहिती दिली.

Read more...

अधिपरिचारिका पत्नीचे पतीने औक्षण करून केले स्वागत

अधिपरिचारिका पत्नीचे पतीने औक्षण करून केले स्वागत

सजग वेब टिम, जुन्नर

नारायणगाव (ता ११) | सध्या कोरोना विषाणूमुळे एकीकडे जगभर पसरलेला हाहाकार तर दुसरीकडे या सर्व गंभीर परिस्थितीतही धैर्याने, धाडसाने आपलं कर्तव्य पार पाडणारे आरोग्य कर्मचारी. पुणे येथील ससून हॉस्पिटलमध्ये कोरोनाबाधित रुग्णांवर सलग सात दिवस उपचार आणि त्यानंतर सात दिवसांचा विलगिकरण कालावधी पूर्ण केल्यानंतर घरी आलेल्या आपल्या अधिपरिचारिका पत्नीचे पतीने औक्षण करून स्वागत केले. पतीराजाने केलेल्या या स्वागताने परिचारिका सविता वाजगे भारावून गेल्या.

सविता या जुन्नर तालुक्यातील नारायणगावच्या सून आहेत. कळंब (ता. आंबेगाव) हे त्यांचे माहेर आहे. गेली २४ वर्षे पुण्यातील ससून रुग्णालयात
अधिपरिचारिका म्हणून त्या कार्यरत आहेत. आपल्या वैद्यकीय सेवेचा कालावधी उरकून त्या पुणे येथे चिंचवडला राहत्या घरी आल्या. त्यावेळी पती शेखर वाजगे हे दारातच ताट घेऊन उभे असल्याचे पाहून त्या आनंदाने भारावून गेल्या. आजच्या जगभरातील या संकटकाळी आपल्या पत्नी व आईला कर्तव्य बजावण्यासाठी धैर्य आणि सकारात्मकता दाखवून भक्कमपणे पाठिंबा देणारे पती शेखर वाजगे आणि मुलगा आदित्य वाजगे यांनी एक आदर्श घालून दिला आहे. आपल्या पतीने औक्षण करून केलेलं स्वागत पाहून माझ्या आनंदाला पारावार उरला नाही असे त्यांनी सांगितले.

Read more...
Open chat
Powered by