छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नातील राज्य घडवण्यासाठी शिवस्वराज्य यात्रेचे आयोजन – डॉ अमोल कोल्हे

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नातील राज्य घडवण्यासाठी शिवस्वराज्य यात्रेचे आयोजन – डॉ अमोल कोल्हे

प्रमोद दांगट, सजग वेब टिम (आंबेगाव)

मंचर | छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वप्नातील राज्य घडवण्यासाठी शिवस्वराज्य यात्रेचे आयोजन केले असून शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रभर ही यात्रा काढण्यात येणार असल्याचे प्रतिपादन खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी केले मंचर येथे शिवस्वराज्य यात्रेदरम्यान आयोजित सभेत ते बोलत होते यावेळी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, दिलीप वळसे-पाटील यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले .

मुख्यमंत्र्याच्या महाजनादेश यात्रेला प्रत्युत्तर देण्यासाठी राष्ट्रवादी कॉग्रेस च्या वतीने राज्यभर शिवस्वराज्य यात्रा काढण्यात आली आहे. खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली आजपासून शिवस्वराज्य यात्रेचा शुभारंभ शिवनेरी येथून करण्यात आला. या यात्रेची धुरा राष्ट्रवादीकडून अमोल कोल्हे यांच्याकडे सोपवण्यात आली असून यात्रेचा शुभारंभ प्रसंगीे अजित पवार, विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, छगन भुजबळ , दिलीप वळसे-पाटील आदी उपस्थित होते. मंगळवार शिवनेरी येथे सकाळी छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ मातेचे व शिवाई देवीचे  आशीर्वाद घेऊन यात्रेचा शुभारंभ झाला.  या यात्रेचे आंबेगाव तालुक्यातील कळंब ,पेठ येथे स्वागत करण्यात आले तर मंचर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेवर टीका करत ही यात्रा जनादेश यात्रा नसून धनादेश यात्रा आहे आहे. अशी खोचक टिका केली तसेच डॉक्टर अमोल कोल्हे यांनी बोलताना आमची शिवस्वराज्य यात्राही छत्रपती शिवाजी महाराजांना हवे होते तसे रयतेचे राज्य उभे करण्यासाठी ही यात्रा काढली असल्याचे सांगितले. यावेळी व्यासपीठावर विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, पूर्वा वळसे-पाटील ,प्रदीप वळसे पाटील ,पोपटराव गावडे ,विष्णू काका हिंगे,बाळासाहेब बेंडे ,बाळासाहेब बाणखेले,सचिन भोर,देवदत्त निकम ,यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. राष्ट्रवादीतील अनेक दिग्गज भाजप-शिवसेनेत गेल्याने राष्ट्रवादीला नवसंजीवनी देण्यासाठी या यात्रेचे आयोजन केले असून या यात्रेचा राष्ट्रवादी काँग्रेसला किती फायदा होणार पुढील काळातच कळेल.

Read more...

६ ऑगस्टपासून राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा, खा.अमोल कोल्हेंंकडे धुरा

शिवजन्मभूमी जुन्नर येथून यात्रेला होणार सुरूवात

सजग वेब टिम, महाराष्ट्र
मुंबई | राज्याच्या विधानसभा निवडणुकांचे बिगुल थोड्याच दिवसात वाजणार आहे. त्यातच नेत्यांच्या बैठका आणि जनसंपर्क वाढवण्यावर सर्वच पक्षांनी भर देण्यास सुरूवात केली आहे. गुरूवारपासून भाजपच्या महाजनादेश यात्रेला सुरूवात होणार आहे. तर शिवसनेतर्फे आदित्य ठाकरे यांनी जनआशीर्वाद यात्रेला सुरूवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शिवस्वराज्य यात्रेचे आयोजन केले आहे. खा. डॉ. अमोल कोल्हे यांच्यावर या यात्रेची प्रमुख जबाबदारी सोपवण्यात आली असून खा. उदनराजे भोसले हेदेखील स्टार प्रचारक म्हणून या यात्रेत सहभागी होणार आहेत.

६ ऑगस्टपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवस्वराज्य यात्रेला सुरूवात होणार आहे. पहिल्या टप्प्यात प्रत्येक दिवशी ३ मतदारसंघांमध्ये ही यात्रा जाणार असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीपासून म्हणजेच जुन्नर येथून या सभेला सुरूवात होणार आहे. पहिल्या टप्प्याची सांगता जिजाऊंच्या जन्मस्थानी म्हणजेच सिंदखेडराजा या ठिकाणी होणार आहे.

या यात्रेचा दुसरा टप्पा १६ ऑगस्ट पासून तुळजापूर येथून होणार आहे. तर सांगता रायगडावर होणार आहे. या यात्रेची सर्व जबाबदारी युवक राष्ट्रवादी काँग्रेसकडे सोपवण्यात आली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या खांद्यावर या यात्रेची प्रमुख जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

Read more...

खासदार डॉ. अमोल कोल्हे शिवरत्न पुरस्काराने सन्मानित

मी शिवकार्यातला एक लहानसा मावळा – खा.अमोल कोल्हे

नवी दिल्ली | प्रसिध्द मानवतावादी संगठन मराठा सेवा संघाच्या वतीने नवनिर्वाचित लोकसभा सदस्य तथा मराठा विश्वभूषण पुरस्कार सम्मानित डॉ.अमोल कोल्हे यांना आज येथे शिवरत्न पुरस्काराने गौरवाविण्यात आले. आयोजन नवीन महाराष्ट्र सदनातील ऐसपैस मोकळ्या प्रांगणात संपन्न झाले. मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय महासचिव कमलेश पाटील यांच्याहस्ते आज डॉ.अमोल कोल्हे यांना शिवरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. या आनंदी सोहळ्यात दिल्लीवासियांसह संभाजी बिग्रेडचे दिल्ली प्रभारी प्रो.पंकज कणसे, संभाजी ब्रिगेडचे दिल्ली प्रदेश अध्यक्ष, प्रा. परमेश्वर गपट, जिजाऊ ब्रिगेडचे दिल्ली अध्यक्षा प्रा.संजीवनी पिंगळे, विधीकक्षाचे अध्यक्ष अॅड. सुहास कदम, अॅड. आकाश काकडे, अॅड. प्रकाश कहार यांची उपस्थिती लाभली.

कमलेश पाटील यांनी या सोहळ्याविषयी स्पष्ट केले की, डॉ. अमोल कोल्हे यांनी अनेक कसोट्यांमधून त्रास सहन करीत छत्रपती शिवराय महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांचा खरा इतिहास भारतीयांच्या मनामनात घराघरात पोहचविण्याचे गौरवशाली कार्य पाइले आहे. ज्यांच्या रक्तात गौरवशाली इतिहासाचे विचार रुजलेले असतात तेच तळमळीने सृजनशील कार्यात गुंतवून घेतात व राष्ट्रकार्यात योगदान देतात.त्यापैकी डॉ. अमोलराजे एक आदर्श उदाहरण आजच्या युवापिढीसाठी प्रेरणादायी ठरत आहे. राष्ट्रपितामह तात्याबा ज्योतिबा फुले यांनी सुरु केलेले शिवकार्य आज डॉ. अमोलराजे पुढे नेत आहेत. “रायगड वंदन” हे “फुले ते कोल्हे” या प्रवासाचा मोठा स्वतंत्र इतिहास ठरणार आहे. या महान विभूतिंची उपकार फेड भारतीय समाज कधी करु शकणार नाही.

या कार्यक्रमास प्रा.रुषिकेश पवार, प्रा.राम पवार, प्रा.गोपाल मोरे, प्रा.उमेश शिंदे, प्रा. हनुमंत कदम, प्रा. रोहित गायकवाड, प्रा. अजिंक्य पाटील, प्रा. गोवर्धन भुतेकर, राहूल मराठा, प्रा. उमेश कोर्राम, रामकुमार जाधौन, प्रा. उमेश सूर्यवंशी, आकाश सौबळे अजीतेश मांडौले, अक्षय दुशिंग, इंस्पेक्टर संतोष सांबरे, इंस्पेक्टर संजय शिंगाई, इंस्नपेक्टर हितेंद्र देसले, इंस्पेक्टर गोविंद पिंगले, इंस्पेक्टर गोकुल आघाव, इंस्पेक्टर पंकज तायडे, मेजर डी. नरवडे, इंजिनियर प्रभाकर शिंदे, प्रा. कुमारी काटे, समाजसेवक श्री. प्रसाद खामकर, विशाल भुजबळ, रंजीत कदम, प्रा. मंगेश वानखेडे, विधीज्ञ निखिल अडकिने.

आभार व्यक्त करताना डॉ. अमोल राजे म्हणाले की, मी शिवकार्यातला एक लहानसा मावळा आहे. माझ्यापरीने भारतीयता विकसित करण्यासाठी जे जे शिवमय उदात्त मंगलमय सृजनशील आहे जे भारतीयांसमोर मांडताना मला स्वत:ला धन्यता लाभते. आणि यासाठी भारतीयांना देण्यासाठी जर काही आज उपलब्ध असेल
तर तो फक्त नि फक्त छत्रपती शिवशंभू महाराजांचा व त्यांची गुरुमाता राष्ट्रमाता जिजाऊंचा प्रेरणादायी इतिहासच एक मात्र गगनभर भंडारा आहे. आणि तो मी माझ्यापरीने मांडण्याचा प्रयत्न करतो आहे. हे करताना खासदार म्हणून लोकसेवकाचे माझे कर्तव्यातही मी गुंतवून घेतले आहे.
कार्यक्रमास वेळातवेळ काढून आलेल्यांचे आभार प्रा. पंकज कणसे यांनी मानले.

Read more...

बेनकेंच्या वाढदिवसाला शिवसेनेच्या नेत्यांची हजेरी

देवराम लांडे आणि बाबूभाऊ पाटे यांची उपस्थिती

सजग वेब टिम, जुन्नर

जुन्नर -| २३ जुलै रोजी १४ नंबर याठिकाणी आयोजित केलेल्या अतुल बेनके यांच्या वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळ्यात जुन्नर तालुक्यातील विविध पक्षाच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी लावलेली हजेरी चर्चेचा मुद्दा ठरत आहे.

आदिवासी भागातील मारुती वायाळ, भाऊसाहेब देवाडे यांच्या सह शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य देवराम लांडे आणि नारायणगाव चे सरपंच बाबूभाऊ पाटे यांनीही बेनके यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात हजेरी लावली आणि त्यांना शुभेच्छा दिल्या.

विधानसभा तोंडावर आलेली असताना शिवसेनेत चाललेली धुसफूस हि अतुल बेनके यांच्या पथ्यावर पडताना दिसत आहे.

आमचं ठरलंय, जुन्नर मध्ये बेनके पारनेर मध्ये लंके

पारनेर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते निलेश लंके यांनीही अतुल बेनके यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना त्यांनी
“आमचं ठरलंय, जुन्नर मध्ये बेनके पारनेर मध्ये लंके” असे वक्तव्य केले त्यावेळी कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेनके यांच्या वाढदिवसानिमित्त जमलेली गर्दी हि राष्ट्रवादी काँग्रेसच्या जमेची बाजू ठरत आहे.

Read more...

नारायणगाव बायपासच्या कामाला अखेर सुरवात, खा.अमोल कोल्हे यांच्या प्रयत्नांना यश

अतुल बेनके य‍ांच्या वाढदिवसाचे अौचित्य साधत कामाचे उद्घाटन

सजग वेब टिम, नारायणगाव 

नारायणगाव | शिरुर लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दिलेल्या आश्वासनांपैकी प्रलंबित कामे तत्काळ मार्गी लावण्याच्या वचनपूर्तिकडे पहिले पाऊल टाकले आहे. गेले अडीच वर्षे रखडलेल्या नारायणगाव बायपासच्या कामाला सुरुवात करण्यात डॉ. कोल्हे यांना यश आले आहे. आज दि.२३ रोजी अतुल बेनके य‍ांच्या वाढदिवसाचे अौचित्य साधत नारायणगाव बायपासच्या कामाला सुरुवात करण्यात आली. अधिवेशन असल्यामुळे डॉ.अमोल कोल्हे भूमिपूजन कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत.

गेले अडीच वर्षे नारायणगाव बायपासचे काम रखडले होते. डॉ. अमोल कोल्हे यांनी खासदारकीची शपथ घेतल्यानंतर मतदारसंघात येऊन रखडलेल्या खेड घाटाची पाहणी केली. संबंधित अधिका-यांची तातडीने बैठक घेतली. त्यामध्ये पुणे-नाशिक हायवे संदर्भातील खेड ते आळेफाटा दरम्यानच्या खेड घाट व पाच बायपासचे रखडलेल्या कामांचा विषय समोर आला. संबधित खेड घाट नारायणगाव बायपासची निविदा होऊन सहा महिने झाले. तरीही, कंत्राटदार व नॅशनल हायवे यांच्यामध्ये कामाची कुठलीही वर्कऑर्डर, एग्रीमेंट इत्यादी तांत्रिक बाबींची पूर्तता झाली नव्हती.

खासदार डॉ. कोल्हे यांनी तातडीने पावले उचलली. जिल्हाधिका-यांची भेट घेऊन भूसंपादनाचा प्रश्न मार्गी लावण्याची सूचना केली. केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी, महाराष्ट्र राज्याचे नॅशनल हायवेचे वित्त आणि प्रशासनाचे प्रमुख आशिष शर्मा यांची भेट घेतली. कंत्राटदाराला संबंधित कामाची वर्कऑर्डर तात्काळ अदा करून तांत्रिक बाबी सोडवण्याची विनंती केली. यावर तत्काळ सर्व संबंधित अधिका-यांना प्रलंबित असलेल्या तांत्रिक बाबी युद्धपातळीवर सोडवून काम चालू करण्याच्या सूचना डॉ.अमोल कोल्हे यांच्या विनंतीनुसार गडकरी यांनी दिल्या होत्या. त्यानुसार गेले अडीच वर्षे प्रलंबित असलेल्या नारायणगाव बायपासच्या कामाला आजअखेर प्रत्यक्ष मुहूर्त मिळाला आणि काम चालू झाले आहे.

केवळ आपल्या उपस्थितीसाठी किंवा श्रेयवादासाठी काम रखडू नये. वाहतूक कोंडीने त्रस्त झालेल्या नागरिकांना लवकरात लवकर दिलासा मिळावा यासाठी खासदार डॉ. कोल्हे यांनी स्थानिक लोकप्रतिनीधींच्या हस्ते कामाचे भूमिपूजन करण्यास सांगितले. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष अतुल बेनके, राष्ट्रवादीचे जुन्नर तालुकाध्यक्ष पांडुरंग पवार, अनिल मेहेर, प्रकाश पाटे, जिल्हा परिषद सदस्य अंकुश आमले, बबनराव तांबे, नॅशनल हायवे प्रकल्प समितीचे मुख्य समन्वयक वरूण भुजबळ, मुकेश वाजगे, सुरज वाजगे, संजय वारुळे, विपुल फुलसुंदर, रवींद्र पारगावकर, अरविंद लंबे, दिलीप कोल्हे, राजेश कोल्हे, रोहिदास केदारी, गणेश वाजगे, नॅशनल हायवे अधिकारी शर्मा साहेब, अरुण चौधरी आदी उपस्थित होते.

Read more...

युवकांना दिशा देणारे सहृदयी, समाजशील नेतृत्व

युवकांना दिशा देणारे सहृदयी, समाजशील नेतृत्व

स्वप्नील ढवळे,
मुख्य संपादक, सजग टाईम्स न्यूज

रात्री दौऱ्यावरून कितीही वाजता घरी आले तरी सकाळी कुठल्या तरी गावची दशक्रिया किंवा काही कार्यक्रमास पोहचण्यासाठी पुन्हा सकाळी त्याच ऊर्जेने तयार, दौरा संपवून रात्री एक वाजता आपल्या तापाने फणफणलेल्या मुलीला भेटायला पुण्याला जाणारा बाप असो की मायेने आपल्या कार्यकर्त्यांची विचारपूस करणारा, सर्वांना सोबत घेऊन काम करणारा कौटुंबिक आधार असो या व्यक्तीच्या एकंदरीत व्यक्तिमत्वाची विविध अंगे स्पष्ट करतात.

प्रत्येक व्यक्तिमत्वाला अनेक पैलू असतात, परंतु हे पैलू आपोआप पडत नाहीत. माणसाच्या जीवनात येणाऱ्या अनुभव आणि प्रसंगांना ती व्यक्ती कोणत्या पद्धतीने सामोरी गेलेली असते यावरून त्या व्यक्तीचे पैलू ध्यानात येत असतात. असंच विविध अनुभवांमधून पैलू पडत चाललेलं व्यक्तिमत्त्व म्हणजे जुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते अतुल बेनके.

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर अतुल बेनके यांच्या भूमिकेकडे संपूर्ण जुन्नर तालुक्याचे लक्ष होते. कारण काँग्रेस राष्ट्रवादी च्या अनेक युवा नेत्यांनी सत्ताधारी पक्षाची वाट धरली होती. अपवादात्मक काही नेते सोडले तर इतरांनी भाजपची वाट धरली होती. जुन्नरचं युवा नेतृत्व अतुल बेनके यांनी मात्र पराभवानंतरही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची साथ सोडली नाही उलट जुन्या कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेत निष्ठावान सखासोबती सारखं अभियान राबवलं, तालुक्यातील विविध कार्यक्रमांना उपस्थित राहून जबरदस्त जनसंपर्क वाढवला, कार्यकर्ता मेळावे असतील विविध आंदोलने असतील सतत कार्यकर्त्यांमध्ये राहून राष्ट्रवादी काँग्रेस चा जनाधार वाढवला. या सातत्यपूर्ण कामगिरीची प्रचिती जिल्हा परिषद निवडणुकीत दिसून आली राष्ट्रवादीने तालुक्यात जुन्नर नगरपरिषदेत चांगलं यश संपादन करून सर्वाधिक जिल्हा परिषद सदस्य निवडून आणले तसेच नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत आघाडीच्या सर्व नेत्यांना सोबत घेऊन काम करणारा संघटक म्हणून त्यांनी आपली एक वेगळी छापही पाडली.

प्रत्येक व्यक्तीची एक काम करण्याची पद्धत असते. गरज असेल तिथे आक्रमकता आणि अभ्यासू वृत्ती हे गुण संयुक्तपणे अतुल बेनके या व्यक्तीमध्ये दिसतात. पुणे नाशिक बायपास आणि चाळकवाडी टोलचा प्रश्न ज्या पद्धतीने त्यांनी हाताळला जिल्हाधिकारी कार्यालय, NHAI च्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून या प्रश्नाचा केलेला पाठपुरावा असेल. बायपास आंदोलनावेळी भर पावसात केलेलं तडफदार भाषण हे त्यांच्यातील आक्रमकता अधोरेखित करते.

जुन्नर तालुका क्रिकेट असोसिएशन, पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशन च्या माध्यमातून जुन्नर तालुक्याच्या कबड्डी संघाला आणि एकूणच त्या खेळाला त्यांनी दिलेलं बळ हे निश्चितच कौतुकास्पद आहे, सर्व जिल्हा परिषद शाळांचा एकत्रितपणे घेतलेला सांस्कृतिक महोत्सव, नृत्यस्पर्धांचे आयोजन असेल, फुटबॉल सारख्या खेळाकडेही जाणीवपूर्वक लक्ष देणे या सारख्या विविध उपक्रमांकडे आणि कार्यक्रम पाहिल्यानंतर या प्रत्येक क्षेत्राकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन या व्यक्तीकडे आहे अस आपण म्हणू शकतो.

आपल्या तालुक्यातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन आणि त्याची तयारी करण्याची संधी जुन्नर तालुक्यातच उपलब्ध व्हावी म्हणून युनिक अकॅडमी सारख्या नामवंत संस्थेचे नारायणगाव याठिकाणी प्रत्येक शनिवारी आणि रविवारी MPSC, UPSC सारख्या विविध स्पर्धा परीक्षांचे वर्ग त्यांनी चालू केले.इयत्ता दहावी मध्ये ९०% पेक्षा अधिक गुण मिळणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांनी ‘अतुलनीय शिष्यवृत्ती’ सारख्या संकल्पनेतून प्रत्येकी एक ते दिड लाख रुपयांची शिष्यवृत्ती देऊन गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचं काम केले. त्याच बरोबर अनेक गरीब आणि गरजू मुलांच्या शिक्षणाची जबाबदारीही त्यांनी आपल्या खांद्यावर घेतली आहे. ‘अनिक्क्षा’ या त्यांच्या पहिल्या मुलीच्या जन्माचे स्वागत त्यांनी ५१ अनाथ मुलींचे पालकत्व स्वीकारून केले. या मुलींना दत्तक घेऊन त्यांची सर्व जबाबदारी घेतली आणि समाजासमोर मुलीच्या जन्माचे स्वागत करण्याचं एक उदाहरण ठेवले.

पिंपळगाव जोगा येथील शाळेच्या नवीन इमारत बांधणीसाठी केलेली मोठी मदत तसेच करिअर मार्गदर्शन, नोकरी मेळावे, कॉलेज कट्टा, विद्यार्थी संवाद यांसारखे उपक्रम पाहिल्यानंतर शिक्षण या क्षेत्रातही अतिशय उल्लेखनीय काम उभं करण्याचं उद्दिष्ट्य त्यांच्या या विविध उपक्रमांमधून दिसून येते.
पुण्यासारख्या शैक्षणिक सुविधा आपल्या तालुक्यातील विद्यार्थ्यांना इथेच मिळाल्या पाहिजेत हा त्यांचा प्रयत्न आहे. त्यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात.

महिलांना उद्यमशील आणि स्वयंपूर्ण बनविण्यासाठी त्यांच्या पत्नी गौरी बेनके यांना त्यांचे कायम मार्गदर्शन असते, पेपरबॅग्स बनविण्यासारखे उद्योग तसेच इतरही सामाजिक उपक्रमांना एक व्यासपीठ उपलब्ध व्हावे म्हणून त्यांनी अंजनी उन्नती फाऊंडेशन सारख्या संस्थेची स्थापना ही केली आहे. आशावर्कर्स, अंगणवाडी मदतनीस यांसारख्या घटकांकडे त्यांच्या प्रश्नांकडे त्यांचे लक्ष असते. रक्षाबंधन सारखा सण एवढ्या मोठ्या प्रमाणावर साजरा करणारा दिलदार भाऊ अस म्हंटलं तरी वावगं ठरू नये.

शेतकरी संपात पिंपरी पेंढार याठिकाणी शेतकऱ्यांसोबत झोपून रात्र काढणारा, कांदा उत्पादक आंदोलन असेल शेतीच्या पाण्याचा प्रश्न असेल त्याठिकाणी हा नेता आपल्या परीने जे जे करता येईल ते करत असतो. मीना खोऱ्यातील१२ गावांतील शेतकऱ्यांसाठी पाटबंधारे खात्यातील अधिकाऱ्यांशी चर्चा करून पाणी सोडण्याची मागणी मान्य करण्यास भाग पाडले. सत्ता नसतानाही अधिकाऱ्यांशी आणि पक्षातील नेतृत्वाची ताकद वापरून ज्या पद्धतीने प्रश्न हाताळले ते प्रशंसनिय आहे.

आदिवासी भागात पडलेल्या दुष्काळ दौऱ्यात स्वतः शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पिकांची पाहणी करणारा त्यांच्यात मिळून मिसळून त्या बांधवांसोबत भाकरी खाणारे जागृत नेतृत्व म्हणून त्यांच्या या दौऱ्याकडे पाहिले गेले.

शाळेत जाणाऱ्या विद्यार्थिनी रस्त्याने पायी चालल्या होत्या विचारपूस केली असता कळले की त्यांचे पास संपले असल्या कारणाने त्या पायी चालल्या होत्या बेनके यांनी त्याच वेळी रस्त्याने जाणारी एक एसटी थांबवली आणि नवीन पास काढण्यासाठीची तरतूद करून त्या सर्व विद्यार्थिनींचे त्या दिवसाची तिकिटे काढून त्याचे पैसे वाहकाला दिले हा याच दौऱ्यात घडलेला एक प्रसंग आपल्याला त्यांच्यातील एक सहृदय माणूस दाखवतो.

नारायणगाव येथे झालेल्या राजे शिव छत्रपती प्रतिष्ठान च्या शिवजयंती कार्यक्रमात
“मी तुम्हांला मदत करू शकलो नाही हे मी माझे दुर्भाग्य समजतो” असे नारायणगावचे सरपंच योगेश (बाबूभाऊ) पाटे यांच्याबद्दल त्यांनी काढलेले कौतुकास्पद उदगार. समोरची व्यक्ती राजकीय क्षेत्रात असूनही त्यांचं केलेलं कौतुक तेही एवढ्या मोठ्या जनसमुदाया समोर म्हणजे हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आणि त्यांनी दाखवलेल्या समंजसपणाचं मूर्तिमंत उदाहरण आहे.

रात्री दौऱ्यावरून कितीही वाजता घरी आले तरी सकाळी कुठल्या तरी गावची दशक्रिया किंवा काही कार्यक्रमास पोहचण्यासाठी पुन्हा सकाळी त्याच ऊर्जेने तयार, दौरा संपवून रात्री एक वाजता आपल्या तापाने फणफणलेल्या मुलीला भेटायला पुण्याला जाणारा बाप असो की मायेने आपल्या कार्यकर्त्यांची विचारपूस करणारा, सर्वांना सोबत घेऊन काम करणारा कौटुंबिक आधार असो या व्यक्तीच्या एकंदरीत व्यक्तिमत्वाची विविध अंगे स्पष्ट करतात.

२०१३ चा लोकमत वृत्त समूहाचा राजकिय क्षेत्रातील युथ आयकॉन अवॉर्ड तसेच बांधकाम व्यावसायिक म्हणून पुणे सारख्या शहरात कमावलेला नावलौकिक आणि विश्वासार्हता असो.

बेनके कुटुंबियांचं गेल्या अनेक वर्षांपासून अनेक उपक्रम आणि मदतकार्य अखंडपणे चालू आहे. अनेकांना उभं केलं बळ दिलं संकटकाळी मागे उभे राहिले. परंतु हे आम्ही केलं ते आम्ही केलं स्वतःबद्दल उगाचच कधीही प्रौढी न मारणारे जनतेसंबंधी एक कणव आणि समर्पण भावना असलेलं सहृदयी नेतृत्व म्हणून अतुल बेनके हे उदयास आले आहेत.

अतुलजी बेनके आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा लवकरच तालुक्याची जबाबदारी तुमच्या खांद्यावर पडो याच मनापासून सदिच्छा. 💐

Read more...

डिजिटल युगातील स्मार्ट उद्योजक अरुण काळे

 

“डिजिटल मार्केटिंग हे पारंपरिक मार्केटिंगपेक्षा वेगळे नाही; फक्त मार्केटिंगची पद्धत बदलली आहे. अनेक उद्योग सुरू होतात, मात्र ते त्यांच्या एका ठराविक कक्षेपुरतेच मर्यादित राहतात. यामुळेच मी इतर उद्योगांना बळ देणारा उद्योग सुरू करण्याचा निर्णय घेतला. व्यवसाय करणे माझ्यासाठी सोपे नव्हते; कारण मला व्यवसाय कसा करावा, हे अजिबात माहीत नव्हते.”

स्मार्ट फोनच्या जमान्यात अरुण काळे यांनी ’स्मार्ट उद्योजक’ होण्याचा निर्णय घेतला आणि इतर उद्योजकांना याचा कसा फायदा मिळेल, या विचाराने डिजिटल मार्केटिंग हा आव्हानात्मक उद्योग सुरू केला. त्यांच्या व्यवसायाला ‘महालक्ष्मी पब्लिसिटी’ या नावाने ओळख मिळाली अरुण काळे म्हणतात,

‘‘डिजिटल मार्केटिंग हे पारंपरिक मार्केटिंगपेक्षा वेगळे नाही; फक्त मार्केटिंगची पद्धत बदलली आहे. अनेक उद्योग सुरू होतात, मात्र ते त्यांच्या एका ठराविक कक्षेपुरतेच मर्यादित राहतात. यामुळेच मी इतर उद्योगांना बळ देणारा उद्योग सुरू करण्याचा निर्णय घेतला. व्यवसाय करणे माझ्यासाठी सोपे नव्हते; कारण मला व्यवसाय कसा करावा, हे अजिबात माहीत नव्हते.

काही दिवस घरूनच काम करण्याचा निर्णय घेतला. एक लॅपटॉप आणि डेटा कार्डच्या मदतीने ‘डिजिटल मार्केटिंग’चा व्यवसाय घरूनच सुरू झाला. अनेक चांगले ग्राहक मला मिळत गेले. त्यातूनच आर्थिक बळासह आत्मविश्‍वास दुणावला. लोक मोबाईल फोन आणि लॅपटॉप अधिक वापरत असल्याने कंपन्यांचा डिजिटल मार्केटिंगवर भर असतो. एकूणच व्यवसाय ‘लोकल टू ग्लोबल’ करण्यासाठी ते महत्त्वाचे आहे. लोकांचे प्रॉडक्‍ट (उत्पादन) किंवा सर्व्हिसेस (सेवा) किंवा ब्रॅंडबद्दल जागरूकता निर्माण करून त्यांची विक्री कशी वाढवता, येईल यासाठी मी प्रयत्न करत गेलो.’’अनेक उद्योजक सुरवातीला स्वतःची वेबसाइट बनवण्यासाठी आग्रही असायचे, पण फक्त वेबसाइट बनवून किंवा व्यवसाय सुरू करून कधीच बिझनेस मिळत नाही. ती वेबसाइट किंवा तुमचा व्यवसाय लोकांपर्यंत पोचायला हवा. हेच अरुण काळे यांनी प्रत्येक वेबसाइट बनवणऱ्याला सांगितले.अशा पद्धतीने एक-एक प्रॉडक्‍ट वाढत गेला आणि त्यांची कंपनी आज डिजिटल मार्केटिंगच्या १५ ते २० सर्व्हिसेस देते.

डिजिटल मार्केटिंग करण्यासाठी वेबसाइट, सोशल मीडिया, सर्च इंजिन, गुगल ॲडव्हाइस, मोबाईल ॲप्स, ई-मेल यांसारख्या विविध इंटरनेटवरील माध्यमांचा वापर केला जातो.सध्या जगातील एकूण इंटरनेट यूजरपैकी ८० टक्‍क्‍यांहून अधिक लोक स्मार्ट फोनचा वापर करत असल्याने या लोकांपर्यंत पोचण्यासाठी आपल्या कंपनीचे, वस्तू किंवा सेवांची माहिती असलेले मोबाईल ॲप तयार करणे ही आजच्या काळाची गरज आहे. कंपनीच्या मोबाईल ॲप्सद्वारे लोक त्यांना हव्या असलेल्या वस्तू किंवा सेवा विकत घेऊ शकतात. डिजिटल मार्केटिंग ही बदलत्या काळाची गरज आहे. अरुण काळे म्हणतात, ‘‘प्रत्येक व्यवसायात चांगला फायदा मिळविण्यासाठी डिजिटल मार्केटिंगचा आराखडा असणे गरजेचे आहे.

त्यामुळे सध्याच्या जगात कसला ’ट्रेंड’ सुरू आहे, हे ओळखून कौशल्य मिळवा आणि कामाला लागा. यश स्वतःहून तुमच्याकडे चालत येईल. सध्या हा माझा व्यवसाय चाकण या शहरात चालु आहे .
वर्षाला एक ते दोन लाख रुपये मिळायचे. आता व्यवसायात वाढ करून व्यवसाय पाच ते सहा लाखापर्यंत पोचला आहे. मी आतापर्यंत 70 हुन अधिक लोकांना रोजगार दिला,नाशिक,जुन्नर ,आंबेगाव ,राजगुरुनगर,चाकण,पुणे,भोसरी,सतारा,बारामती या ठिकाणी माझी कंपनी सर्व्हिस देण्याचे काम करत आहे.

अनेक युवा तरुण व्यवसायिकांना हा ’डिजिटल मार्केटिंग’चा व्यवसाय कसा सुरू करायचा हे सांगितले आहे. ज्यांनी नुकताच व्यवसाय सुरू केला आहे, त्यांना मी एवढेच सांगेन की, प्रामाणिकपणे काम करा. ग्राहकांना सांभाळा, तुमची सर्व्हिस चांगली द्या आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचा. यावरच कोणत्याही व्यवसायाचे यश अवलंबून असते.

पुढील येत्या काळात जाहिरातीच्या नवनवीन संकल्पना तयार करुन त्यावर कामे केले जाईल असे अरुण काळे यांनी आपल्या प्रतिक्रियेमध्ये म्हंटले आहे.

Read more...

विरोधक जाणीवपूर्वक आदिवासी बांधवात गैरसमज निर्माण करत आहे – खा. डॉ.अमोल कोल्हे

सजग वेब टिम ,पुणे

पुणे | बारामती येथे झालेल्या कार्यक्रमादरम्यान धनगर आरक्षण विषयी माझे एक अर्धवट वक्तव्य पसरवून आदिवासी बांधवांचा गैरसमज करून देण्याचा प्रयत्न विरोधक करत आहेत. बारामती येथे झालेल्या कार्यक्रमात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या भाषणात “कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता धनगर समाजाला आरक्षण मिळावे” ही भूमिका मांडली व मी स्वतः याच भूमिकेला पाठिंबा दिला. मात्र विरोधक अर्धवट वक्तव्य पसरवून आदिवासी समाजाची दिशाभूल करत आहे. उपेक्षित समाजाला आरक्षण मिळावे परंतु इतर समाजांच्या आरक्षणाला धक्का न लावता मिळावे हीच माझी भूमिका आहे व राहील.

संसदेतील पहिल्याच भाषणात आदिवासी भागातील मुद्द्यांचा समावेश करणारा खासदार अशी भूमिका घेणार नाही याबद्दल आदिवासी बांधवांनी विश्वास बाळगावा. आणि ज्यांनी आजवर आदिवासी बांधवांकडे दुर्लक्षच केलं त्या विरोधकांनी माझ्या आदिवासी बांधवांत चुकीचा गैरसमज पसरवू नये असे खासदार अमोल कोल्हे यांच्या वतीने सांगण्यात आले आहे .

Read more...

आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागांत रस्त्यांची दुर्दशा

सजग वेब टिम, आंबेगाव ( संतोष पाचपुते)

पारगाव | आंबेगाव तालुक्यातील पुर्व भागात लोणी, धामणी, वडगावपीर, मांदळेवाडी, पहाडदरा व इतर काही मोजक्या गावांचा अपवाद वगळता मान्सुन पुर्व,मान्सुन चा पाऊस जोरदार बरसला आहे. मागच्या वर्षीच्या दुष्काळात होरपळून निघालेल्या गावांना अजुनही पावसाने म्हणावा तसा हात दिलेला नाही. पण झालेल्या रिमझीम पावसाने शेतक-यांची पेरणीची कामे मात्र सुरु झाली आहेत.

जारकरवाडी,पारगाव,अवसरी,मेंगडेवाडी या गावांना मात्र पावसाने जोरदारपणे झोडपुन काढले आहे.ही गावे आधीच डिंभे धरणाच्या उजव्या कालव्यानजीक अथवा घोडनदी तटावर वसली असल्याने त्यांचा पाण्याचा प्रश्न तुर्तास निकालात निघाला आहे.पण या पावसाने पुर्व भागातल्या रस्त्यांची मात्र पुरती वाट लावली आहे.

आंबेगाव तालुक्यातील पुर्व भागातील महत्वाची बाजारपेठ म्हणुन नावारुपाला आलेल्या पारगाव गावातील पारगाव स्टॅन्ड ते शिंगवे-काठापुर चौक हा रस्ता तर अक्षरशः राडा-रोड्याचा चौक बनला आहे.शिंगवे काठापुर चौक या रस्त्यावर चिखलाचे सर्वत्र साम्राज्य पसरले असुन खड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा हे समीकरण वाहनचालकांना समजुन येत नाही.त्यात हा रस्ता इतर भुभागापेक्षा खोलगट असल्याने आजुबाजुचे सर्व पाणी याच रस्त्यावर येते आणि रस्ता संपुर्ण चिखलात रुतुन जातो. अशीच कदाचीत त्याहुन जास्त दुरावस्था झाली आहे ती जारकरवाडी ते लोणी या रस्त्याची!!

धामणी खिंड ते धामणी फाटा हा अपवाद वगळता हा रस्ता देखील पुर्णपणे पावसात वाहुन गेला आहे.खड्यांचे साम्राज्य तर इतके की रस्ता अक्षरशः शोधावा लागतो आहे.

जारकरवाडी गावाच्या पुढे भोजणदरा वस्ती नजीक च्या छोट्याशा पुलावर तयार झालेले खड्डे दुचाकी चालकांसाठी कपाळमोक्ष करणारे ठरत आहेत. याहून आश्चर्याची बाब म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून धामणी फाटा ते लोणी या रस्त्यावरचे खड्डे पावसाळ्यापुर्वी बुजवलेच गेले नाहीयेत. मग या विशेष दुरुस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागा ने केलेली आर्थिक डागडुजी खड्ड्यातच मुरली नाही ना?असा सवाल या मार्गावरुन प्रवास करणाऱ्या वाहनचालक व्यक्त करत आहेत. तुर्तास तरी आंबेगाव तालुक्यातील पुर्व भागातले हे रस्ते म्हणजे वाहनचालकांसाठी अक्षरशः मृत्यूचे सापळेच बनले आहेत.

Read more...

नारायणगाव महाविद्यालयात लोकसंख्या वाढ विषयावर जनजागृती कार्यक्रम 

सजग वेब टिम, जुन्नर (अशफाक पटेल)

नारायणगांव | ग्रामोन्नती मंडळाच्या कला,वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांना रसायनशास्त्राचे प्राध्यापक डॉ. शिरीष पिंगळे यांनी ध्वनिप्रदूषण कमी करण्यासाठी मार्गदर्शन केले.

त्यात त्यांनी ध्वनिप्रदूषण कसे निर्माण होते, त्याचे मानवी जीवनावर होणारे परिणाम या बद्दलची माहिती सांगितली. त्यांनतर उपप्राचार्य डॉ. जी. बी. होले सरांनी लोकसंख्या नियंत्रण जनजाग्रुती यांवर मार्गदर्शन त्यात त्यांनी लोकसंख्या वाढीमुळे होणारे परिणाम याबद्दल सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कॅडेट प्रतीक ढवळे याने केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एन. सी. सी विभागप्रमुख डॉ. दिलीप शिवणे सरांनी केले.व प्रमुख पाहुण्यांची ओळख कॅडेट लक्ष्मी बोंबे हिने करून दिली. कार्यक्रमाला उपस्थित डॉ. टाकळकर सर, डॉ. कसबे सर आणि डॉ. पठारे सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. व एस. यू. ओ. विवेक वायकर याची एन .सी. सी. विदयार्थी प्रतिनिधी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. या सर्व कार्यक्रमाचे आभार कॅडेट शिवानी चव्हाण हिने मानले. त्यांनतर छात्रसेनेच्या विद्यार्थ्यांनी लोकसंख्या जनजागृतीसाठी रॅली, कार्यशाळा, व पथ नाटकांचे सादरीकरण व तसेच विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.

या सर्व कार्यक्रमास एन सी सी चे १०० कडेटस उपस्थित होते आणि त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसादही दिला.या सर्व कार्यक्रमामध्ये ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटे,कार्याध्यक्ष अनिल मेहेर,कार्यवाह रवींद्र पारगावकरआणि इतर सर्व मंडळींचे मार्गदर्शन लाभले.

Read more...